तीर्थक्षेत्र आराखडा निधीतून संमत झालेल्या अष्टविनायक रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

  • लोणीकंद ते थेऊर फाटा रस्त्याचे काम ढिसाळ पद्धतीने

  • माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

श्री. चंद्रकांत वारघडे

लोणीकंद (जिल्हा पुणे) – तीर्थक्षेत्र आराखडा निधीतून अष्टविनायक रस्त्याच्या (लोणीकंद ते थेऊर) कामासाठी ४८ कोटी रुपये संमत करण्यात आले. हे काम निकृष्ट दर्जाचे चालू असल्याने ते बंद करावे, तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. त्याचे कोणतेही देयक संबंधितांना देऊ नये, अशी मागणी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी पुणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुंबई मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आणि मंत्रालयातील मुख्य सचिव यांना दिले आहे.

याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजीव सिंह यांनी सांगितले की, त्या रस्त्याचे काम थांबवले आहे. रस्त्याच्या कामाची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकूण १० तपास अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून पाहणी अहवाल आल्यानंतर काम निकृष्ट आढळून आले, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. (जर बांधकाम निकृष्ट आढळून आले, तर नवीन रस्ता करण्यासाठीचा व्यय संबंधितांकडून वसूल करायला हवा. – संपादक)

श्री. वारघडे यांच्या तक्रारीतील सूत्रे

१. काम चालू करण्याआधी रस्त्याच्या दुतर्फा असलेली भूमी अधिग्रहित करण्यात आली नाही.

२. रस्त्याच्या बाजूने वीज वितरण आस्थापनांचे लोखंडी किंवा सिमेंटचे खांब असून ते न हलवताच काम चालू आहे.

३. जिथे मोकळी भूमी आहे, त्या ठिकाणी मुरुम टाकून रस्त्याचे काम चालू आहे.

४. या कामामध्ये मुरुम टाकून त्यावर वेळोवेळी पाणी मारले जात नाही.


Multi Language |Offline reading | PDF