राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची निवड झाल्याविषयी शिवसेना पक्षप्रमुखांकडून सत्कार !

कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) – कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सलग दोन वेळा मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून येणारे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पदास मंत्रीपदाचा दर्जा आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सामान्य कार्यकर्ता ते आमदार अशी मुसंडी मारणार्‍या श्री. राजेश क्षीरसागर यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. या निवडीमुळे शिवसैनिक उत्साही झाले आहेत. कोल्हापुरात शिवसेनेचे  ६ आमदार असून दोन खासदार असल्याने सेनेला कोणते पद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.

शिवसैनिकांकडून कोल्हापुरात साखर-पेढे वाटप

कोल्हापूर, १७ जून (वार्ता.) – कोल्हापूर शहराचे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर निवड झाल्यावर शिवसैनिकांनी हलगीच्या गजरात साखर-पेढे वाटून छत्रपती शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. महत्त्वाचे पद सच्च्या कार्यकर्त्याला मिळाल्याची भावना या वेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. आमदार श्री. राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.

प्रथम शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जय भवानी-जय शिवाजी, तसेच अन्य घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख श्री. रविकिरण इंगवले, युवा नेते श्री. ऋतुराज क्षीरसागर, परिवहन सभापती श्री. अभिजित चव्हाण, नगरसेवक श्री. राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश उत्तुरे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF