गुणरत्नांची खाण असलेले आणि पूर्णवेळ साधना करणारे सुमित सागवेकर, विश्‍वनाथ कुलकर्णी अन् गुरुराज प्रभु हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

गुरूंवर श्रद्धा ठेवून तळमळीने साधना केली । आध्यात्मिक उन्नतीची हीच गुरुकिल्ली ठरली ॥

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – ‘आत्मोद्धार’ हेच कोणत्याही साधकाचे अंतिम ध्येय असते. समष्टीत सेवारत असणार्‍या साधकांनी त्यांच्या प्रयत्नांना व्यष्टी साधनेची, तसेच स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेची जोड दिली, तर हे ध्येय लवकर साध्य होते. याच जोडीला साधनेतील अडथळ्यांवर मात करणे आणि व्यावहारिक प्रलोभनांचा त्याग करून मन, बुद्धी आणि देह ईश्‍वरासाठी झिजवणे, हेही तितकेच महत्त्वाचे असते. ही शिकवण आचरणात आणणार्‍यांचा उद्धार भगवंत करतोच. अनेकविध गुणांनी युक्त असलेल्या आणि पूर्णवेळ साधना करणार्‍या ३ साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या सोहळ्यामुळे याची पुन्हा एकदा प्रचीती आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चालू असलेल्या ‘हिंदु राष्ट्र आणि साधना’ या राष्ट्रीय शिबिरात १२ जून २०१९ या दिवशी मुंबई येथील श्री. सुमित सागवेकर (वय ३४ वर्षे), वाराणसी येथील श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी (वय ३८ वर्षे) आणि श्री. गुरुराज प्रभु (वय ४३ वर्षे) हे ३ साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंदवार्ता दिली. एका संतांच्या वचनाप्रमाणे ‘आनंदाचा सागर नयनी, पहा रे गड्यांनो’, अशीच सर्व साधकांची स्थिती झाली होती. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते श्री. सुमित सागवेकर यांचा, तर पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आणि श्री. गुरुराज प्रभु यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. सुमित सागवेकर यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. नीलेश सिंगबाळ
श्री. गुरुराज प्रभु (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. नीलेश सिंगबाळ

असे उलगडले साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचे गुपित !

१२ जून या दिवशी दुपारच्या सत्रात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी ‘पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतलेल्या साधकांचे प्रयत्न आणि ते अनुभवत असलेली गुरुकृपा’ यांविषयी काही साधकांना मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही साधकांनी ‘पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतांना झालेली विचारप्रक्रिया आणि त्यानंतर मिळत असलेला असीम आनंद’ यांविषयी सांगितले. प्रारंभी मुंबईच्या साधकांनी अनुभव सांगितले. त्यानंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी श्री. सुमित सागवेकर यांना त्यांचे अनुभव सांगायला सांगितले. श्री. सुमित सागवेकर यांनी अत्यंत कृतज्ञतेच्या भावात मनोगत व्यक्त केले. त्यांच्या शब्दाशब्दांतून ‘अपेक्षित गुरुसेवा होत नसल्याची खंत’ आणि ‘गुरूंना अपेक्षित असे प्रयत्न प्राणपणाने करण्याचा घेतलेला ध्यास आणि संतांप्रतीचा कृतज्ञताभाव’ व्यक्त होत होता. मनोगत व्यक्त करून झाल्यानंतर सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘सुमितदादांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे, असे कोणाकोणाला वाटते ?’, असे विचारले. यावर सर्वच साधकांनी हात वर करून तसे वाटत असल्याचे सांगितले. त्याच वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी श्री. सुमित सागवेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. या वेळी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, ‘भगवान श्रीकृष्णाचा विजय असो’, अशा उत्स्फूर्त घोषणा देऊन उपस्थितांनी श्री. सुमित सागवेकर यांना अभिवादन केले.

पू. नीलेश सिंगबाळ यांनी श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांना त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगायला सांगितले. गुरुकार्याचा प्रचंड ध्यास आणि सतत समष्टीचा व्यापक विचार असलेल्या श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी अपेक्षित प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी ‘मी केले’, ‘माझ्यामुळे झाले’, असे वाटण्यापेक्षा ‘मी प्रत्येक ठिकाणी न्यून पडतो’, असे वाटणे आणि त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नरत रहाणे’, हे अंतर्मुखतेचे लक्षण असल्याचे सांगत श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले.

यानंतर आणखी कोण साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणार, याची साधकांना उत्कंठा लागलेली असतांनाच सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी ‘तीन घटना घडणे, हे शुभ आहे’, असे सांंगत आणखी एका साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीचे संकेत दिले. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी त्या साधकाची लहानपणापासूनची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांचा साधनाप्रवास उलगडत ‘तो साधक कोण असेल ?’, असे विचारले. तेव्हा उपस्थित साधकांनी ‘श्री. गुरुराज प्रभु’ असे नाव सांगत तिसर्‍या साधकाचे गुपित अचूक ओळखले. त्यानंतर सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी श्री. गुरुराज प्रभु हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे सांगितले.

आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांची सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये अन् काढलेले गौरवोद्गार

श्री. सुमित सागवेकर

श्री. सुमित सागवेकर

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘श्री. सुमितदादांना ‘मी साधनेत न्यून पडतो. संतांच्या कृपेमुळेच सेवा होत आहे. राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करायला हवे’, असे वाटते. हे एका अंतर्मुख साधकाचे लक्षण आहे. त्यांच्या मनोगतातून कृतज्ञताभाव व्यक्त होत होता. अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी त्यांच्या सूत्रसंचालनाचा श्रोत्यांवर प्रभाव पडत होता. बर्‍याच वेळा ते संहिता न पहाताच उत्स्फूर्त सूत्रसंचालन करायचे. ‘तेव्हा त्यांच्या माध्यमातून देवच बोलत आहे’, असे वाटत होते. ते देत असलेल्या घोषणांमुळे क्षात्रभाव जागृत होतो. ते नेहमी शिकण्याच्या स्थितीत असतात. गेल्या काही मासांमध्ये त्यांचा भाव आणि त्याग वाढला आहे.’

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘पूर्वी श्री. सुमितदादांची स्वभावदोष आणि अहं निमूर्र्लन प्रक्रिया मनापासून होत नव्हती. त्याविषयी जाणीव करून दिल्यावर त्यांना खंत वाटली; पण त्यांनी ते मनापासून स्वीकारले आणि व्यष्टी अन् समष्टी साधनेच्या संदर्भात चांगले प्रयत्न केले. त्यांच्यातील भाव आणि तळमळ यांत पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे. त्यांचा संतांप्रती भाव आहे. त्यांचा लहान बालकाप्रमाणे भाव असल्याने त्यांच्याप्रती वात्सल्यभाव निर्माण होतो. ते उत्तरदायी साधकांशी मोकळेपणाने बोलतात. अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सूत्रसंचालनाची सेवा करतांनाही ते केवळ संहितेपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर सेवा अजून चांगली होण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते.’

३. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

‘श्री. सुमितदादांमध्ये पूर्वीपासूनच पुष्कळ गुण आहेत; पण त्याचा वापर होत नव्हता. त्यांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी त्याग केल्यानंतर त्यांच्या अडचणी दूर झाल्या. त्यांच्यामध्ये कृतज्ञताभावही पुष्कळ आहे. ‘कृतज्ञताभावामुळे ते साधनेत आणखी प्रगती करतील’, असे वाटते.’

४. पू. (सौ.) संगीता जाधव

‘श्री. सुमित यांच्यामध्ये प्रेमभाव, नम्रता आणि जवळीक साधणे हे गुण आहेत. त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची वार्ता ऐकून सर्वच साधकांना आनंद झाला.’

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘नेतृत्व करणे आणि पुढाकार घेऊन सेवा करणे, हे श्री. विश्‍वनाथदादांचे वैशिष्ट्य आहे. ते साधनेसंदर्भात अल्पसंतुष्ट न रहाता प्रत्येक वेळी ‘साधनेत कुठे न्यून पडलो’, याचे चिंतन करतात आणि प्रयत्न करतात. ‘सेवेचा आढावा देणे, विचारून कृती करणे, पुढाकार घेऊन सेवा करणे आणि समष्टीमध्ये (सर्व साधकांसमोर) चुका सांगणे’, हे त्यांचे गुण आहेत.’

 २. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘पूर्वी दादांचे आध्यात्मिक त्रासांचे प्रमाण अधिक होते; पण रामनाथी येथील आश्रमात व्यष्टी साधनेसाठी आल्यावर त्यांनी चांगले प्रयत्न केले. ते जेव्हा अध्यात्म-प्रसारासाठी जाणार होते, तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला अशा ठिकाणी सेवेसाठी पाठवा की, जेथे मी नेहमी सेवारत राहीन.’’ श्री. विश्‍वनाथदादा नेहमी सेवारत असतात. ते एकही क्षण वाया घालवत नाहीत. ते अडचणी मोकळेपणाने सांगतात आणि साहाय्य घेतात. ते चिकाटीने सेवा करतात आणि सर्व संतांशी सहजतेने बोलतात. उत्तर भारतात प्रसारासाठी गेल्यानंतर तेथील साधकांचाही उत्साह वाढला. पूर्वी श्री. विश्‍वनाथदादांचा तोंडवळा गंभीर वाटायचा; पण आता हसरा आणि भावमय वाटतो.’

३. पू. (सौ.) संगीता जाधव

‘पूर्वी दादांना ‘स्वतःचे सर्व प्रयत्न योग्यच चालू आहेत’, असे वाटायचे; पण गेल्या ३ वर्षांत त्यांचा ध्येयाचा ध्यास पुष्कळ वाढला.’

४. पू. नीलेश सिंगबाळ

‘श्री. विश्‍वनाथदादा पुष्कळ उत्साहाने सेवा करतात. ते जेव्हा उत्तर भारतात अध्यात्मप्रसारासाठी आले, तेव्हा गुरुकार्याच्या प्रसारासाठी ‘कुठे जाऊ आणि कुठे नको’, अशी त्यांची स्थिती झाली होती. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शिकून घेतलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया त्यांनी प्रसारातही राबवली. प्रयागराज कुंभमेळ्याच्या वेळी त्यांनी अक्षयवटासमोर डोके टेकवून ‘मला जीवन्मुक्त करा’, अशी प्रार्थना केली होती. ती आज फळास आली. त्यांच्यामध्ये प्रवचन घेणे, सामाजिक माध्यमांतून (सोशल मीडियाच्या माध्यमांतून) धर्मप्रसार करणे, सेवांचे नियोजन करणे, (राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विषयांचे) संहितालेखन करणे, अशी विविध कौशल्ये आहेत.’

श्री. गुरुराज प्रभु

श्री. गुरुराज प्रभु

१. पू. नीलेश सिंगबाळ

‘फार पूर्वी जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले गोव्याला साधनेचे अभ्यासवर्ग घेत होते, तेव्हापासून गुरुराजदादांची साधना चालू आहे. त्या वेळी त्यांचे शिक्षण चालू होते. तेव्हा काही मोजके साधक पूर्णवेळ साधना करत होते. ‘पूर्णवेळ साधना किंवा आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय असते ?’, हेही साधकांना व्यवस्थित ठाऊक नव्हते. त्या काळात केवळ गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे गुरुराजदादा पूर्णवेळ साधक झाले. गोव्याला असतांना ते मुद्रणालयात सेवेला जायचे आणि दायित्व घेऊन सेवा करायचे. नंतर आवश्यकतेनुसार त्यांनी गुजरात, राजस्थान, बिहार, मथुरा, उज्जैन अशा विविध ठिकाणी अध्यात्मप्रसाराची सेवा केली. त्यांनी प्रसारात स्वत:कडे कमीपणा घेऊन सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले, तसेच सर्वांना जोडून ठेवले. सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका यांनी सांगितल्यानुसार त्यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी प्रयत्न केले अन् त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली.’

२. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘श्री. गुरुराज यांच्या ईश्‍वराप्रतीच्या भावामुळे गुरुदेवांचे त्यांच्याकडे सूक्ष्मातून सतत लक्ष असते. प्रतिवर्षी तेे हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने गोव्याला येतात. त्या वेळी ते त्यांची साधना आणि वाराणसी येथील अध्यात्मप्रसाराचे कार्य यांविषयी सांगतात. या वर्षी वाराणसीवरून आल्यावर ते भावावस्थेत होते. ते भेटायला आल्यावर भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रू वहात होते. पूर्वी त्यांना कुटुंबाविषयी चिंता वाटायची. त्यावर त्यांनी प्रयत्न केले आणि ‘भगवंत काळजी घेईल’ या भावाने सर्व भार देवावर सोपवला अन् परिस्थितीकडे साक्षीभावाने पाहिले. साधनेसाठी अनेक वर्षे कुटुंबियांपासून दूर रहाणे आणि वर्षांतून केवळ १-२ वेळाच घरी येणे, हे सोपे नसते; पण श्री. गुरुराज यांनी ते शक्य करून दाखवले. आज ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याने सर्वांनाच अतिशय आनंद झाला आहे.’

३. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘श्री. गुरुराज यांच्यामध्ये अनेक गुण असूनही ‘मला कळते’ या अहंच्या पैलूमुळे त्यांची साधनेत प्रगती होत नव्हती; पण त्यांनी त्यावर मात केली. त्यांच्यामध्ये संतांप्रती कृतज्ञताभाव आहे. त्यामुळे ते संतांशी बोलतांनाही नम्रपणे बोलतात.’

आध्यात्मिक प्रगती केलेल्या साधकांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत

१. श्री. सुमित सागवेकर

पूर्णवेळ साधना करण्यासाठी माझा पूर्वी मनाचा संघर्ष झाला. नोकरी करतांनाही काही चढउतार आले; पण सद्गुरु अनुताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) यांच्यामुळे मला साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आई-वडिलांनी माझ्यावर राष्ट्र आणि धर्म यांचेच संस्कार केले होते. त्यामुळे मला व्यावहारिक ध्येय नव्हतेच. संतांच्याच कृपेने माझ्या साधनाप्रवासाला दिशा मिळाली. आता गुरूंच्या स्मरणात आनंद मिळतो. ‘आता गुरुचरणांची प्राप्ती हेच अंतिम ध्येय आहे. गुरुदेवांच्या कृपेनेच हा आनंदाचा क्षण अनुभवता आला. मी साधनेचे काहीच प्रयत्न केले नाहीत; पण गुरूंनी भरभरून दिले. ‘पुढची साधना करण्यासाठी त्यांनीच मला बळ आणि शक्ती द्यावी’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.

२. श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

माझ्याकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. ही सर्व संतांची कृपा आहे. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, तसेच सर्व संत यांनी मला पुष्कळ प्रेम दिले आणि साधनेला दिशा दिली. मी संतांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्याकडून प्रत्येक क्षणी साधनेचे प्रयत्न करवून घ्यावेत.

३. श्री. गुरुराज प्रभु

मला चांगल्या घरी जन्माला घातल्याविषयी मी ईश्‍वराच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. मी बाहेरगावी शिक्षण घेत असतांना किंवा सेवेनिमित्त बाहेरगावी असतांना कुटुंबियांनी ‘माझ्या साधनेत अडचण येऊ नये’ अथवा ‘मला कुटुंबियांची काळजी वाटू नये’; म्हणून मला कौटुंबिक अडचणी कधीच सांगितल्या नाहीत. माझ्यात पालट कधी झाला, हे मलाही कळले नाही. हे केवळ प.पू. गुरुदेवांमुळेच शक्य झाले. देवानेच मला पू. नीलेशदादा (पू. नीलेश सिंगबाळ) यांच्याजवळ ठेवले. प्रयागराज येथे कुंभमेळ्याची सेवा करतांना ‘ती केवळ संतांच्या अस्तित्वामुळेच होत आहे’, असा भाव ठेवला.

‘हिंदु जनजागृती समिती’चे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी मिळालेली पूर्वसूचना !

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये ४.६.२०१९ या दिवशी समारोपाच्या सत्रात शेवटी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. त्यानंतर सूत्रसंचालन करणारे ‘हिंदु जनजागृती समिती’चे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना प्रार्थना सांगितली. ती प्रार्थना केल्यावर उपस्थित संत, हिंदुत्वनिष्ठ आणि माझीही अतिशय भावजागृती झाली. त्या वेळी माझ्या मनात प्रकर्षाने विचार आला, ‘श्री. सुमित यांनी सांगितलेली प्रार्थना अतिशय भावपूर्ण होती. तसेच त्यांनी अधिवेशनात प्रतिभासंपन्न सूत्रसंचालन केले. त्यामुळे ‘त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे.’ हाच विचार ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’मध्ये श्री. सुमित यांनी भावपूर्ण प्रार्थना सांगितल्यावरही आला. नंतर ‘हिंदु राष्ट्र आणि साधना’ या राष्ट्रीय शिबिरामध्ये १२.६.२०१९ या दिवशी त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०१९)

आध्यात्मिक प्रगती केलेल्या साधकांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांनी या साधकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF