शिवसेनेचे पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’ !

संपादकीय

शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’चा नारा देत अयोध्या गाठली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर कृती म्हणून शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे १८ खासदारांसह अयोध्येला रामललाच्या दर्शनाला गेले. त्यामुळे राममंदिर आंदोलनरूपी निखार्‍यावर पुन्हा एकदा फुंकर मारली गेली आहे. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या आधी राममंदिर उभारण्याच्या प्रश्‍नाला हात घातला. ‘राममंदिर हा सातत्याने निवडणुकांच्या घोषणापत्रापुरता आणि निवडणुका लढवण्यापुरता विषय न रहाता या प्रश्‍नाचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा’, या विचाराने शिवसेनेने या आंदोलनात उडी घेतली. तसा शिवसेनेचा या प्रश्‍नाशी संबंध पुष्कळ जुना आहे. अगदी बाबरीचा ढाचा पडल्यावर त्याचे दायित्व घेण्यापासून ते त्यानंतर उद्भवलेल्या दंगलीत मुंबईत हिंदूंचे रक्षण करण्यापर्यंत शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

राममंदिर हा हिंदूंची अस्मिता आणि श्रद्धा यांचा प्रश्‍न आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानांचे मंदिर बांधण्यासाठी गेली अनेक शतके संघर्ष करावा लागला आहे, हेसुद्धा वास्तव आहे. हा प्रश्‍न हिंदुत्वनिष्ठ संघटना, राजकीय पक्ष यांनी आंदोलन, न्यायालयीन खटले यांद्वारे सोडवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे; मात्र अद्यापही या प्रक्रियेत हिंदूंच्या हाती काही लागलेले नाही. केवळ न्यायालयीन खटल्यांचे पुढील दिनांक ऐकणे एवढेच सध्या हिंदु समाज करत होता. या पार्श्‍वभूमीवर हिंदु मन ओळखून राममंदिराचे सूत्र धसास लावण्यासाठी शिवसेनेने मागील वर्षीपासून हालचाली चालू करणे, हा हिंदूंसाठी निश्‍चितच आशेचा किरण आहे. काहीही कृती न करता निष्क्रीय रहाण्यापेक्षा हातपाय मारत रहाणे केव्हाही श्रेष्ठच ! अनेकांनी शिवसेनेच्या या निर्णयावर टीका केली. ‘निवडणुकीमध्ये मते मिळवण्यासाठीची खेळी’, असे अयोध्या दौर्‍याचे वर्णन केले, तरी सेनेने आक्रमकपणे स्वत:चा नियोजित कार्यक्रम पूर्ण केला. एका पक्षाच्या नेत्याने ‘श्री. उद्धव ठाकरे हे कितीही वेळा अयोध्येला गेले, तरी राममंदिर होणार नाही’, असे म्हटले आहे. हे हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे नाही का ? श्री. ठाकरे यांच्या अयोध्या येथे जाण्याने राममंदिर होईल कि नाही, हे हिंदूंसाठी सूत्र नाही. हिंदूंमध्ये या निमित्ताने होणारी जागृती आणि संघटन हे हिंदूंसाठी अपेक्षित आहे. उत्तरप्रदेशमधील हिंदु समाजामध्ये ‘महाराष्ट्रातील मराठेच राममंदिर बांधू शकतील, असा विश्‍वास वाटतो’, असे त्यापैकी काहींनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे मागील अयोध्या दौर्‍याच्या वेळी सांगितले होते. प्रसारमाध्यमांनी मात्र शिवसेनेच्या या अयोध्यावारीमुळे ‘स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण’, असे चित्र मागील वेळी रंगवले होते. त्याला अयोध्यावासियांच्या अभिप्रायामुळे चाप बसला आहे. राममंदिरासाठी हिंदूंनी शतकानुशतके रक्त सांडले आहे. त्यामुळे हा विषय धगधगता ठेवणे आवश्यकच आहे.

इस्रायलचा आदर्श घ्यावा !

इस्रायलने २ सहस्र वर्षे संघर्ष करून त्यांची जेरूसलेम ही पवित्र भूमी मिळवली. २ वर्षांपूर्वी त्याविषयी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तशी अधिकृत मान्यताच मिळवली. जेरूसलेम तसे ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठीही पवित्र ठिकाण असल्यामुळे त्यांचाही या भूमीवर दावा होता. ही भूमी पुन्हा मिळवण्यासाठी ज्यूंनीही रक्त सांडले होते. त्यांच्या या संघर्षाला काळ आणि चांगले नेतृत्व यांची साथ लाभली अन् ताठ मानेने ज्यूंनी त्यांची भूमी मिळवली. धर्म आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगणार्‍या कणखर शासनकर्त्यांच्या जोरावर त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले.

भारतालाही नरेंद्र मोदींसारखी कार्यक्षम व्यक्ती पंतप्रधान म्हणून दुसर्‍यांदा आणि तीही प्रचंड बहुमताने लाभली आहे. त्यांना मित्रपक्ष शिवसेनेची साथही आहे. त्यामुळे ‘ते राममंदिर उभारणीचे शिवधनुष्य सहज पेलू शकतील’, अशी सर्वसामान्य हिंदूंची भावना आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे शासन सत्तेवर आहे. त्यांनी त्यांच्या काळात श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा केली आहे. ‘राममंदिर होईल’, असा विश्‍वास ते सातत्याने हिंदूंना देत आहेत. या जमेच्या बाजू लक्षात घेता राममंदिर उभारण्याचे काम शिवसेनेने पूर्णत्वास नेण्यास हातभार लावून हिंदु समाजाचे स्वप्न साकार करावे, ही अपेक्षा !

हिंदूंच्या अपेक्षा वाढल्या !

केवळ राममंदिर उभारण्याविषयीच नव्हे, तर हिंदूंच्या रक्षणासंदर्भातही हिंदू शिवसेनेकडे आशेने पहात आहेत. संभाजीनगर येथे एम्आयएम् पक्षाचे इम्तियाज जलील हे केवळ काही सहस्र मतांच्या फरकाने शिवसेनेचे चंद्रकात खैरे यांना पराभूत करून जिंकून आले. वास्तविक येथे एका बंडखोर नेत्यामुळे हिंदूंच्या मतांचे विभाजन झाल्यामुळे जलील यांच्यासारखे कट्टर हिंदुविरोधक निवडून आले. अन्यथा जलील यांचे कर्तृत्व काय ? जलील यांची निवड झाल्यानंतरच धर्मांधांनी संभाजीनगर येथे घातलेला हैदोस, पोलिसांवर हेतूपुरस्सर उधळलेला हिरवा रंग सर्वांना परिचित आहेच. मागे एका प्रकरणात हिंदू आणि धर्मांध यांच्यात झालेल्या वादात पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई केल्यावर जलील यांनी ‘नमाज होऊ द्या, मग पोलिसांना बघून घेऊ !’, असे वक्तव्य केले होते. जे पोलिसांनाही जुमानत नाहीत आणि बघून घेण्याची भाषा करतात, त्यांच्या जिल्ह्यात हिंदूंना जीव मुठीत धरूनच रहावे लागेल. अशा बिकट प्रसंगी ‘घरात घुसून प्रत्यूत्तर देऊ’, असे सांगत संभाजीनगर येथील हिंदूंना शिवसेनेने आश्‍वस्त केले आहे.

सध्या हिंदूंवरील अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. अशा वेळी हिंदूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहाणार्‍या नेतृत्वाची हिंदूंना आवश्यकता आहे. शिवसेना हिंदूंच्या बाजूने खंबीरपणे उभी रहात असल्यामुळे तिच्याकडून हिंदूंच्या अपेक्षा वाढल्या आहेत !


Multi Language |Offline reading | PDF