‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याविषयी प्रसिद्ध केल्या जाणार्‍या संपादकीय दृष्टीकोनांमध्ये परिवर्तन !

‘सनातन प्रभात’च्या प्रकाशनाला प्रारंभ झाला, तेव्हाच ‘हे नियतकालिक आध्यात्मिक राष्ट्ररचनेच्या सिद्धांतावर आधारित सामाजिक, राजकीय आणि धार्मिक दृष्टीकोन देईल’, हे स्पष्ट केले होते. या तत्त्वाच्या आधारे ‘भोंदू ‘सेक्युलर’वाद्यांना उघडे करून त्यांच्यावर शाब्दिक कोरडे ओढणे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् राजकीय पक्ष यांना लहान भावाच्या भूमिकेतून हिंदुहिताच्या दृष्टीने अयोग्य कृती लक्षात आणून देणे’, अशी भूमिका ‘सनातन प्रभात’ची होती. काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी ‘सेक्युलर’वादी पक्षांची सामाजिक संवेदनशून्यता, भ्रष्टाचार आणि हिंदु धर्मविरोधी वृत्ती यांविषयी निर्भीडपणे राजकीय दृष्टीकोन प्रकाशित करून ‘सनातन प्रभात’ने सामाजिक असंतोषाला वाट करून दिली. त्यानंतर भाजप केंद्रस्थानी सत्तारूढ झाला. त्या वेळीही ‘सनातन प्रभात’ने नि:पक्षपातीपणे सरकारच्या अयोग्य धोरणांवर निर्भीडपणे दृष्टीकोन लिहिले. तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांना योग्य कृतीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यात ‘कुठल्याही प्रकारे हिंदुत्वाची हानी होऊ नये’, असा उद्देश होता. ही भूमिका केवळ अन्य संघटनांच्याच संदर्भात नव्हती, तर सनातन संस्थेच्या साधकांच्या चुकाही याच निरपेक्षतेने ‘सनातन प्रभात’मधून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ‘व्यक्तीपेक्षा संघटन महत्त्वाचे आणि संघटनेपेक्षा देश-धर्म महत्त्वाचा’, हीच यामागील भूमिका होती.

या कालावधीत अनेक ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ, तसेच धर्मप्रेमी यांनी विनम्रपणे कळवले, ‘सनातन प्रभातमधून व्यक्त केल्या जाणार्‍या या दृष्टीकोनांचा वापर हिंदुविरोधक, तसेच ‘सेक्युलर’वादी करत आहेत. ते या दृष्टीकोनांच्या आधारे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच ‘हिंदु संघटनांतच मतभेद आहेत’, असा समाजात अपप्रचार करत आहेत.’

त्यामुळे ‘एखाद्या लहानशा कृतीनेही व्यापक हिंदुत्वाची हानी होऊ नये’, या उद्देशाने ‘सनातन प्रभात’मधून संपादकीय दृष्टीकोन देण्याच्या भूमिकेत परिवर्तन करत आहोत. नव्या भूमिकेनुसार आता ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर टीकाटीप्पणी केली जाणार नाही, तर हिंदु समाजाच्या स्वाभाविक अपेक्षा व्यक्त केल्या जातील, तसेच हिंदुत्वाच्या परिवारातील संघटनांना संघटनात्मक सूचना थेट कळवल्या जातील.’

– संपादक


Multi Language |Offline reading | PDF