वैचारिक उंची हवीच !

संपादकीय

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या नायकांचे प्रत्येक देशात एक विशेष स्थान असते. मार्टिन ल्युथर किंग हे कृष्णवर्णीय असूनही अमेरिकेसारख्या गोर्‍यांच्या देशात त्यांना आदराचे स्थान आहे. देशासाठी हयात घालवणारे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रसंगी प्राणही देणारे स्वातंत्र्यसैनिक हे देशातील प्रत्येकासाठी नायकच असतात. विविध कार्यक्रम, शालेय पाठ्यक्रम आदींच्या माध्यमातून त्यांचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवणारे राष्ट्र स्वतःचा भविष्यकाळ उज्ज्वल करत असते. याउलट ज्या राष्ट्रात अशा इतिहासपुरुषांची हेटाळणी होते, ते राष्ट्र पुढच्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यात कुचकामी ठरते. काही दिवसांपूर्वी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : नायक कि खलनायक’ अशा प्रकारची एक चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्या चर्चेवर आक्षेप घेऊन आता सावरकरप्रेमी हिंदू ‘एबीपी माझा’च्या उद्दामपणाच्या विरोधात वैध मार्गाने लढा देत आहेत. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान उघड असतांना ‘ते नायक आहेत का’, अशी शंका यायला नको. कोणी अज्ञानातून शंका उपस्थित केलीच, तरी ‘ते खलनायक होते का’, अशी कुशंका घेणे, हा पराकोटीचा द्वेष आहे. देशातील जनतेने त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ अशी उपाधी दिलेली असतांनाही आता ७१ वर्षांनंतर  ‘नायक कि खलनायक’ अशी शंका उपस्थित करणारे महाभाग सावरकर यांच्या विचारांना आदर्श मानणार्‍या १०० कोटी जनतेपेक्षा स्वतःला शहाणे समजतात का ? आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या अवमानाला सावरकरप्रेमींनी कडाडून विरोध केल्यामुळे वाहिनीचा हा उद्दामपणा समोर आला अन्यथा राष्ट्रभक्तीचा जणू ठेका घेतला असल्याप्रमाणे वागणारे, भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधासाठी विरोध करणारे नवराष्ट्रभक्त (?) वारंवार अशा प्रकारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करत असतात. अशांना लोकशाही मार्ग धडा शिकवण्यासाठी आता ‘एबीपी माझा’च्या विज्ञापनदात्यांचे प्रबोधन केले जात आहे. अनेक राष्ट्रप्रेमी आस्थापनांनी तसा निर्णय घेऊन ‘एबीपी माझा’ला विज्ञापने न देण्याचे पत्र सावरकरप्रेमींना दिले आहे. आर्थिक नाकेबंदी हे वाहिन्यांच्या उद्दामपणाला वेसण घालण्याचे मोठे साधन असले, तरी हा अंतिम उपाय होऊ शकत नाही.

स्वतःची रेघ मोठी करा !

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या तत्त्वानुसार अनेक आदर्श असू शकतात. ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार आपण कोणाचे अनुकरण करावे, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. याचा अर्थ असा होत नाही की, इतरांनी मानलेले आदर्श पूर्णतः चुकीचे आहेत. स्वतःच्या आदर्शांसह इतरांच्याही आदर्शांचा आदर करण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. दुसर्‍याची रेघ लहान करून स्वतःची रेघ मोठी करण्यात पुरुषार्थ नसतो. आज विचारभेद आणि त्यातून उत्पन्न होणारा द्वेष यांतील रेषा अत्यंत पुसट झाली आहे. साम्यवाद, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव असल्या खुळचट संकल्पना समाजावर लादण्यासाठी राष्ट्रनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ विचार मांडणारे विचारक, क्रांतीकारक, राष्ट्रपुरुष यांना थेट खलनायक ठरवल्याने देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरलेल्या गटाचा कलंक पुसला जाणार आहे का ? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार नष्ट होणार आहे का ? त्यांनी राष्ट्रासाठी केलेला अतुलनीय त्याग विसरला जाणार आहे का ? आज स्वातंत्र्यवीर सावरकर किती राष्ट्रनिष्ठ होते, ते सांगण्याची आवश्यकता नाही; मात्र त्यांना ‘खलनायक’ ठरवू पहाणारे कसे आहेत, त्यांचे रूप उघडे पडले आहे.

सामाजिक वातावरण सुधारणे आवश्यक !

सध्या स्वतःचे पुरोगामीत्व दर्शवण्यासाठी भगव्या रंगावर सरसकट टीका करण्याचे जे खुले धोरण सर्वच क्षेत्रांत राबवले जात आहे, त्यावर यानिमित्ताने प्रकाश टाकणे आवश्यक आहे. ‘नथुराम गोडसे यांचे नाव काढणे’, हा अपराध असल्यासारखे चवताळणे, साध्वी प्रज्ञासिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्यांनी कोणतेही विधान केले, तरी त्याचा विपर्यास करणे, हिंदु राष्ट्राची संकल्पना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रवादाची संकल्पना यांविषयी जाणीवपूर्वक संशयाचे वातावरण निर्माण करणे, वाहिन्यांवरून उलट-सुलट बातम्या दाखवून या वर्गाचे खच्चीकरण करणे, हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही. ‘एबीपी माझा’ हे एक वानगीदाखल उदाहरण आहे. म्हणून यापूर्वी म्हटल्याप्रमाणे केवळ वाहिनीची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी प्रयत्न करण्यासह समाजाची वैचारिक उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आजघडीला आवश्यक आहे. हे होण्यासाठी ठराविक विचारांचा प्रसार होण्यासाठी म्हणजेच नास्तिकतावाद, धर्मनिरपेक्षतावाद, साम्यवाद यांचा प्रचार होण्यासाठी विकाऊ माध्यमांतून जो आक्रोश रात्रंदिवस केला जातो, त्यावर प्रथम नियंत्रण असले पाहिजे. वस्तूस्थिती ठाऊक असली की, कोणी कितीही कान फुंकले, तरी त्याचा मनावर परिणाम होत नाही. असे होण्यासाठी शाळांतून भारतियांच्या शौर्याचा सत्य इतिहास मांडणे, सत्य-असत्य, योग्य-अयोग्य यांच्या संदर्भातील विवेक जागृत करण्यासाठी आत्मबल निर्माण करणारे शिक्षण देणे, त्यातूनही काही अप्रिय प्रसंग ओढवलाच, तर संघटित होऊन तत्परतेने त्याचा प्रतिकार करण्याची ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या संदर्भात असे शब्द वापरण्याची घोडचूक जर विदेशात झाली असती, तर एव्हाना त्या वाहिनीवर कारवाईही झाली असती. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा भारतातील शासकीय कार्यालयांतही लावलेल्या आहेत, त्या सावरकरांच्याविषयी अशी चिखलफेक होते आणि ती दूर करण्यासाठी सावरकरप्रेमींना धडपड करावी लागते, हे नक्कीच चांगले लक्षण नाही. यापुढे राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांची अपकीर्ती रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासह भारताचा जाज्वल्य आणि सत्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे !


Multi Language |Offline reading | PDF