शाळेच्या पहिल्याच दिवशी अनुदानासाठी शिक्षकांचे आंदोलन

साडेपाच सहस्र शाळा बंद होण्याची चिन्हे !

मुंबई – राज्यातील सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी राज्यातील शेकडो शिक्षक १७ जून या दिवशी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. राज्य कायम विनाअनुदानित-अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गेल्या १९ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेतील शिक्षक अनुदानाची मागणी करत आहेत. शासनाने काही शाळांचे मूल्यांकन करून त्यांना २० टक्के अनुदान दिले; मात्र एकाही शाळेला शंभर टक्के अनुदान मिळाले नाही. पुरेसे अर्थसाहाय्य नसल्यामुळे राज्यातील साधारण साडेपाच सहस्र शाळा येत्या काळात बंद होतील. यातील ८० टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शाळा कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत रेडीज म्हणाले की, शासनाचे मराठीप्रेम बेगडी आहे. कोणतेही अधिवेशन असो शिक्षकांना सतत आंदोलने करावी लागतात. अनुदानाच्या प्रश्‍नावर कृती समितीने नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली; मात्र त्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन करावे लागत आहे.


Multi Language |Offline reading | PDF