५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सांगली येथील चि. यशोधन निषाद जोशी (वय ३ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. यशोधन निषाद जोशी हा एक आहे !

चि. यशोधन जोशी

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

चि. यशोधन निषाद जोशी याच्याविषयी त्याच्या आई-वडिलांना आणि कुटुंबियांना लक्षात आलेली त्याची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. यशोधन निषाद जोशी याला सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

१. जन्मापूर्वी

१ अ. कोणतेही शारीरिक त्रास न होणे : ‘माझ्या पहिल्या अपत्याच्या (शुभंकरच्या) वेळी मला चक्कर येणे आणि उलट्या होणे असे त्रास झाले होते. या वेळी असे त्रास झाले, तर ‘आमची (माझी आणि मोठा मुलगा शुभंकर याची) काळजी कोण घेईल ?’, असे माझ्या यजमानांना वाटत होते; पण देवाच्या कृपेने या वेळी कोणताही त्रास झाला नाही. या काळात माझ्याजवळ कोणी नसल्यामुळे घरातील आणि बाहेरील सर्व कामे मला माझ्या मोठ्या मुलाला समवेत घेऊन करावी लागत होती. काही वेळा ८ व्या मासांतही मला गाडी चालवावी लागत होती, तरीही मला कधीही काही त्रास झाला नाही. त्यासाठी मी ईश्‍वरचरणी कृतज्ञ आहे.

१ आ. पू. नंदूदादांंनी ‘बाळ आमचे आहे’, असे सांगितल्याने सर्वांची काळजी दूर होणे : दिवस गेल्यानंतर घरच्यांना ‘माझा मोठा मुलगा दोनच वर्षांचा असल्यामुळे मला दोघांना सांभाळणे अवघड होईल’, असे वाटत होते. याविषयी आम्ही पू. नंदूदादा (संत भक्तराज महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव) यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘ते बाळ आमचे आहे. त्याचे सर्व दायित्व माझे आहे.’’ त्यांनी असे सांगितल्याने आमची सर्व चिंता दूर झाली. या काळात पू. नंदूदादांंनी बर्‍याच वेळा भ्रमणभाष करून माझी चौकशी केली.

१ इ. ग्रंथांचे वाचन करतांना प्रथम बाळाची हालचाल जाणवणे : दिवस गेल्यानंतर ३ – ४ मास होऊनही बाळाची काही हालचाल जाणवत नव्हती. मी प्रतिवर्षाप्रमाणे श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘गजानन महाराज विजय’ या ग्रंथाच्या पारायणास प्रारंभ केला आणि पहिलाच अध्याय वाचतांना मला बाळाची हालचाल जाणवली.

१ ई. ‘मला दिवस गेले आहेत’, हे माहीत नसल्यामुळे मी नवरात्रीचे ९ दिवस उपवास केले, तरीही मला भुकेची कधीही जाणीव झाली नाही.

१ उ. २ – ३ वेळा पडूनही देवाने रक्षण करणे : मी गरोदर असतांना घरात २ – ३ वेळा (एकदा ८ व्या मासात) पाय घसरून पडले, तरी मला किंवा बाळाला काही इजा झाली नाही.

१ ऊ. नवव्या मासाच्या पडताळणीनंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘२ -३ दिवसांत शस्त्रकर्म करावे लागेल.’’ त्या वेळी पू. नंदूदादांना विचारून आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे जन्म दिनांक आणि वेळ ठरवली.

१ ए. भजनामुळे मनावरील ताण हलका होणे : शस्त्रकर्माच्या आदल्या रात्री रुग्णालयात भरती झाल्यानंतर मला भीती वाटत होती. त्या वेळी मी स्वामी समर्थांचे ‘निःशंक होई रे मना’ हे भजन रात्रभर ऐकत होते. त्यामुळे माझ्या मनावरील ताण हलका झाला. शस्त्रकर्माच्या वेळी मी पूर्ण शुद्धीत असूनसुद्धा माझा रक्तदाब सर्वसाधारण होता.

२. जन्मानंतर (जन्म ते सव्वा मास)

अ. जन्म झाला त्या दिवशी यशोधन उपायांसाठी सांगितलेल्या नाममुद्रा करत होता. (त्या मुद्रा सांगितलेल्या आहेत, हे मला माहीत नव्हते.)

आ. त्याच्या कपाळावर नाम लावल्यासारखी खूण आहे.

इ. ‘पू. गोखले महाराजांना मी गरोदर आहे’, हे माहीत नसतांनाही त्यांनी माझ्या दिराच्या मित्राजवळ ‘प्राचीला मुलगा झाला कि मुलगी झाली ?’ हे विचारून बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ई. सोलापूरला असतांना यशोधन सव्वा मास प्रतिदिन रात्री जागायचा. अकोल्याला सासरी आल्यानंतर मी त्याला सांगितले, ‘‘आज रात्री जागू नकोस. उद्या आबांना सकाळी दैनिकाची सेवा आहे.’’ त्या रात्री तो शांत झोपला.

३. वय २ मास ते ४ मास

अ. समजूतदारपणा

१. यशोधन २ मासांचा (महिन्यांचा) असतांना मोठ्या मुलाला दम्याचा त्रास झाला, त्या वेळी मी यशोधनला सांगितले, ‘‘आज तू त्रास देऊ नकोस. शांत झोप.’’ त्या वेळी तो रात्री शांत झोपून सकाळी ६ वाजताच उठला.

२. यशोधन साडेतीन मासांचा असतांना माझ्या मोठ्या मुलाला रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी तो शेजार्‍यांजवळ, तसेच माझ्या बहिणीजवळ ४ ते ५ घंटे व्यवस्थित राहिला.

आ. यशोधन अडीच मासांचा असतांना कृष्ण जन्माष्टमीला त्याला कृष्णासारखा पोषाख घातला. त्या वेळी तो पुष्कळ आनंदी होता आणि हसत होता.

इ. यशोधन पायाचा अंगठा तोंडात घालतो, त्या वेळी तो बाळकृष्णासारखा भासतो.

ई. यशोधन ३ मासांचा असतांना १ – २ वेळा पलंगावरून पडला, तरी तो फारसा रडला नाही.

४. ७ मास ते १ वर्ष

अ. यशोधन ७ मासांचा असतांना आम्ही कांदळी आश्रमात ५ – ६ दिवस सेवा करण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी त्याने मला काही त्रास दिला नाही. तो कोणाजवळही रहात होता आणि मला सेवा करू देत होता.

आ. गुरुपौर्णिमेनिमित्त मी कांदळी आश्रमात गेले होते. तिथे श्री अनंतानंद साईशबाबांचे नातू आले होते. ते यशोधनला जवळ घेऊन म्हणाले, ‘‘मेरठ चलेगा क्या बडे बाबाके पास ?’’ त्यानंतर तो माझ्याकडे यायला सिद्ध नव्हता.

इ. यशोधन हसरा आहे. तो अंघोळ करतांना कधीच रडत नाही. केवळ भूक लागली किंवा झोप आली, तरच तो रडतो. तो सर्वांकडे बघून हसून प्रत्येकाशी लगेच जवळीक साधतो. त्याला ओळख लागत नाही.

५. १ वर्ष ते सव्वा वर्ष

अ. यशोधन पूजा करतांना बाजूला उभा रहातो. त्याला आरती करायला आवडते. तो त्या वेळी टाळ्या वाजवतो. त्याला टिळा लावायला आवडतो.

आ. त्याला खाण्यासाठी काही आणले की, तो मांडी घालून खाली बसतो आणि हात जोडून ‘प्रार्थना म्हणा’, अशी आम्हाला आठवण करून देतो.

इ. त्याला संत भक्तराज महाराज यांची भजने आवडतात. कधी कधी तो भजनांवर नाचतो. भजन लावल्यानंतर तो रडत असला, तरी लगेच शांत होतो.

ई. यशोधन सव्वा वर्षाचा असतांना आम्ही नरसोबाच्यावाडीला दत्तदर्शनाला गेलो होतो. त्या वेळी त्याने प्रत्येकासमवेत ८ ते ९ वेळा डोके टेकवून नमस्कार केला.

उ. यशोधनला पुस्तक दिले की, तो पुस्तकाचे पान पालटतांना व्यवस्थित हाताळतो. तो पुस्तक फाडत नाही.

६. सव्वा ते दीड वर्ष

६ अ. उत्तम निरीक्षणक्षमता : त्याचे वडील चारचाकी चालवतांना तो नीट निरीक्षण करतो आणि नंतर गाडी चालवण्याची कृती करतो. तो कोणतीही गोल वस्तू घेऊन चक्र फिरवल्यासारखी कृती करतो.’

– सौ. प्राची निषाद जोशी (यशोधनची आई)

६ आ. ‘मी प्रतिदिन सकाळी नित्य उपासनेसाठी २० ते २५ मिनिटे देवासमोर बसतो. त्या वेळी यशोधन माझ्या मांडीवर बसतो. मी जे जे करीन, ते सर्व तो करतो. तो माझ्यासारखा कान पकडून देवाला नमस्कार करतो.’ – श्री. निषाद वसंत जोशी (यशोधनचे बाबा)

६ इ. उपाय करायला आवडणे : ‘त्याला कापराचे उपाय करायला आवडते. उपाय करतांना, तसेच उदबत्तीचा धूर दाखवतांना तो शांत उभा रहातो.

६ ई. राष्ट्रपुरुष, तसेच देवांच्या दूरदर्शन मालिकांची शीर्षकगीते आवडणे : त्याला संभाजी महाराज, बाळूमामा, तसेच विठुमाऊली या मालिकांची शीर्षकगीते आवडतात. तो ती ऐकण्यासाठी बसतो.

६ उ. पक्षी आणि प्राणी यांच्यावरील प्रेम : त्याला चिमणी, कावळा, कबुतर, कुत्रा, गाय यांपैकी कोणी दिसले की, तो हात हालवून त्यांना ‘ये, ये’, म्हणतो. तसेच त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या दिशेने धावतो.’

६ उ. कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्ये

१. ‘चि. यशोधनला घेतल्यावर माझे मन आनंदी होते आणि मला शांत वाटते.’ – सौ. गौरी विद्याधर जोशी (मावशी)

२. ‘यशोधन दीड मासाचा असतांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या, प.पू. निकालस महाराजांच्या आणि श्रीकृष्णाच्या छायाचित्रांशी बोलायचा.

३. एकदा यशोधनला झोप आली; म्हणून तो रडत होता. त्याचे लक्ष संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे गेले आणि तो त्यांच्याकडे पाहून हसून त्यांच्याशी बोलू लागला.

४. राखीपौर्णिमेला ग्रहण होते. त्या वेळी ४ घंटे नामजप करायचा होता; पण सतत येणार्‍या पाहुण्यांमुळे माझा नामजप १ घंटाच झाला होता. त्या रात्री यशोधन झोपत नव्हता; म्हणून त्याला पाळण्यात घालून मी झोका देत असतांना मी नामजप केला. यशोधन झोपल्यानंतर मी वेळ पाहिली, तर माझा ४ घंटे नामजप पूर्ण झाला होता. त्या वेळी मला गुरुंविषयी फार कृतज्ञता वाटली.’

– सौ. उषा शरद किटकरू (आजी (आईची आई))

५. ‘यशोधन चालतांना किंवा पळतांना फार सावध असतो. त्यामुळे तो फार अल्प वेळा पडतो.

६. एकदा आम्ही चारचाकीतून बाहेर जात होतो. तेव्हा यशोधनला इजा झाली होती; म्हणून तो चिडचिड करत होता. त्या वेळी संत भक्तराज महाराज यांचे भजन लावल्यानंतर तो एकदम शांत होऊन भजन ऐकू लागला.’

– सौ. मेधा वसंत जोशी (आजी (वडिलांची आई))

७. स्वभावदोष

१. ‘यशोधनला एखादी गोष्ट हवी असेल आणि ती दिली नाही, तर तो हातातील वस्तू फेकतो.

२. तो त्याच्या मोठ्या भावाचे (शुभंकरचे) केस ओढतो, त्याला मारतो आणि तो जर त्याला रागावला, तर तो जोरात रडतो.’

– सौ. प्राची निषाद जोशी (यशोधनची आई), सांगली

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF