‘पाक’कन्या ‘भारतीय’ कन्यांवर भारी ?

संपादकीय

काश्मीरमध्ये ‘पहिली महिला फुटीरतावादी नेता’ म्हणून ‘सन्मानित’ करण्यात आलेली आणि तेथील जिहादी महिलांची म्होरक्या असलेली आसिया अंद्राबी हिच्या आतंकवादी कुकृत्यांचे नवनवीन किस्से समोर येत आहेत. ‘काश्मीर खोर्‍यात भारत सरकार आणि सैन्य यांच्या विरोधात महिलांची आंदोलने घडवून आणण्यासाठी परदेशातून पैसा मिळत होता’, अशी स्वीकृती तिने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला दिली आहे. आसिया अंद्राबी हिच्या कारवाया केवळ काश्मीर भारतापासून विभाजीत करण्याइतपत मर्यादित नाहीत. तिचा आतंकवाद्यांशी संबंध असून काश्मीरमधील महिला आणि युवक यांची माथी भडकावून त्यांना भारतीय सैन्याच्या विरोधात कारवाया करण्यास ती सातत्याने चिथावणी देत असते. तिने स्थापन केलेली ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ या संघटनेवर भारतात बंदी असून या संघटनेला ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आसिया अंद्राबी हिची अधिक चौकशी केल्यावर तिच्याकडून आणखीही काही धक्कादायक माहिती पुढे येईलच. येथे प्रश्‍न आहे, तो काश्मीरमध्ये फोफावणार्‍या महिला आतंकवादाचा. ‘दुख्तरान-ए-मिल्लत’चा अर्थ ‘राष्ट्राच्या कन्या’ असा होतो. आसिया अंद्राबी आणि तिची जिहादी महिलांची टोळी स्वतःला भारतीय मानत नाहीत. आसिया अंद्राबी नित्यनेमाने १४ ऑगस्ट या दिवशी पाकच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काश्मीरमध्ये पाकचा झेंडा फडकावते. भारताचे अन्न खाऊन शत्रूराष्ट्राशी निष्ठा बाळगणार्‍या या ‘पाकच्या कन्या’ भारताला धोकादायक आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची ‘आतंकवादी’ म्हणून हेटाळणी करणारे अंद्राबी हिच्या जिहादी कारवायांविषयी बोलत नाहीत, हे संतापजनक आहे. त्याही पुढे जाऊन केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात स्त्रीसमानतेच्या गप्पा मारल्या जातात. आतंकवादाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास स्त्री-पुरुष हा भेदभाव करणे चुकीचे ठरेल. आसिया अंद्राबी हिच्या आतंकवादी कारवायांवर दृष्टी फिरवल्यास ‘ती जिहादी आतंकवाद्यांएवढीच धोकादायक आहे’, हे आपल्या लक्षात येते. जिहादी आतंकवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून काश्मीरमध्ये हैदोस घालणार्‍या या महिलांना केवळ जेरबंद करणे पुरेसे नसून त्यांचा पूर्ण निःपात आवश्यक आहे.

कारवाईला विलंब का ?

सध्या काश्मीर खोर्‍यातील महिला आणि लहान मुले हेही भारतीय सैनिकांवर दगडफेक करत आहेत. यामागील कारण समजून घ्यायला हवे. काश्मीरमध्ये ‘दुख्तरान-ए-मिल्लत’चे जाळे गावागावांत पसरले आहे. ‘भारतीय सैनिक हे सैतान आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणे म्हणजे इस्लामने सांगितलेल्या तत्त्वानुसार वाढणे’, अशी शिकवण आसिया अंद्राबी हिच्या ‘दुख्तरान-ए-मिल्लत’कडून दिली जाते. पूर्वी केवळ काश्मिरी युवक आणि मध्यमवयीन धर्मांध रस्त्यावर उतरायचे. आज महिला आणि मुले रस्त्यावर उतरून भारतीय सैन्यावर दगडफेक करण्यामागील डोके हे आसिया अंद्राबी हिचे आहे. कुठल्याही कृतीमागील विचार महत्त्वाचा असतो. काश्मीरमध्ये जिहाद्यांकडून सैन्यावर केलेली दगडफेक रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. ते रोखायचे असतील, तर त्यांची माथी भडकावणार्‍या आसिया अंद्राबी हिच्यासारख्या आतंकवाद्यांना कठोर शिक्षा करायला हवी. आसिया अंद्राबी ही जिहादी आतंकवाद्यांपेक्षा धोकादायक आहे; कारण आतंकवादी बनवण्यासाठी जे युवकांचे ‘ब्रेनवॉश’ करणे आवश्यक असते, ते करण्याचे काम ती करते. सामाजिक माध्यमांचा वापर करून ‘काश्मीर मुक्ती’ किंवा सैन्याच्या विरोधात शस्त्र उचलण्याचे महत्त्व ती मुलांवर बिंबवते. तिच्या वैचारिक आतंकवादामुळे अनेक तरुणांनी जिहादची वाट धरली आहे. आज काही शेकडोंचा जमाव सैन्याच्या समोर येऊन त्यांच्यावर दगड फेकत आहे; मात्र त्याहीपेक्षा सहस्रोंच्या संख्येने जिहादी तरुण हे भारतविरोधी कारवाया करण्यासाठी संधीची वाट पहात आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रथम आसिया अंद्राबी पसरवत असलेला वैचारिक आतंकवाद थांबवायला हवा. त्यासाठी अशांवर कठोर कारवाई हवी. आतापर्यंत आसिया अंद्राबी हिला अनेकदा अटक करण्यात आली; मात्र नंतर सोडून देण्यात आले. सध्या ती तिहार कारागृहात आहे आणि तिची चौकशी होत आहे; मात्र त्याच्या पुढे तिच्यावर काय कारवाई होणार ? आसिया अंद्राबी हिने अनेक वेळा निधी मिळण्यासाठी विदेशात प्रवास केला आहे आणि तोही भारताच्या पासपोर्टवर ! याचा अर्थ भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भारतीय व्यवस्थाच तिला विदेशात जाण्याचा मुक्त परवाना देते ! हे कधी थांबणार ?

हिंदु महिलांचे दायित्व !

जिहादसाठी आयुष्य समर्पित करण्याची सिद्धता आसिया अंद्राबी हिने तरुणपणी केली होती. आज राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ किती हिंदु स्त्रिया तरुण वयात निश्‍चय करतात ? ‘स्वतःचे पाल्य पुष्कळ चांगल्या पद्धतीने व्हिडिओ गेम्स खेळते’, ‘माझ्या मुलांना नट-नट्यांची नावे तोंडपाठ आहेत’ असे अभिमानाने सांगणार्‍या हिंदु महिला आपल्याला पहायला मिळतात. मुलांना नीतीमत्तेचे, धर्मशिक्षणाचे पाठ देण्याऐवजी त्यांना पैसे कमवण्याचे यंत्र समजून त्यांची त्या पद्धतीने जडणघडण करणार्‍या हिंदु मातांची संख्या वाढत आहे. आसिया अंद्राबी हिचा धोका केवळ काश्मीर खोर्‍यापुरसा मर्यादित नाही. ती घडवत असलेले जिहादी आतंकवादी उद्या आपल्या दारापर्यंत येऊन ठेपतील, तेव्हा हिंदु समाज काय करणार आहे ?

जिहादी आतंकवादाच्या विरोधातील लढाई ही सर्वंकष हवी. आतंकवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम राबवून त्यांना ठार मारणे किंवा त्यांना कारागृहात डांबणे, हा त्यांच्या विरोधातील कारवाईचा एक भाग झाला; मात्र तो अपुरा आहे. आसिया अंद्राबी हिच्यासारख्या ‘पाक’ कन्यांमुळे फोफावणारा जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी ‘भारतीय’ कन्यांचे म्हणजे हिंदु महिलांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि त्याहून अधिक आध्यात्मिक सक्षमीकरण अपरिहार्य आहे. त्याचे दायित्व सरकारने घेणे आवश्यक आहे !


Multi Language |Offline reading | PDF