कु. अमृता मुद्गल हिने वाढदिवसानिमित्त देवाच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतापुष्पे !

कु. अमृता मुद्गल

१. ‘लहानपणी कुटुंबियांनी लाड करावेत’, असे वाटणे

‘माझा जन्म कोल्हापूर येथे झाला. मला मोठी बहीण असल्याने घरातील व्यक्तींना ‘मुलगा असावा’, असे वाटत होते. दुसरी मुलगी झाल्यानेे घरी सर्वांना थोडे वाईट वाटले. घरी कोणी माझे लाड किंवा हट्ट पुरवले नाहीत. ‘कोणीतरी माझे लाड करावेत. माझे हट्ट पुरवावेत’, असे मला वाटायचे. देवा, माझ्या जन्मापासून आतापर्यंत तू माझ्यासाठी एवढे केले आहेस की, ते मी कधीच विसरू शकणार नाही.

२. आईने गुरुकृपायोगानुसार साधनेस आरंभ करणे आणि तिने मुलींनाही साधना सांगणे

आईला गुरुकृपायोगानुसार साधना समजल्यावर ती साधना करू लागली. तिने आम्हालाही साधना सांगितली. तेव्हा आई सांगते; म्हणून मी साधना करत होते. एकदा आईने मला सांगितले, ‘‘नेहमी सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करावी. देवाशी बोलावेे. त्याचे साहाय्य घ्यावे. त्याला सर्व कळते. आपण देवालाच सांगायचे.’’

३. शाळेतील स्पर्धेत श्रीकृष्णाने साहाय्य केल्याची आलेली अनुभूती !

एकदा शाळेत लंगडी खेळण्याची स्पर्धा होती. त्यात खरेतर मी प्रथम क्रमांकावर होते; पण मला तिसरा क्रमांक दिला. एका मुलीने फसवून प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा मला फार वाईट वाटले. मी श्रीकृष्णाला म्हणाले, ‘असे कसे झाले ?’ त्या वेळी श्रीकृष्ण मला म्हणाला, ‘थांब. आता बघ मी काय करतो ते.’ नंतर शिक्षकांनी मला पुढे उभे करून त्या मुलीला शेवटी उभे केले. त्या वेळी मला श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता वाटली. यानंतर माझा साधना करण्याचा उत्साह वाढला आणि मला साधनेची आवड निर्माण झाली.

४. आश्रमात रहाण्याची ओढ वाटणे

४ अ. रामनाथी आश्रमात गेल्यावर ‘आश्रम हेच घर आहे’, असे वाटणे : मी वर्ष २०१४ मध्ये रामनाथी आश्रमात ५ दिवसांसाठी गेले होते. तेथे मला चांगले वाटले. ‘आता आश्रम हेच माझे घर आहे’, असे मला वाटू लागले.

४ आ. आश्रमात आनंद मिळत असल्याने आश्रमातच पूर्णवेळ साधना करण्यासाठी रहाणे : नंतर २० दिवसांनी मी सुटीत पुन्हा १ मास (महिना) आश्रमात रहायला आले. तेव्हा मला ‘कपडे कसे धुवायचे ? केसांची सात्त्विक रचना कशी करावी ?,’ तसेच अन्य गोष्टी शिकायला मिळाल्या. मला फार आनंद झाला. मला ‘आता आश्रमातच राहूया’, असे वाटू लागले. मी पूर्णवेळ आश्रमातच रहायला आले. मला देवाप्रती कृतज्ञता वाटली.

४ इ. आश्रमातून घरी जावे लागणे आणि घरी असतांना ‘देव प्रत्येक क्षणी साहाय्य करत आहे’, याची अनुभूती येणे : नंतर काही मासांनी (वर्ष २०१४ मध्ये) काही कारणास्तव आश्रमातून आम्हाला घरी जावे लागले. तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटले. आम्ही घरी असतांना ‘देव आम्हाला प्रत्येक क्षणी साहाय्य करत आहे’, याची आम्ही अनुभूती घेत होतो. तेव्हा ‘देव माझ्या जवळच आहे’, याची मला जाणीव झाली. त्यानंतर एक वर्ष मी घरीच होते.

४ ई. फारसा अभ्यास न करूनही वर्गात दुसरा क्रमांक येणे : पुढील वर्षी माझा फारसा अभ्यास झाला नाही, तरीही देवाच्या कृपेने मला परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले. माझा वर्गात दुसरा क्रमांक आला. तेव्हा मला देवाप्रती फार कृतज्ञता वाटली. ‘वर्ष २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात जायचे’, असे ठरवले.

५. रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्याची संधी मिळणे

वर्ष २०१५ मध्ये आम्ही (आई, मोठी बहीण आणि मी) रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आलो. आश्रमात आल्यावर मला वेगवेगळ्या सेवा देण्यात आल्या.

५ अ. संतांचा सत्संग आणि विविध सेवा देऊन देवाने घडवणे : सत्संग, साधक करत असलेले साधनेचे प्रयत्न आणि विविध प्रकारच्या सेवा यांतून माझ्या साधनेला दिशा मिळाली. मला लहान मुलांसमवेत सेवा करायला मिळाली. त्यातून मला ‘चुकांतून कसे शिकायचे आणि देवाला कसे अनुभवायचे’, हे शिकायला मिळाले. नंतर मला नियोजनाची सेवा आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत सेवा, अशा सेवा करण्याची संधी मिळाली. मला या सेवा करतांना आनंद मिळून मी नकळत घडत गेले. ‘देव माझ्यासाठी किती करत आहे !’, याची मला जाणीव झाली.

६. अनुभूती

मी आश्रमात आल्यावर आरंभी माझे केस मानेपर्यंत लांब होते. आता माझे केस गुडघ्याच्या खाली आहेत.

परात्पर गुरुमाऊली, तुम्ही माझ्यावर करत असलेल्या कृपेचे वर्णन करायला माझी लेखणी तोकडी आहे. मी आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते. देवा, या वर्षात माझ्याकडून साधनेचे प्रयत्न अल्प झाले आणि माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या. मला क्षमा कर.’

– केवळ देवाचे लेकरू,

कु. अमृता मुद्गल (वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.६.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF