पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराचा बंदोबस्त करण्यासाठी दंडशक्तीचा वापर करावा लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर – आज पश्‍चिम बंगालमध्ये समाजा-समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग ही तर लोकशाहीची थट्टा आहे. काही शक्ती तेथे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक पराभव सहन होणे ही चांगली गोष्ट नाही. एकीकडे देश तोडणार्‍यांविरुद्ध लढत असल्याचा देखावा करायचा आणि दुसरीकडे समाज समाजाला लढवून आपली राजकीय पोळी शेकायची हे चांगले नाही. पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला दंडशक्तीचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. येथील रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षावर्गाच्या समारोपप्रसंगी भागवत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भारताला विकसित होऊ न देण्यासाठी जगात अनेक जण प्रयत्न करत आहेत. आज देश प्रगती करत आहे. अशा वेळी आपसातील हे भांडण देशाचे अहित पहाणार्‍यांसाठी लाभाचे ठरेल. सरकारकडून आता पुन्हा नव्याने अपेक्षा वाढल्या आहेत, त्या त्यांना पूर्ण कराव्या लागतील.


Multi Language |Offline reading | PDF