तक्रार केल्यानंतर ६ मासांनी वाशीच्या उड्डाणपुलावरील पथदिवे दुरुस्त

पायाभूत सुविधांविषयी प्रशासन एवढे उदासीन का आहे ? पथदिवे बंद असल्यावर अपघातांचे प्रमाण वाढून नागरिकांची गैरसोय होऊ शकते, हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे.  ६ मास पाठपुरावा करूनही तत्परतेने २०० पथदिव्यांची दुरुस्ती का होऊ शकत नाही ?

मुंबई – मागील अनेक मासांपासून मुंबई-पुणे महामार्गावरील वाशी खाडीवरच्या उड्डाणपुलाचे सर्व पथदिवे बंद होते. याविषयी नेते नितीन नांदगावकर यांनी संबंधित विभागाकडे तक्रार करून पाठपुरावा केल्यावर ६ मासांनी २०० पैकी केवळ ५२ पथदिवे दुरुस्त करण्यात आले आहेत. नांदगावकर यांनी फेसबूकवर व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

नांदगावकर म्हणाले की, उड्डाणपुलावरील बंद पथदिव्यांचे काम करावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सतत पाठपुरावा केला. या संदर्भात अधिकार्‍यांना भेटून वाशी उड्डाणपुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास आणि अपघात यांविषयीची माहिती दिली. पुलावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणे नागरिकांसाठी असुरक्षित झाले होते. या गोष्टीची नोंद प्रशासनाने घ्यायला हवी होती; मात्र तसे झाले नाही, अशी खंत नांदगावकर यांनी व्यक्त केली. मागील सहा मासांपासून पाठपुरावा केल्यानंतर अखेर १० जून या दिवशी पुन्हा अधिकार्‍यांना भेटून अंतिम मुदत (अल्टीमेटम) देण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF