अधिवेशनात आवाज उठवून भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांना त्यागपत्र द्यायला लावू ! – धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

अन्य पक्षांतील भ्रष्ट मंत्र्यांविषयी विधान करणारे धनंजय मुंडे हे स्वपक्षातील भ्रष्ट नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्याविषयी काय भूमिका घेणार ?, हेही त्यांनी सांगावे !

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

मुंबई, १६ जून (वार्ता.) – ‘भ्रष्टाचारमुक्त राज्य’ असा केवळ आभास निर्माण करण्यात आला आहे. प्रत्यक्षात भाजपचे अर्धा डझनहून अधिक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकले आहेत. भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पुरावे देऊनही अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. अधिवेशनामध्ये या विरोधात आवाज उठवून आम्ही  भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांना त्यागपत्र द्यायला लावू, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. ‘जनतेचे प्रश्‍न सोडवण्यास शासन अपयशी ठरले असल्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत’, असे मुंडे यांनी या वेळी घोषित केले. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १६ जून या दिवशी विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अन्य नेते उपस्थित होते.

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक ! – अजित पवार

विरोधी पक्षाच्या नेत्यालाच फोडणे (स्वपक्षात घेणे) हे आतापर्यंतच्या विधीमंडळाच्या इतिहासात प्रथमच होत आहे. भाजपकडे बहुमत असूनही त्यांनी जे फोडाफोडीचे राजकारण चालवले आहे, ते लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक आहे. (लोकशाही व्यवस्थेची वारंवार पायमल्ली करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दुसर्‍या पक्षावर टीका करणे हास्यास्पद ! – संपादक) 

काही ठराविक लोकांच्या लाभासाठी शासन चालवले जात आहे ! – बाळासाहेब थोरात, विधीमंडळ पक्षाचे गटनेते, काँग्रेस

आचारसंहितेचे कारण पुढे करून शासनाने राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने उभारलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत. राज्याची स्थिती चिंताजनक झाली असून केवळ काही ठराविक लोकांच्या लाभासाठी शासन चालवले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF