विखे-पाटील यांची निवड योग्य प्रक्रियेप्रमाणेच ! – मुख्यमंत्र्यांचा खुलासा

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री बनलेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात विरोधकांच्या घोषणा

राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, १७ जून (वार्ता.) – महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून प्रारंभ झाला. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करून गृहनिर्माणमंत्री बनलेले राधाकृष्ण विखे-पाटील पहिल्या दिवशी विधानभवनात येताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष यांच्या सदस्यांनी ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’, ‘विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रीमंडळ विस्तारात दंग’, अशा जोरदार घोषणा दिल्या. (विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा नेहमीचा पोरखेळ ! – संपादक) विखे-पाटील यांच्या मंत्रीपदाविषयी अजित पवार यांनी आक्षेप घेतला. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पात्र व्यक्तीला मंत्री करता येते. काँग्रेस पक्षाचे त्यागपत्र देऊन मंत्री झाल्याने कायद्याचा कोणताही भंग होत नाही. राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड योग्य त्या प्रक्रियेप्रमाणेच झाली आहे.

१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनस्थळी येत असतांना विरोधी पक्षांतील सदस्यांनी  हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली.

२. विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार म्हणाले, ‘‘राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर तुम्ही त्यांना पक्षात (भाजपमध्ये) घेतले आहे. आता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले आहेत, त्यांनातरी निवडणूक होईपर्यंत पक्षात घेऊ नका. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचे त्यागपत्र दिले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद कसे काय दिले जाऊ शकते ? एखाद्या पक्षाचे त्यागपत्र देऊन दुसर्‍या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रीपद देणे योग्य आहे का ? यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे.’’ अशी मागणी अजित पवार यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी याविषयी खुलासा केला.

शोकप्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित

मुंबई – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सकाळी ‘वन्दे मातरम्’ने प्रारंभ झाला. यानंतर दोन्ही सभागृहांत विविध विभागांचे अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. दोन्ही सभागृहांत राज्याचा वर्ष २०१८-२०१९ चा आर्थिक पाहणी अहवाल पटलावर ठेवण्यात आला. यानंतर निधन झालेल्या सदस्यांविषयी दोन्ही सभागृहांमध्ये शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्यामुळे प्रथेनुसार सभागृहाचे प्रत्यक्षपणे कामकाज घेण्यात आले नाही. शोकप्रस्तावानंतर दोन्ही सभागृहांचे पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित करण्यात आले. (विधीमंडळाचे कामकाज स्थगित ठेवण्याऐवजी जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कामकाज चालू ठेवून प्रश्‍न सोडवणे जनतेला अपेक्षित आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF