पैशांसाठी काहीही !

नोंद

मुंबई महानगरात सकाळचा अल्पहार, दुपारचे भोजन आणि अन्य वेळीही चटपटीत खाद्यपदार्थ रस्त्यावरील गाड्यांवर खाणारा मोठा वर्ग आहे. अशा ठिकाणी खाणे काहीजणांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे असते, तर उपहारगृहाच्या व्यतिरिक्त एक वेगळी चव अनुभवण्यासाठी येथे उपस्थिती लावणारे खाद्यप्रेमीही बहुसंख्येने असतात. या गोष्टी खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांच्या पथ्यावर पडणार्‍या आहेत.

बोरीवली रेल्वे स्थानका बाहेर इडली-चटणी या खाद्यपदार्थाची रस्त्यावर विक्री करणारा एक विक्रेता चटणी बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा उपयोग करत असल्याचा ‘व्हिडिओ’ सर्वत्र वेगाने प्रसारित झाला होता. पाणीपुरीच्या पुर्‍या बनवण्याचे पीठ पायाने मळले जाणे, रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थाच्या ‘स्टॉल’वर खाद्यपदार्थ ठेवलेल्या काचेच्या खोक्यात उंदीर फिरणेे, फळे आणि भाज्या यांचे ‘क्रेट’ काँक्रीटीकरण केलेल्या गटारात ठेवले जाणे, आदी ‘व्हिडिओ’ प्रसारित झाले. असे असले तरी नागरिक २-४ दिवस या घटना लक्षात ठेवतात. त्यावर काहीतरी चर्चा करतात आणि शांत बसतात. कठोर कायद्याअभावी यातील दोषी व्यक्तीची अल्पावधीत सुटका होते. थोडक्यात काय होते, तर घटना घडल्यावर तिचा नागरिकांना चटकन् विसर पडतो. एवढी लोकसंख्या आहे, तर कुठेतरी अशा घटना घडणारच, असे सांगणारे महाभागही येथे आहेत. रस्त्यावरील सर्वच खाद्यपदार्थ विक्रेते ग्राहकांची फसवणूक करत असतील, असे नाही; पण जे असे करतात त्यांच्यामुळे इतरांचीही नाहकपणे अपकीर्ती होतेच.

उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करायचा आहे, म्हणून नागरिकांच्या आरोग्याशी खेळून त्यातून उत्पन्न मिळवणे, हे अयोग्यच. रस्त्यावर व्यवसाय करणारा हा कोणी मोठा उद्योगपती नसतो, तर तोही एक सामान्य नागरिकच असतो. त्यामुळे गरिबांच्या व्यथा त्यालाही चांगल्याप्रकारे ज्ञात असतात. आपल्याला गरिबीतून मार्ग काढायचा आहे, म्हणून दुसर्‍यांचा त्यासाठी बळी देण्याचे दुष्कर्म केले जात आहे. चार पैसे अल्प मिळाले, तरी चालतील; पण आपल्याकडे येणार्‍या ग्राहकाला प्रामाणिकपणे सेवा देत आहोत, याचे समाधान वेगळेच असते.

विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा, असे सांगितले जाते; मात्र ज्या गोष्टी पाहण्यास मिळत आहेत, त्यावरून धडा घेत अशा ठिकाणी अन्यही वेळी  खाद्यपदार्थ खायचे का ?, याचा नागरिकांनी विचार करावा. कधीप्रसंगी या गोष्टी जिवावरही बेततात. पावसाळ्यात गलीच्छपणामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने होतो. त्या वेळी रुग्ण संख्येत वाढ झाल्यावर सार्वजनिक रुग्णालयांत उपचारांसाठी प्रचंड गर्दी असते. परिणामी उपचार योग्य वेळेत न मिळाल्याने पुष्कळ हाल होतात. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी बारकाईने विचार करावा. आपल्या आरोग्याची काळजी करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल, तर आवश्यक ती काळजी घेऊन निरोगी रहाण्याकडे लक्ष देणे अपेक्षित !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF