मानवाधिकार, हिदु धर्म आणि भारत !

‘मानवाधिकार ही जणू पाश्‍चात्त्य आणि युरोपीय देशांकडून जगाला दिली गेलेली संकल्पना आहे’, असा एक समज प्रचलित आहे; पण या समजाला भ्रम म्हणणे अधिक योग्य ठरेल. सध्या ‘मानवाधिकार’ या संकल्पनेच्या अंतर्गत जो विचार केला जातो, त्यापेक्षा कितीतरी सखोल विचार हिंदु धर्मात सांगितलेला आहे. ‘विचारस्वातंत्र्य, विहारस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य अशा काही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन म्हणजे मानवाधिकाराचे हनन’, अशी सध्याची व्याख्या आहे; पण हिंदु धर्मात त्याहीपेक्षा अधिक उन्नत संकल्पना आहेत. हिंदु धर्मात केलेल्या चिंतनामध्ये केवळ मानवांच्या अधिकारांची नाही, तर सर्व सजिवांच्या अधिकारांच्या रक्षणाची संकल्पना आहे. ‘सायंकाळी झाडे किंवा रोपे झोपतात’ म्हणून त्यांना हात न लावणे, आयुर्वेदीय औषधांसाठी काही वनस्पती तोडाव्या लागल्या, तर त्या तोडण्यापूर्वी त्यांची क्षमायाचना करून प्रार्थना करणे, झोपेतून उठल्यावर भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वीची प्रार्थना करून क्षमायाचनापर श्‍लोक म्हणणे, पाळीव प्राण्यांची कौटुंबिक सदस्याप्रमाणे काळजी घेणे; किंबहुना निसर्गाला देव मानून त्याची पूजा करणे, अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. मुळात हिंदु धर्म इतरांच्या अधिकारांविषयी जागृत आहेच; पण त्याहीपेक्षा हिंदु धर्मात इतरांप्रती कृतज्ञतेची भावना सांगितली आहे.

असे असतांना सध्या मानवाधिकारांच्या नावाखाली भारताचे ‘मागास आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकारांवर गदा आणणारे’, असे चित्र रंगवले जात आहे. नुकतेच ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा काश्मीरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मानवाधिकारांच्या नावाखाली भारताच्या अंतर्गत व्यवस्थेत नाक खुपसण्याचा प्रयत्न होता. या पत्रकार परिषदेला प्रशासनाने अनुमती दिली नाही, तो भाग वेगळा ! पण ‘मानवाधिकाराचे रक्षण’ या गोंडस नावाखाली सध्या भारत आणि पर्यायाने हिंदू यांना झोडपण्याचे प्रयत्न होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. ‘हिंदूंना लक्ष्य केले जात आहे’, असे म्हणण्याचे कारण म्हणजे भारत जरी स्वतःला निधर्मी म्हणवत असला, तरी जगाच्या दृष्टीने भारतामध्ये हिंदु धर्मीय बहुसंख्य असल्याने तो हिंदु देश आहे. अशा कथित मानवाधिकार संघटनांकडून ‘या देशात अल्पसंख्यांकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे’, अशी आवई उठवली जात आहे. वास्तविक अल्पसंख्यांकांना राज्यघटनेने जेवढे अधिकार प्रदान केले आहेत, तेवढे अधिकार बहुसंख्यांकांनाही प्रदान केलेले नाहीत. त्यामुळे संकटात आलेच असतील, तर ते अल्पसंख्यांकांचे नाही, तर बहुसंख्यांकांचे अधिकार संकटात आले आहेत. असे असतांनाही काही अर्धसत्य सूत्रांच्या आधारे बहुसंख्य हिंदूंची प्रतिमा राक्षसी म्हणून रंगवणे, हा एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. देशातील तथाकथित बुद्धीवंत, पुरो(अधो)गामी हे या कटाचे भाग आहेत, असेच त्यांचे वर्तन आहे. अशा मानवाधिकारवाल्यांचे खरे स्वरूप जाणणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF