सरकारमधील ६ मंत्र्यांच्या विरोधात पुरावे असतील, तर विरोधकांनी ते मांडावेत ! – मुख्यमंत्री

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ

मुंबई, १६ जून (वार्ता.) – विद्यमान सरकारमधील ६ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांच्याकडे पुरावे आहेत, असा आरोप विरोधी पक्षांतील नेत्यांनी केला असेल, तर त्यांनी पुरावे नक्की मांडावेत. त्याला सरकार प्रतिसाद देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ जूनला सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,

१. विरोधक एकाही मंत्र्याच्या विरोधात यशस्वीपणे पुरावे मांडू शकलेले नाहीत. विरोधक पुरावे नसतांना नुसते आरोप आणि चौकशीची मागणी करतात अन् नंतर चौकशीत मंत्री निर्दोष निघाल्यानंतर त्यांना ‘क्लीन चीट’ दिली म्हणून आरोप करतात.

२. काँग्रेस आघाडीचे १५ वर्षे सरकार होते, त्या वेळी त्यांनी ज्या ज्या समाजाला फसवले, त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम आता आणि पुढेही आम्ही करणार आहोत.

३. पावसाळी अधिवेशनात एकूण २८ विधेयके मांडली जाणार असून त्यामध्ये १३ नवीन विधेयक आहेत. १२ विधेयके विधानसभेत, तर ३ विधान परिषदेत, अशी १५ विधेयके प्रलंबित आहेत. अधिवेशनात दुष्काळावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून चर्चा होईल.

४. शासनाने अनुमाने ४ सहस्र ७०० कोटी रुपयांचे थेट अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले आहे. ३ सहस्र २०० कोटी रुपये विम्याच्या अनुदानाचे वाटप चालू आहे. आवश्यक तेवढ्या चारा छावण्या सिद्ध केल्या आहेत. यामध्ये जनावरांच्या पालनपोषणाचा दर वाढवला आहे. टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे, तसेच चारा छावण्यांच्या नावाखाली भ्रष्टाचार करता येऊ नये, यासाठी जनावरांचे ‘टॅगिंग’ करण्यात आले. प्रथमच छोट्या जनावरांसाठीही चारा छावण्या सिद्ध केल्या आहेत. तसेच पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत १ कोटी २० लक्ष शेतकर्‍यांना थेट निधी देण्याचा निर्णय झाला आहे.

५. अधिवेशनात राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेणारा अर्थसंकल्पही मांडला जाईल. आभासी सरकार असल्याचा विरोधक आरोप करत आहेत; मात्र ते स्वतःच या भ्रमात आहेत. त्यांची भूमीशी नाळ तुटलेली आहे. त्यामुळेच त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत एकही नवीन सूत्र मांडलेले नाही.

अन्य प्रश्‍नोत्तरे

१. मुंबईतील एम्पी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्यावर लोकायुक्तांनी अहवालात कोणता ठपका ठेवला आहे ?

मुख्यमंत्री – लोकायुक्तांचा अहवाल मी मांडणार आहे. त्यांच्या कारर्कीदीत घोटाळा झाल्याचे सांगण्यात येते. मी याचा अहवाल मांडल्यानंतर ‘लोकायुक्तांनी काय म्हटले आहे’, हे नंतर लक्षात येईल. याविषयी आता मी अधिक काही बोलू शकत नाही.

२. मंत्रीमंडळातील चांगल्या ६ मंत्र्यांना का वगळण्यात आले ?

मुख्यमंत्री – मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांना काढण्यात आलेले नाही. भाजप पक्षाने साधक-बाधक चर्चा आणि मंत्रीमंडळात पालट करून नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती म्हणून केलेला हा पालट आहे.

३. भाजप विरोधी पक्षांतील नेत्यांची फोडाफोडी करत आहे का ?

मुख्यमंत्री – विरोधी पक्षांतील नेत्यांना हे विचारले पाहिजे की, त्यांचे नेते त्यांच्यासमवेत रहाण्यास का सिद्ध नाहीत ? त्यांचे लोक त्यांना का सांभाळता येत नाहीत. याचे उत्तर त्यांनी द्यावे. कोणाच्या फोडण्याने कोणी फुटत नसते. विरोधी पक्षांच्या नेतृत्वावर त्यांच्याच पक्षांतील नेत्यांचा विश्‍वास उरलेला नाही.


Multi Language |Offline reading | PDF