अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीनअर्जावरील सुनावणी १९ जूनला होणार

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण

पुणे – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामीनअर्जावर १७ जून या दिवशी सीबीआयकडून युक्तीवाद पूर्ण न झाल्याने न्यायाधीश आर्.एम्. पांडे यांनी पुढील सुनावणी १९ जून या दिवशी ठेवली आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांच्या वतीने अधिवक्ता सुभाष झा यांनी बाजू मांडली.

अधिवक्ता झा यांनी सांगितले, ‘‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय वेगवेगळ्या ‘थिअरी’ रचून अंधारात चाचपडत आहे. अशील आणि अधिवक्ता यांच्यामध्ये झालेल्या संभाषणानुसार जर अधिवक्त्यांना अटक केली जात असेल, तर तो वकिली व्यवसायावरच आघात आहे. कर्नाटक पोलिसांना अन्य एका प्रकरणात शरद कळसकर यांनी दिलेल्या कथित कबुलीवरून अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक केली गेली आहे; मात्र ‘अन्य गुन्ह्यातील जबाब ग्राह्य धरून दुसर्‍या प्रकरणात अटक केली जाऊ शकत नाही’, अशा आशयाचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.’’

सीबीआयचे अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले, ‘‘अधिवक्ता पुनाळेकर यांनी कायदेशीर सल्ला देण्याची लक्ष्मणरेषा ओलांडली, तसेच शरद कळसकर यांना बोलावून शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला. सकृतदर्शनी हा एक षड्यंत्राचा भाग असून पुढील अन्वेषण करायचे असल्याने जामीन देण्यात येऊ नये.’’


Multi Language |Offline reading | PDF