५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. अनिकेत धवस (वय १६ वर्षे) याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अनिकेत धवस हा एक आहे !

कु. अनिकेत धवस

(वर्ष २०१५ मध्ये अनिकेतची ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती.)

‘कु. अनिकेत धवस (वय १६ वर्षे) याच्याशी माझा परिचय सनातनच्या रामनाथी (गोवा) आश्रमात झाला. त्याच्याशी बोलल्यावर ‘ त्याच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे’, असे माझ्या लक्षात आले. एवढ्या लहान वयातही अनिकेतकडून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला अनिकेतकडून शिकायला मिळालेली सूत्रे, त्याने केलेले प्रयत्न आणि त्याला आलेल्या अनुभूती देत आहे.

१. गुणवृद्धीसाठी अनिकेतने केलेले प्रयत्न

१ अ. प्रेमभाव वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न : अलीकडेच अनिकेतचे आजी-आजोबा गोव्यात आले होते. ते गोव्यात प्रथमच येणार होते. त्यांच्याबद्दलचा प्रेमभाव वाढवण्यासाठी ते येण्यापूर्वीच अनिकेतने पुढील प्रयत्न केले. प्रारंभी त्याने आश्रमातील सर्व साधकांविषयी प्रेमभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आश्रमातच नव्हे, तर कुटुंबियांशीही प्रेमाने वागण्याचे महत्त्व त्याच्या लक्षात आल्यामुळे त्याचे आजी-आजोबा आलेल्या वेळी एरव्ही आश्रमात पूर्ण दिवस रहाणारा अनिकेत घरी राहिला. त्यांना अधिकाधिक वेळ देणे, त्यांना काय ‘हवे-नको’ ते पहाणे इत्यादी प्रयत्न त्याने जाणीवपूर्वक केले.

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न

२ अ. भीतीवर मात करणे : एकदा मला कार्यशाळेच्या एका सत्रात बोलायचे होते. त्यामुळे मला पुष्कळ ताण आला होता अन् भीतीही वाटत होती. त्या वेळी अनिकेत माझ्या जवळ येऊन म्हणाला, ‘‘मी स्वतः सादरीकरणाची सिद्धता करतांना आणि प्रत्यक्षात ते सादर करतांना पुढीलप्रमाणे भाव ठेवला होता, ‘मी हे सादरीकरण श्रीकृष्णासमोर करत आहे. या सत्राला उपस्थित रहाणारे सर्वजण श्रीकृष्णाचीच रूपे आहेत. श्रीकृष्णच मला त्यांच्या रूपाने प्रश्‍न विचारणार आहे आणि माझ्यातील श्रीकृष्ण माझ्या माध्यमातून त्याची उत्तरे देणार आहे.’ त्याच्या बोलण्यामुळे माझा ताण न्यून होण्यास साहाय्य झाले.

२ आ. शारीरिक त्रासाचे गार्‍हाणे न करणे

२ आ १. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे त्रास होत असतांनाही सेवा एकाग्रतेने होण्यासाठी अनिकेतने भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न : उन्हाळ्यात पुष्कळ उकडते. यामुळे माझी चिडचिड होऊन मी काही शारीरिक सेवा एकाग्रतेने करू शकत नव्हते. त्याविषयी मी अनिकेतशी बोलले. त्या वेळी तो मला म्हणाला, ‘‘जेव्हा मला पुष्कळ उकडत असेल किंवा मी दमलो असेन, तेव्हा मी असा विचार करतो, ‘ईश्‍वर मला पुष्कळ चैतन्य, आनंद अन् सेवा करण्याची संधी देत आहे आणि मी मात्र उकाड्याविषयी गार्‍हाणे (तक्रार) करत आहे ! मला माझे शरीर परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी पूर्णपणे अर्पण करायचे आहे, तर मी उकाडा किंवा थकवा यांविषयी गार्‍हाणे कसा काय करत आहे ? या लहान-लहान गोष्टी मला परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करण्यापासून थांबवू शकत नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांना स्वतःला कित्येक शारीरिक त्रास होत असतात; पण त्यांना साधकांच्या प्रगतीची तीव्र तळमळ असल्यामुळे ते याविषयी कधीही गार्‍हाणे करत नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांची सेवा करण्याची माझी तळमळ इतकी तीव्र असली पाहिजे की, कोणताही शारीरिक त्रास, उकाडा वा इतर कोणत्याही समस्या मला सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत.’’

२ इ. ‘प्रतिमा जपणे’ या अहंच्या पैलूवर मात करतांना ‘प्रत्येक जण श्रीकृष्ण आहे’, असा भाव ठेवल्याने चुका मनमोकळेपणाने सांगता येणे : अनिकेतमधील ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषामुळे त्याला मनमोकळेपणाने बोलणे जमत नव्हते. अशा वेळी ‘प्रत्येक व्यक्ती ही श्रीकृष्णच आहे’, असा भाव त्याने ठेवला, उदा. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सत्संगात अनिकेतला त्याच्यातील ‘प्रतिमा जपणे’ या स्वभावदोषामुळे चुका स्वीकारता येत नव्हत्या. त्या वेळी त्याने ‘आसंदीवर बसलेला प्रत्येक साधक श्रीकृष्ण आहे’, असा भाव ठेवल्यामुळे त्याला स्वतःच्या चुका मनमोकळेपणाने सांगता आल्या. ‘प्रत्येक जण श्रीकृष्ण आहे’, असा भाव ठेवल्यामुळे सर्वकाही सोपे होते’, असे अनिकेतला आता वाटते.

२ ई. परिस्थिती स्वीकारता येण्यासाठी परिस्थितीतील श्रीकृष्णाला पहाण्याचा प्रयत्न करणे : एकदा अनिकेतचा परिस्थिती स्वीकारण्यात संघर्ष होत होता. अशा स्थितीत एके दिवशी नामजप करतांना त्याच्या मनात पुढील विचार आले, ‘साधकांची साधना व्हावी आणि त्यांची स्वीकारण्याची वृत्ती वाढावी’, अशी श्रीकृष्णाचीच तीव्र तळमळ असतेे. ‘प्रत्येक क्षणी आपण त्याच्या समवेत अन् तो आपल्या समवेत असावा’, अशी त्याची इच्छा असते. खरेतर त्या इच्छेमुळेच तो परिस्थिती निर्माण करत नाही, तर तो स्वतःच परिस्थिती होतो. त्या परिस्थितीच्या माध्यमातून त्याला आपल्या समवेत रहायचे असते; पण आपण त्याला त्या परिस्थितीत पहात नाही आणि ती स्वीकारत नाही. परिणामी आपल्याला आनंद मिळत नाही. ‘परिस्थिती कोणतीही असू दे, त्यातच श्रीकृष्ण आहे’, हे स्वीकारून त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. परिस्थितीच्या रूपात तो आपल्याला चांगली संधी देत असतोे. प्रत्येक परिस्थिती हा त्याच्याकडून मिळणारा कृपाशीर्वाद असतोे. आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यात श्रीकृष्णाला पाहिल्यास आपले शेकडो जन्मांचे कुसंस्कार नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आपण केवळ परिस्थितीत श्रीकृष्णाला पहाण्याच्या दृष्टीने केलेल्या लहानशा प्रयत्नानेसुद्धा प्रीतीचा सागर असलेला श्रीकृष्ण आपल्याला जवळ घेईल अन् त्यामुळे आपल्याला आनंद मिळेल.’

२ उ. कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदी रहाण्याचा प्रयत्न केल्याने निरुत्साह न वाटणे : निरुत्साह वाटत असतांना अनिकेतने केलेले प्रयत्न त्याच्याच शब्दांत देत आहे. ‘एकदा मी निराश, तणावग्रस्त, गोंधळलेल्या स्थितीत होतो. त्यामुळे मला काहीही करावेसे वाटत नव्हते. त्या वेळी मी स्वतःशी ठरवले, ‘मी सकारात्मक राहीन.’ माझे मन कितीही हट्टी असले, तरी मी सकारात्मकच राहीन. त्याचसमवेत ‘मी आनंदी राहीन’, अशी मी अपेक्षा केली नाही. त्यानंतर हळूहळू मला पुष्कळ बरे वाटू लागले. एके दिवशी आश्रमातील भोजनकक्षात मला एका काकूंनी सहजपणे ‘‘परीक्षा झाली का ?’’, असे विचारल्यावर मी ‘नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा त्या काकू म्हणाल्या, ‘‘प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर ‘हा शाळेतून कधी मुक्त होणार ?’, असे विचार माझ्या मनात येतात.’’ त्या वेळी मला त्या काकूंमध्ये पुष्कळ भाव आणि प्रीती जाणवली. ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णच त्यांच्या रूपात माझ्याशी बोलत असून तोही माझी शाळा संपण्याची वाट पहात आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर माझा विश्‍वास आणि उत्साह वाढला. ‘निरुत्साही वाटत असतांना ‘मी आनंदी नाही’, याविषयी वाईट वाटून न घेता आणि कोणतीही अपेक्षा न करता आनंदी रहाण्यासाठी केलेले प्रयत्न ईश्‍वराला पुष्कळ आवडतात. ‘आपण केवळ एखादा प्रयत्न केला, तरी ईश्‍वर आपल्याला पुष्कळ आनंद  देतो’, हे सूत्र मला यातून शिकायला मिळाले.’

३. भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न

३ अ. आरंभी लहान लहान गोष्टींत भाव ठेवणे, नंतर देवाला आठवून त्याचे रूप मनात आणण्याचा प्रयत्न केल्याने भावाच्या स्थितीत रहाण्याचा कालावधी वाढणे : भावजागृतीसाठीचे प्रयत्न करत असतांना अनिकेतला स्वतःच्या मनाशी पुष्कळ संघर्ष करावा लागला. प्रारंभी तो छोट्या-छोट्या गोष्टींत भाव ठेवण्याचा प्रयत्न करत असे; परंतु त्या वेळी त्याचा मनाशी पुष्कळ संघर्ष होत असे. त्याच्या मनात देवाचे विचार येत नसत. उलट अनावश्यक विचारांमध्ये रमण्याची त्याची इच्छा होत असे; मात्र ‘काही क्षण देवाला आठवायचे. त्याचे दिव्य रूप मनात आणायचे’, यांसारखे लहान-लहान प्रयत्न केल्यामुळेच त्याला लाभ झाला. हळूहळू भावाच्या स्थितीत रहाण्याचा त्याचा कालावधी वाढला. त्यामुळे त्याचा ताण आणि काळजी न्यून झाली.  त्याच्या मते ‘मन हे साधक आणि भाव यांतील भिंत आहे. जेव्हा आपण भावजागृतीसाठीचे प्रयत्न करतो, तेव्हा आपण एक प्रकारे हातोड्याने ती भिंत तोडण्याचा प्रयत्न करतो. आपण सातत्याने हातोड्याने मारत राहिलो, तर ती भिंत नक्कीच तुटेल.’

३ आ. साधकांकडे पाहून भावजागृती होण्यासाठी ‘प्रत्येक साधकात ईश्‍वर आहे’, असा भाव ठेवणे : एकदा अनिकेत आश्रमातील मार्गिकेतून जात असतांना समोरून सद्गुरु (सौ.) बिंदाताई आल्या. त्या त्याच्याकडे पाहून हसल्या आणि अनिकेतचा भाव जागृत झाला. त्या वेळी अनिकेतच्या मनात आले, ‘जर सर्व साधकांमध्ये परात्पर गुरु डॉक्टर आणि ईश्‍वर आहेत, तर त्यांच्याकडे पाहून माझा भाव जागृत का होत नाही ?’  त्यानंतर त्याने ‘प्रत्येक साधकामध्ये ईश्‍वर आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करायचे ठरवले.

३ इ. बहिणीची सेवा करतांना ‘श्रीकृष्णाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे : स्वतःच्या लहान बहिणीची शाळेला जाण्याची सिद्धता करतांना तो सकाळी बहिणीला उठवण्यापासून ते तिला जेवायला देण्यापर्यंत सर्वकाही करतो. तेव्हा तो ‘मी श्रीकृष्णाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवतो.

४. आज्ञापालन करणे

‘आज्ञापालन’ हा शिष्याचा प्रमुख गुण असतो. हा गुण अनिकेतमध्ये आहे. तो केवळ आपल्या आई-वडिलांचेच नव्हे, तर सहसाधकांचेही आज्ञापालन करतो.

५. शिबिरात सहभागी होण्यामुळे झालेला लाभ

एकदा अनिकेत मला म्हणाला, ‘‘पूर्वी एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिरासाठी मी आई-वडिलांसमवेत अमेरिकेहून येत असे; मात्र त्या वेळी मी खेळण्यात पुष्कळ वेळ वाया घालवत असे. आता आम्ही पूर्ण दिवस आश्रमातच असतो. या वर्षी माझ्या बाबांनी सांगितल्यामुळे मी शिबिरात सहभागी झालो. त्यामुळे मला पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला मिळाली.’ हे सांगतांना केवळ अनिकेतचाच नाही, तर शिबिराला उपस्थित इतर साधकांचाही भाव जागृत झाला.

६. अनिकेतला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

६ अ. आरतीच्या वेळी शंखनाद ऐकल्यावर महाभारत युद्धाची आठवण होणे, ‘श्रीकृष्ण त्याच्या रथात उभा राहून शंख वाजवत असून सहस्रो साधक त्याच्यामागे सैनिकांप्रमाणे उभे राहून आपापल्या मनाच्या विरोधात युद्ध करायला सज्ज झाले आहेत’, असे जाणवणे : अनिकेतने सांगितले, ‘एकदा आश्रमातील आरतीच्या वेळी केलेला शंखनाद ऐकतांना मला महाभारतातील युद्ध आरंभ होण्यापूर्वी आणि संध्याकाळी युद्ध समाप्त होण्यापूर्वी करत असलेल्या शंखनादाची आठवण झाली. त्या वेळी ‘श्रीकृष्ण त्याच्या रथात उभा राहून शंख वाजवत असून आपण सहस्रो साधक त्याच्यामागे सैनिकांप्रमाणे उभे राहून आपापल्या मनाच्या विरोधात युद्ध करायला सज्ज झालो आहोत’, असे मला जाणवले. ‘मनाच्या विरोधातील या युद्धाचे नेतृत्व श्रीकृष्ण करत असल्यामुळे मला निश्‍चिंत वाटले.’

६ आ. पूर्वी आरतीनंतर सर्वांना तीर्थ देण्याचा कंटाळा येणे आणि एकदा आरतीला उपस्थित असलेल्यांमध्ये श्रीकृष्णच असून सर्वांनी तीर्थ घेण्यासाठी पुढे केलेले हात श्रीकृष्णाच्या हातांप्रमाणे मऊ अन् निळ्या रंगांचे असल्याचे दिसणे आणि त्या वेळी सर्वांना तीर्थ देतांना पुष्कळ आनंद मिळणे : ‘एकदा आश्रमात होणार्‍या आरतीला २० – २५ पाहुणे उपस्थित होते. मी त्या सर्वांना तीर्थ देत होतो. सर्वजण तीर्थ घेण्यासाठी थांबले होते. पूर्वी मला तीर्थ देण्याचा कंटाळा येत असे. ‘आपल्या हातून तीर्थ सांडेल का ?’, असा विचार येऊन ताणही येत असे; परंतु त्या दिवशी मी ‘तेथे उपस्थित असलेला प्रत्येक जण श्रीकृष्ण आहे’, असा भाव ठेवला होता. ‘उपस्थितांनी तीर्थासाठी पुढे केलेले हात श्रीकृष्णाचेच मऊ आणि निळ्या रंगाचे हात आहेत’, अशी मी कल्पना केली. त्यामुळे मला प्रत्येक हात पुष्कळ सुंदर दिसत होता अन् प्रत्येक हातावर तीर्थ देतांना मला फार आनंद मिळत होता. त्यासाठी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते.’

अनिकेत मला साधनेसाठी त्याच्याकडून होणारे प्रयत्न वेळोवेळी सांगत होता. स्वतःचे प्रयत्न सांगण्यामागे त्याची ‘सर्व साधकांना साधनेत साहाय्य मिळून लवकरात लवकर सर्वजण ईश्‍वराशी एकरूप व्हावेत’, अशी तळमळ असल्याचे मला जाणवत होते. त्याच्या या प्रयत्नांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘अनिकेत माझ्यापेक्षा वयाने पुष्कळ लहान असला, तरी आध्यात्मिकदृष्ट्या तो पुष्कळ प्रगल्भ आहे’, असे दाखवून दिले. अनिकेतसारखा आध्यात्मिक भाऊ देऊन त्याच्याकडून मला पुष्कळ शिकता आले, यासाठी मी श्रीकृष्णाच्या पावन चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु.  रोशेल नाथन्, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF