परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त सेवा करतांना आधुनिक वैद्य रविकांत नारकर यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त विज्ञापने घेणे अन् ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे’ या सेवा करतांना आधुनिक वैद्य रविकांत नारकर यांना आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्य रविकांत नारकर

१. साधकाकडून सेवेच्या आरंभी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त साधकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी चैतन्यदायी सेवा उपलब्ध केल्या आणि ब्रह्मांडात चैतन्याची उधळण केली’, यांसाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी वेगवेगळे उपक्रम भारतभर राबवण्यात आले. त्या वेळी मी सेवा करण्यास आरंभ केला. तेव्हा समाजात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचने घेणे, सात्त्विक उत्पादने आणि चैतन्यदायी ग्रंथ यांचे प्रदर्शन अन् वितरण कक्ष लावणे, नियतकालिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, ‘जन्मोत्सव विशेषांक आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचा आगामी खंड यांसाठी विज्ञापने (जाहिराती) घेणे’ इत्यादी चैतन्यदायी सेवा आम्हा साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी साक्षात विष्णुरूपी परात्पर गुरु डॉक्टरांनी उपलब्ध करून दिल्या. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मांडात चैतन्याची उधळण केली. यासाठी सर्व साधकांच्या वतीने माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. सद्गुुरु स्वातीताईंनी सत्संगात ‘विज्ञापने घेणे आदी सर्व सेवा करतांना आपण समाजापुढे केवळ ‘याचक’ म्हणून न जाता ‘समाजातील लोकांना परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य देणारे ‘दाते’ आहोत’, असा भाव ठेवूया’, असे सांगितल्यावर साधकाची भावजागृती होणे अन् त्याने समाजात सेवेसाठी जातांना वरीलप्रमाणे भाव ठेवण्याचा निश्‍चय करणे

विज्ञापने घेणे या सेवेच्या निमित्ताने सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (सद्गुरु स्वातीताई) यांनी साधकांच्या सेवांचा आढावा घेतला. तेव्हा त्या सत्संगात विज्ञापन सेवेतील सर्व साधकांनी त्यांना सेवेत येणार्‍या अडचणी सद्गुरु स्वातीताईंना सांगितल्या. त्या प्रसंगी सद्गुरु स्वातीताई म्हणाल्या, ‘‘आपण गुरुसेवक समाजात जातांना ‘केवळ घेण्यासाठी जातो’, हा संकुचित विचार मनात ठेवतो. आपण समाजात जातांना ‘समाजाला चैतन्य देणारे ‘दाते’ म्हणून जात आहोत’, असा विचार ठेवूया ! आपण ‘समाजातील लोकांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अमूल्य असे चैतन्य देऊन त्यांना धनाच्या त्यागाच्या माध्यमातून धर्माच्या बाजूने उभे रहाण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देत आहोत’, असा समष्टी भाव ठेवायला हवा. त्याचप्रमाणे ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ही सेवा देऊन माझ्यावर ‘गुरुकृपा’च केली आहे’, असा व्यष्टी साधनेच्या दृष्टीनेही विचार करायला हवा.’’

हे ऐकल्यावर माझे मन निर्विचार झाले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर सद्गुरु स्वातीताईंच्या वाणीतून आम्हाला चैतन्य आणि शक्ती देत आहेत’, असे मला जाणवले अन् माझ्या अंगावर रोमांच आले. तेव्हा माझी भावजागृती झाली आणि मी त्याच क्षणी ठरवले, ‘आपण ‘विज्ञापने घेणे’ आदी सर्वच सेवांसाठी जातांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य समवेत घेऊन जात आहोत’, हा भाव ठेवायचा.

३. साधकाने विज्ञापनदात्याला ‘आम्ही तुम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य देण्यासाठी आलो आहोत आणि या अर्पणाच्या माध्यमातून ईश्‍वराने तुम्हाला धर्मकार्यात सहभागी होण्याची संधी दिली आहे’, असे सांगणे आणि ते ऐकून विज्ञापनदात्याने अर्पण देऊन साधकाचेच आभार मानणे

नंतर मी जामसंडे येथील एका ठिकाणी विज्ञापन घेण्यासाठी गेलो. मागील वर्षाची ‘गुरुपौर्णिमा स्मरणिका’ बघून ते विज्ञापनदाते म्हणाले, ‘‘यात संस्थेच्या कार्याची काहीच माहिती नाही. केवळ विज्ञापनेच आहेत आणि मला विज्ञापन करणे आवडत नाही.’’ हे ऐकून मी नम्रपणे म्हणालो, ‘‘दादा, आम्ही तुमच्याकडून केवळ पैसे घेण्यासाठी आलो नाही, तर आम्ही आपणास परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य देण्यास आलो आहोत. या अर्पणाच्या माध्यमातून ईश्‍वराने तुम्हाला धर्मकार्यात सहभागी होण्याची मोठी संधीच दिली आहे. तुम्ही याचा विचार करू शकता.’’ हे ऐकून त्यांनी आमच्याकडे ‘अर्पण’ म्हणून एक सहस्र रुपये दिले आणि आमचेच आभार मानले.

४. सेवेसाठी जातांना ‘समाजातील लोकांना चैतन्य आणि सात्त्विकता देण्यासाठी गेलो आहोत’, असा संस्कार समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न केल्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळणे अन् एक धर्मप्रेमी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील विचारांमुळे प्रभावित होऊन धर्मकार्यामध्ये क्रियाशील होणे

नंतर एकदा मी सहसाधकाला सांगितले, ‘‘आपण ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांचे वर्गणीदार करण्याच्या सेवेला जातांना केवळ ‘वर्गणीदार करण्यासाठी जातो’, असा विचार करायला नको, तर आपण सेवा करतांना ‘समाजातील लोकांना चैतन्य आणि सात्त्विकता देण्यासाठी गेलो आहोत’, असा संस्कार समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न करूया.’’ तेव्हा तो साधक एकदम भारावून गेला आणि म्हणाला, ‘‘तुमचे हे बोलणे ऐकून मला आनंद तर मिळालाच; पण ही सेवा करण्यासाठी पुष्कळ प्रोत्साहनही मिळाले.’’ प्रत्यक्षात मी समाजात ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करण्यासाठी गेल्यावर वरीलप्रमाणे प्रयत्न केले. तेव्हा ‘अनेक जण सहज वर्गणीदार होतात’, असे माझ्या लक्षात आले. हिंदळे गावातील धर्मप्रेमी श्री. गोरे हे वरील विचार ऐकून ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले आणि पुढे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील विचारांमुळे प्रभावित होऊन धर्मकार्यामध्ये क्रियाशील झाले.’

– आधुनिक वैद्य रविकांत नारकर, पडेल, जिल्हा सिंधुदुर्ग. (मे २०१९)


Multi Language |Offline reading | PDF