सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

कोणत्याही साधनामार्गाने जातांना साधकाला त्या मार्गाचे शब्दजन्य आणि नंतर अनुभूतीजन्य ज्ञान होऊन परिपूर्णता येणे

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘शब्द, शब्दातीत किंवा अनुभूती या माध्यमांतून ज्ञान लाभते. साधनेचे विविध मार्ग असतात. कुणी म्हणतो, ‘मी कर्ममार्गी आहे’, तर कुणी म्हणतो, ‘मी भक्तीमार्गी आहे !’ बरेच जण म्हणतात, ‘ज्ञानमार्ग हा क्लीष्ट असून कोरडेपणा निर्माण करणारा असतो.’ प्रत्यक्षात हे सर्व जण अजाणतेपणी असे म्हणत असतात. ‘कर्म म्हणजे काय ?’ किंवा ‘कर्मफलत्याग म्हणजे काय ?’ याचे ज्ञान साधकाला नसेल, तर तो ‘कर्ममार्गी’ होऊ शकेल का ? एखाद्याला ‘चांगले-वाईट काय ?’, देव-भक्त, तसेच भक्ती यांविषयी शब्दज्ञान किंवा अनुभूती नसेल, तर त्याला ‘भक्तीमार्गी’ म्हणू शकतो का ? कोणत्याही साधनामार्गाने जातांना त्या मार्गाचे शब्दजन्य आणि पुढे अनुभूतीजन्य ज्ञान साधकाला होतच असते. तेव्हाच त्या साधनामार्गाला परिपूर्णता येते; म्हणून अन्य साधनामार्गांत ज्ञानशक्ती अव्यक्त रूपात कार्यरत असते, तर ज्ञानमार्गात कर्म आणि भक्ती अव्यक्त स्वरूपात कार्यरत असते. ‘ज्या ज्ञानमार्गात कर्म आणि भक्ती अव्यक्त स्वरूपात कार्यरत नसतात, तो ज्ञानमार्ग नसून केवळ शब्दजन्य माहितीस्वरूप पांडित्य असते’, हे लक्षात घेतले पाहिजे.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१.७.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF