सावरकर विचारांच्या संघटनांनी समन्वय साधून मोठे कार्यक्रम करायला हवेत ! – शंकर गोखले, अध्यक्ष, सावरकर साहित्य अभ्यास मंडळ

कल्याण येथे ३१ वे अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन !

बोलतांना श्री. शंकर गोखले, श्री. प्रभाकर संत, श्री. चंद्रशेखर वझे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, आमदार श्री. नरेंद्र पवार आणि कल्याण – डोंबिवलीच्या महापौर सौ. विनिता राणे

कल्याण (स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य नगरी), १६ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार पुढील पिढ्यांत रुजवण्याच्या हेतूने स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाची स्थापना झाली. ‘शाळा तेथे सावरकर’ या उपक्रमाच्या अंतर्गत शाळांमध्ये सावरकरांची प्रतिमा आणि थोडे साहित्य ठेवावे यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. २५० शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. सावरकर विचारांच्या संघटनांनी समन्वय साधून मोठे कार्यक्रम करायला हवे. यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्रापुरते मर्यादित न रहाता संपूर्ण देशात पुढच्या पिढीला सावरकरांचे कार्य कळेल. सर्वांना एकत्र आणण्यासाठी सावरकर साहित्य अभ्यास मंडळ प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री. शंकर गोखले यांनी केले.

स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई यांच्या वतीने येथील के.सी. गांधी ऑडिटोरियम येथे १६ जून या दिवशी ३१ वे अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ सावरकर अभ्यासक आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी भूषवले. संमेलनाचा आरंभ सावरकररचित गीतांच्या कार्यक्रमाने झाला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर सौ. विनिता राणे, भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार, माजी आमदार श्री. प्रभाकर संत, अधिवक्ता सुरेश पटवर्धन, श्री. चंद्रशेखर वझे, स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री. शंकर गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.

‘काश्मीर : वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर लोकप्रभाचे संपादक श्री. विनायक परब यांनी लहान चित्रफितीच्या (क्लिप्सच्या) माध्यमातून काश्मीरच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास, भारतीय सैनिकांना युद्धप्रसंगी येत असलेल्या अडचणी, तसेच पूर्वीच्या सरकारने सैनिकांना दिलेली वागणूक यासंदर्भात माहिती दिली.

यानंतर ‘सावरकर घराण्यातील स्त्रियांचे योगदान’ या विषयावर श्रीमती सुंदराबाई सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सून) आणि सौ. असिलता सावरकर-राजे (स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात) यांच्यासह सौ. साधना जोशी यांनी संवाद साधला.

सौ. असिलता यांनी सांगितले की, पूर्वी सावरकर विचार नाकारणारे सरकार होते, तर ७० वर्षांनी आज पुन्हा याच विचारांवर चालणारे सरकार आले आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते आपल्याला टिकवायला हवे. यासाठीच सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत.

यानंतर ‘भारत महासत्तेच्या दिशेने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर, डॉ. उल्हास कोल्हटकर, डॉ. रत्नाकर फाटक यांनी त्यांची परखड मते मांडली, तर डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर आणि आमदार श्री. नरेंद्र पवार यांच्या भाषणाने संमेलनाचा समारोप झाला.

(सविस्तर वृत्त वाचा लवकरच !)


Multi Language |Offline reading | PDF