‘आज्ञापालन’ या गुणामुळे वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी साधनेकडे वळलेली आणि ‘संत’ होण्याचे ध्येय वयाच्या १२ व्या वर्षीच बाळगणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची वाराणसी येथील कु. सुमन सिंह (वय २० वर्षे) !

‘कु. सुमन सिंह हिने केवळ २० व्या वर्षी ६१ टक्के पातळी गाठल्याचे कळल्यावर साधकांना आश्‍चर्य वाटले. ‘ती दैवी बालिका असल्यामुळे तिची जलद प्रगती झाली असेल’, असे त्यांना वाटले. ती जन्मतःच उच्च स्तराची होती, हे जरी खरे असले, तरी त्याच्याच जोडीला अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या वडिलांनी तिच्यावर केलेले साधनेचे अप्रतिम संस्कार. केवळ त्यांच्यामुळेच तिने खूप लवकर ६१ टक्के पातळी गाठली. तिच्या वडिलांनी तिच्यावर साधनेचे संस्कार कसे केले, हे या लेखावरून लक्षात येईल. ‘सर्वच आई-वडिलांनी तिच्या वडिलांसारखे संस्कार आपल्या मुलांवर करावे’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. सुमन सिंह

मूळची वाराणसी येथील साधिका कु. सुमन सिंह (वय २० वर्षे) हिच्या वडिलांचे नाव श्री. चंद्रशेखर सिंह आणि आईचे नाव सौ. अमरावती सिंह असून त्यांचे पूर्ण कुटुंब सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनारत आहे. बालपणापासूनच तिच्या आई-वडिलांनी साधनेचे संस्कार केल्यामुळे वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनच ती साधना करत आहे. कु. सुमनची साधनेची तळमळ उत्तरोत्तर वाढत गेली आणि बारावीचे शिक्षण झाल्यावर तिने पूर्णवेळ सेवा करण्याचा निर्णय घेतला. रामनाथी आश्रमात आलेल्या सुमनने भाव, तळमळ, श्रद्धा आणि शिकण्याची वृत्ती या गुणांमुळे आश्रमातील वास्तव्याचा उत्तम प्रकारे लाभ करून घेतला अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. आता ती प्रसारसेवा शिकून साधकांना, तसेच समाजातील लोकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत आहे. आपण तिचे साधनेचे प्रयत्न, तसेच तिचा साधनेचा प्रवास समजून घेऊ.

श्री. चंद्रशेखर आणि सौ. अमरावती सिंह

१. बालपण

१ अ. आई-वडिलांनी केलेले चांगले संस्कार पाहून नातेवाइकांनी त्यांच्या मुलांवरही सुसंस्कार व्हावेत, यासाठी त्यांना घरी पाठवणे : ‘आई-वडिलांमुळेे लहानपणापासूनच मला साधनेचे वातावरण मिळाले. त्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले, उदा. सकाळी उठून व्यायाम करणे, झोपून उठल्यानंतर ‘कराग्रे वसते लक्ष्मी… हा श्‍लोक म्हणून आई-वडिलांना नमस्कार करणे, नामजप करणे, आरती करणे, मोठ्यांचा आदर करणे, वाईट संगतीपासून दूर रहाणे आदी गोष्टी शिकवल्या. आमचा वेळ अनावश्यक गोष्टींमध्ये, उदा. दूरचित्रवाणी पहाणे, भ्रमणभाष हाताळणे, अनावश्यक खेळ (गेम) खेळणे, तसेच रेडिओवरील कार्यक्रम ऐकणे, अशा गोष्टींत वाया जाणार नाही, याकडे ते लक्ष ठेवायचे. आमच्या घरी पाहुणे आल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करत असे, तसेच चहा-पाणीही देत असे. तेव्हा पाहुण्यांना माझे कौतुक वाटायचे. ते माझ्या आई-बाबांना विचारत, ‘‘आमच्या मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना तुमच्याकडे पाठवू का ?’’ माझा मामा आणि आत्या यांची मुले सुट्टीत आमच्याकडे येऊन रहात असत.

१ आ. सनातनशी संपर्क

१ आ १. आई-वडिलांमुळे साधना आणि सेवा करू लागणे : मी ३ वर्षांची असतांना माझे आई-बाबा सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्या वेळेपासून मी त्यांच्या सांगण्यानुसार साधना करू लागले. त्यांनीच माझ्यावर साधनेचे संस्कार केले. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थनादी कृती केल्यावर मला चांगले वाटायचे. मी शाळेत जाऊ लागल्यावर ते मला सांगायचे, ‘‘अभ्यास करण्यापूर्वी १० मिनिटे नामजप कर आणि नंतर प्रार्थना करून अभ्यासाला आरंभ कर.’’ मी तसे करत असे. बाबा जे सांगतील, तसे मी करत गेले. ‘मला गुर्वाज्ञापालन करायचे आहे’, याकडेच माझे लक्ष असायचे. ते सांगत असलेल्या गोष्टींविषयी माझ्या मनात कधीच शंका आली नाही. आई-बाबा सेवा करत. त्यांच्यामुळे मलाही सेवेची गोडी लागली.

१ आ २. आई-वडिलांनी सांगितल्यानुसार साधनेचे प्रयत्न करणे : वडील ‘अभ्यासासह साधना करा’, असे ते सतत सांगत. तसे केले नाही, तर ते मला शिक्षाही करत. ते आम्हाला गुरुपौर्णिमा महोत्सव, सत्संग, तसेच बालसंस्कार वर्ग याठिकाणी घेऊन जात. ते प्रत्येक क्षणी साधनेविषयी सांगत. अभ्यासासह सनातनच्या ग्रंथांचे वाचन करण्यासही सांगत. त्यांनी आम्हाला पाक्षिक सनातन प्रभात वाचायचीही गोडी लागली. ते म्हणत, ‘‘तू जर हे लिखाण वाचलेस, तर प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे, म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदाताई, तसेच सद्गुरु पिंगळेकाका यांच्यासारखी होशील !’’ ते मला वाराणसी आश्रमातही घेऊन जात, जेणेकरून मी तेथील चैतन्यदायी वातावरण अनुभवू शकेन आणि सर्व साधकांसारखी सेवाही करीन.

१ इ. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहून डोके दुखत असल्याने कार्यक्रम न पहाता नामजप करणे : शाळेत वर्गातील अन्य मुले मला ‘आम्ही दूरचित्रवाणीवर ‘कार्टून’चा कार्यक्रम पाहिला किंवा ‘चित्रपट पाहिला’, असे सांगत. त्यांच्यामुळे मीही ते पाहू लागले. त्या वेळी मी ७ वर्षांची होते. ‘हे कार्यक्रम पाहिल्यानंतर माझे डोके दुखते’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला वाटू लागले, ‘मी नामजप केला, तर मला त्यातून आनंद मिळेल.’ त्यामुळे मी असे कार्यक्रम न पहाता नामजप करत असे.

२. साधनेमुळे शैक्षणिक जीवनात झालेले लाभ !

२ अ. गणेशस्तोत्राचे पठण, नामजप आणि प्रार्थना यांमुळे अभ्यास २ घंट्यांत पूर्ण होणे : आरंभी मी केलेला अभ्यास माझ्या फारसा लक्षात रहात नसे. आधी मला ४ घंटे अभ्यास करावा लागायचा. नंतर मी दिवसातून ३ वेळा गणेशस्तोत्राचे पठण, तसेच अभ्यास करण्यापूर्वी १० मिनिटे नामजप आणि प्रार्थना करू लागले. त्यामुळे २ घंट्यांतच माझा अभ्यास पूर्ण होऊ लागला.

२ आ. शाळेत जातांना नामजप आणि स्वयंसूचना सत्र करणे : मला शाळेत जायला १५ ते २० मिनिटे लागायची. त्या वेळेत मी नामजप आणि स्वयंसूचना सत्र करायचे. त्यामुळे मला कधीच एकटेपणा जाणवायचा नाही. ‘ईश्‍वर माझ्या समवेत आहे’, असे मला सतत वाटत असे.

२ इ. जेवणाच्या सुटीत एका ठराविक ठिकाणी बसून नामजप करणे : मी शाळेत गेल्यानंतर फावल्या वेळेत किंवा जेवणाच्या सुटीत एका ठराविक ठिकाणी बसून नामजप करत असे. ‘तेथे संरक्षक कवच निर्माण झाले आहे’, असे मला वाटत असे; म्हणून मी नेहमी त्याच जागेवर बसून नामजप करत असे.

२ ई. प्रश्‍नपत्रिकेतील एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर आठवत नसल्यास ‘श्रीकृष्ण जवळ बसून उत्तर सांगत आहे’, असे जाणवणे : मी उत्तरपत्रिकेवर सूक्ष्मातून श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल करत असे. ज्या प्रश्‍नांची उत्तरे माझ्या लक्षात असायची, तसेच प्रश्‍न परीक्षेत विचारलेले असायचे. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे उत्तरे लिहू शकायचे. एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर मला आठवत नसल्यास ‘श्रीकृष्ण माझ्याजवळ बसला आहे आणि तो मला उत्तर सांगत आहे’, असे मला जाणवायचे. त्यामुळे मी भराभर सर्व प्रश्‍नांची उत्तरे लिहित असे. मला परीक्षेत चांगले गुण मिळू लागले.

३. ‘आई-वडिलांना संतुष्ट करणे’ हे ध्येय असणे

काही जण मला विचारायचे, ‘‘तू मोठेपणी कोण होणार ?’’ मी त्यांना सांगत असे, ‘‘माझ्या आई-वडिलांना कधी दुःख होणार नाही, त्यांना माझी कधी काळजी करावी लागणार नाही आणि ते माझ्या संदर्भात नेहमी संतुष्ट असावेत’, अशी व्यक्ती बनण्याची माझी इच्छा आहे.’’

४. अध्यात्माची ओढ वाढणे

४ अ. परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन करणे : मी सात वर्षांची असल्यापासून परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राजवळ बसून त्यांच्याशी बोलत असे. मला कधी आई-बाबांचा राग आल्यास मी गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहात असे. तेव्हा मला ते दुःखी वाटत. मी आई-बाबांची क्षमायाचना केल्यावर मला ते हसतांना दिसत. मी हळूहळू त्यांच्याशी बोलू लागले.

४ आ. ‘संत व्हावे’, असे वाटू लागणे : मी १२ वर्षांची असल्यापासून मला ‘संत व्हावे’, असे वाटू लागले. संत नेहमी आनंदी असतात. माझ्या बाबांचेही संतांवर पुष्कळ प्रेम आहे. हे ध्येय साकार होण्यासाठी मी अधिकाधिक सेवा करू लागले.

४ इ. वडिलांना सेवेत साहाय्य करणे : माझ्या बाबांकडे पुष्कळ सेवा असे. मी त्यांना सेवेत साहाय्य करत असे, उदा. पाक्षिक सनातन प्रभातसंबंधी सेवा करणे, गुरुपौर्णिमेच्या वेळी लेखासंबंधित सेवा करणे आणि पाक्षिक सनातन प्रभातचे वितरण करणे इत्यादी.

१६ जून या दिवशी साधनेचे प्रयत्न पाहिले. आज पुढील साधनाप्रवास समजून घेऊया.

५. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने झालेला पुनर्जन्म आणि आयुष्याला मिळालेली कलाटणी

५ अ. हृदयाजवळ वेदना होऊ लागल्यावर घेतलेल्या औषधाची ‘रिअ‍ॅक्शन’ येऊन तोंडवळा काळा पडून शरीर ताठ होणे, साधकांनी सुचवलेल्या आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी दिलेल्या ‘इंजेक्शन’ने प्रकृतीत सुधारणा होणे आणि त्यांनी ‘तुझा पुनर्जन्म झाला’, असे सांगणे : माझी बारावीची परीक्षा झाल्यानंतर एकदा माझ्या हृदयाजवळ वेदना होऊ लागल्या. मी औषध घेतले; मात्र औषधाची मात्रा (प्रमाण) अधिक झाल्यामुळे माझ्यावर उलटाच परिणाम (रिअ‍ॅक्शन) झाला. माझा तोंडवळा काळा पडला. माझी जीभ बाहेर येऊ लागली अन् माझे शरीर ताठ झाले. बाबांंनी मला रुग्णालयात भरती केले. माझी स्थिती खालावत चालली होती. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी मला अतीदक्षता विभागात ठेवायला सांगितले. ते म्हणाले, ‘‘हिला वेड लागले आहे.’’ नंतर बाबांनी वाराणसी सेवाकेंद्रातील सौ. श्रेया प्रभु या साधिकेला भ्रमणभाष केला. ताईने सांगितले, ‘‘तुम्ही तिच्याभोवती मंडल करा आणि तिच्यासाठी प्रार्थना अन् नामजप करा.’’ नंतर तिने एका साधक-डॉक्टरांंचा संपर्क क्रमांक दिला. बाबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी मला ‘इंजेक्शन’ दिले आणि एक मिनिटाच्या आत माझ्या स्थितीत सुधारणा होऊ लागली. आधुनिक वैद्य आणि तेथील कर्मचारी म्हणाले, ‘‘अरे, इतक्या जलद पालट कसा झाला ? हिला बघून वाटले होते, ‘ही वेडी आहे. हिचा पुनर्जन्मच झाला आहे ’’ तेव्हा आई-वडिलांचा कृतज्ञताभाव वाढला आणि ते मला म्हणाले, ‘‘तुझे हे जीवन आता ईश्‍वराचेच आहे.’’

५ आ. गांभीर्याने व्यष्टी साधना करू लागणे आणि परीक्षेत अधिक चांगले गुण मिळणे : यानंतर माझ्या मनात पूर्णवेळ साधना करण्याचे विचार येऊ लागले. याविषयी मी आई-वडिलांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तू आता गुरुचरणांची झाली आहेस. यापुढचे तुझे जीवन त्यांच्यासाठीच आहे.’’ तेव्हापासून मला वाटू लागले, ‘माझे जीवन परात्पर गुरुदेवांसाठी आहे, तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.’ याआधी माझा दिवसभरात दोन घंटे नामजप होत नव्हता. यानंतर मी गांभीर्याने व्यष्टी साधना करू लागले. हे सर्व करतांना मला पुष्कळ आनंद मिळू लागला. याचा माझा अभ्यासावर कोणताही परिणाम झाला नाही. मला परीक्षेत अधिक चांगले गुण मिळू लागले.

५ इ. ‘वाराणसी सेवाकेंद्रात रहावे’, असे वाटणे : मी कधी कधी वाराणसी सेवाकेंद्रात जात असे. मला तेथील वातावरण वेगळे असल्याचे जाणवायचे. मी घरी असतांना काही वेळा मला राग यायचा आणि मिळून मिसळून बोलण्याचे व्हायचे नाही. घरी सेवा करतांना मला थकवा यायचा; परंतु सेवाकेंद्रात सेवा करतांना मला थकवा जाणवायचा नाही. तेथील साधक नेहमी हसतमुख असायचे. तेथे साधकांसमवेत सेवा करतांना मलाही आनंद मिळायचा. त्यामुळे मला ‘सेवाकेंद्रातच रहावे’, असे वाटू लागले.

५ ई. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभणे : एकदा मी बाबांसमवेत सेवाकेंद्रात गेले असतांना आमची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला सांगितले, ‘‘तू वडिलांना सेवेत साहाय्य कर, तसेच तुम्ही दोघे एकमेकांच्या व्यष्टी साधनेचाही आढावा घ्या. त्यामुळे तुम्हाला साहाय्य होईल !’’ याप्रमाणे मी आणि बाबा एकमेकांना नामजप, प्रार्थना, तसेच सारणी लिखाण यांविषयी विचारू लागलो. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करू लागले.

५ उ. युवा शिबिरामुळे पूर्णवेळ साधना करण्याचा निर्धार होणे आणि वाराणसी सेवाकेंद्रात अधिक काळ राहू लागणे : एकदा वाराणसी सेवाकेंद्रात असलेल्या युवा शिबिरात मी सहभागी झाले होते. शिबिरातील विषय ऐकून मला वाटले, ‘या ४ दिवसांत मी जे काही शिकले, ते मला १४ वर्षांत शिकायला मिळाले नव्हते. मी आता पूर्णवेळ साधना करायला पाहिजे. परात्पर गुरुदेव रामराज्य आणण्यासाठी रामसेतूची निर्मिती करत आहेत. मलाही खारुताईसारखी सेवा करायला पाहिजे.’ मी हे विचार कागदावर लिहून त्याला श्रीकृष्णाच्या नामाचे मंडल घातले. गोव्याला एक अधिवेशन होणार होते. माझ्या बाबांना त्यात सहभागी व्हायचे होते. बाबा मला म्हणाले, ‘‘तू तळमळीने प्रयत्न केलेस, तर तुलाही आश्रमात बोलावतील.’’ त्या दिवसापासून मी तळमळीने सेवा करू लागले. मी वाराणसी सेवाकेंद्रात १ – २ मास राहू लागले.

६. रामनाथी आश्रमात जाण्याची मिळालेली संधी

६ अ. वडील रामनाथी आश्रमात गेल्यानंतर त्यांची एका संतांशी भेट होणे : बाबा रामनाथी आश्रमात गेल्यावर त्यांची एका संतांशी भेट झाली. बाबांनी त्यांना माझ्याविषयी आणि मी करत असलेल्या सेवांविषयी सांगून मला पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. तेव्हा संत म्हणालेे, ‘‘तिला रामनाथी आश्रमात पाठवा.’’

६ आ. परात्पर गुरुदेवांना केलेली प्रार्थना सफल झाल्याने कृतज्ञता वाटणे : नंतर मला वाराणसी येथील साधकांनी सांगितले, ‘‘तुला रामनाथी आश्रमात बोलावले आहे.’’ हे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘कागदावर श्रीकृष्णाच्या नामाचे मंडल करून आपण त्यावर एखादी इच्छा लिहिली की, ती इच्छा परात्पर गुरुदेवांच्या कृपेने पूर्ण होते’, याची मला अनुभूती आली. त्या वेळी ‘मला वैकुंठलोकात जायला मिळत आहे’, हे माझे भाग्य आहे’, असे मला वाटत होते.

६ इ. बॅग भरतांना ‘कोणते साहित्य घ्यायचे’, ते ईश्‍वर सुचवत असून ‘परात्पर गुरुदेव स्वतःकडे पाहून हसत आहेत’, असे जाणवणे : मी घरून वसतीगृहात किंवा नातेवाइकांकडे जातांना बॅगेत साहित्य भरायचे. तेव्हा मला पुष्कळ ताण यायचा; परंतु रामनाथी आश्रमात जाण्यासाठी बॅग भरतांना ‘ईश्‍वरच माझे साहित्य भरत आहे आणि कोणते साहित्य घ्यायचे’, हेेही तोच सुचवत आहे’, याची मला अनुभूती आली. त्यामुळे बॅग भरतांना मला आनंद होत होता आणि ‘परात्पर गुरुदेव मला पाहून हसत आहेत’, असे जाणवत होते.

६ ई. रेल्वेने प्रथमच लांबचा प्रवास करूनही थकवा न जाणवणे : मी प्रथमच रेल्वेचा प्रवास करत होते. मी एवढ्या लांबचा प्रवास करून रामनाथी आश्रमात आले, तरी मला थकवा जाणवला नाही. उलट मला आनंद होत होता. माझ्या मनात ‘मी ईश्‍वराच्या जवळ जात आहे’, हा एकच विचार होता.

७. रामनाथी आश्रमातील वास्तव्य

७ अ. रामनाथी आश्रमात आल्यावर वैकुंठ लोकात आल्याचे जाणवून ‘साधक शिकण्याच्या स्थितीत आहेत’, असे लक्षात येणे : ‘१३.८.२०१८ या दिवशी सकाळी मी रामनाथी आश्रमात आले. ‘साधक सांगत होते, त्यापेक्षाही रामनाथी आश्रम अधिक चांगला आहे’, असे मला वाटले. ‘मी वैकुंठ लोकातच आले आहे’, असे मला वाटू लागले. मी भोजनकक्षात गेल्यावर ‘सर्व साधक आनंदी आहेत’, असे मला दिसले. तेथे साधक अधिक संख्येने असूनही कोणताच आवाज होत नव्हता. साधक परस्परांकडून शिकण्याच्या स्थितीत होते. तेव्हा मला पुष्कळ चांगले वाटत होते.

७ आ. संतसत्संग लाभून संतांनी ‘आता तुला सद्गुरु बिंदाताईंसारखे व्हायचे आहे’, असे सांगणे : नंतर मला एका संतांच्या सत्संगात बसण्याची संधी मिळाली. ‘मला संतांचा सत्संग मिळणार’, यावर माझा विश्‍वासच बसत नव्हता. संत दिसताक्षणी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. मला वातावरणात शीतलता जाणवत होती. आरंभी मला काय बोलायचे हे लक्षात न आल्याने थोडी भीती वाटली; परंतु नंतर मी त्यांना माझ्या मनातील सर्व सांगितलेे. मी खूप गतीने बोलत होते. त्यामुळे संत मला म्हणाले, ‘‘तू असे जलद गतीने बोललीस, तर प्रसारात कोणाला काहीच समजणार नाही. तू सावकाश बोललीस, तरच सर्वांच्या लक्षात येईल !’’ त्याचप्रमाणे ‘प्रसारात गेल्यावर अहं वाढायला नको, यासाठीही प्रयत्न करायला हवेत’, असे त्यांनी सांगितले. नंतर त्यांनी मी करत असलेल्या सेवांविषयी विचारले आणि सांगितले, ‘‘आता तुला सद्गुरु बिंदाताईंसारखे व्हायचे आहे.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘मलाही त्यांच्याप्रमाणे व्हावेसे वाटतेे.’’

७ इ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे

७ इ १. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सौ. सुप्रिया माथूर यांनी मनमोकळेपणाने बोलण्यास सांगणे, आरंभी ते न जमणे आणि नंतर ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आढावा घेत आहेत’, असा भाव ठेवल्यावर मनमोकळेपणाने बोलूू शकणे : मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवू लागले. तेव्हा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या ताईने (सौ. सुप्रिया माथूर यांनी) मला सांगितले, ‘‘तू मनमोकळेपणाने बोलायला हवेस आणि स्वतःतील स्वभावदोष सांगायला हवेस.’’ मी तसे प्रयत्न करू लागले; कारण मला सद्गुरु बिंदाताईंसारखे व्हायचे होते. आरंभीचे २ – ३ दिवस मला मनमोकळेपणाने बोलणे जमत नव्हते. तेव्हा सुप्रियाताईने मला सांगितले, ‘‘जोपर्यंत तू मनमोकळेपणाने बोलत नाहीस, तोपर्यंत मी तुला साहाय्य करू शकणार नाही.’’ नंतर मी ‘सुप्रियाताई आढावा घेत नसून सद्गुरु बिंदाताई आढावा घेत आहेत’, असा भाव ठेवला आणि मोकळेपणाने माझे स्वभावदोष सांगू लागले. माझ्यात ‘अपेक्षा करणे, प्रतिक्रिया येणे, तसेच दुसर्‍यांशी जवळीक नसणे’, असे स्वभावदोष आहेत. सुप्रियाताईने सांगितल्यानुसार मी प्रयत्न करू लागले.

नंतर महाप्रसाद ग्रहण करतांना मी साधिकांशी मनमोकळेपणाने बोलू लागले.

७. रामनाथी आश्रमातील वास्तव्य

७ इ. कर्तेपणाचे विचार आल्यावर केलेला प्रयत्न : माझ्या मनात ‘मी चांगली सेवा करत आहे’, असे कर्तेपणाचे विचार यायचे. यासाठी सुप्रियाताईने मला स्वयंसूचना सत्रे करायला सांगितली. नंतर मी ‘ही सेवा येथील चैतन्यामुळे करू शकत आहे’, असा भाव ठेवल्यावर सेवा आपोआप होऊ लागली. मी सर्व सेवा परात्पर गुरुदेवांना अर्पण करू लागले.

७ ई. आश्रमातील वास्तव्यामुळे झालेले पालट

१. येथे आल्यावर मी मनमोकळेपणाने माझ्या अडचणी सांगूू लागले. मी इतरांशी जवळीक साधू लागले.

२. माझ्यातील प्रतिमेचे विचार न्यून झाले. मी सतत शिकण्याच्या स्थितीत राहू लागले.

३. पूर्वी जेवणात माझ्या आवडीचे पदार्थ नसतील, तर मी जेवत नसे किंवा थोडेच जेवत असे. सेवेच्या संदर्भातही माझे असेच असायचे. मला न आवडणारी सेवा मी करायचे नाही. येथे आल्यानंतर माझ्या या विचारांत पालट झाला. संतांच्या सत्संगात त्यांनी सांगितले होते, ‘‘ईश्‍वरेच्छेने वागायचे. ईश्‍वरेच्छेने वागल्याने आनंद मिळतो. स्वेच्छेने वागणारी व्यक्ती, म्हणजे शिंग नसलेले जनावर असते.’’ तेव्हा ‘मी किती आवड-नावड जपत आहे’, याची मला जाणीव झाली. जेवतांना ‘मला गुरुदेवांचा प्रसाद मिळत आहे’, असा भाव मी ठेवू लागले. त्यातून ‘मला अधिकाधिक चैतन्य कसे मिळेल ?’, असे प्रयत्न होऊ लागले. ‘मला दिलेल्या सेवेतूनच माझी प्रगती होणार आहे’, असा भाव ठेवून मी मिळालेली प्रत्येक सेवा करू लागलेे.

७ उ. सेवा करतांना केलेले भावजागृतीचे प्रयत्न : मी संगणकावर टंकलेखनाची सेवा करतांना कळफलकावरील (की-बोर्डवरील) कळ दाबल्यानंतर ‘ईश्‍वराचे चैतन्य स्वतःच्या शरिरात जात आहे’, तसेच संगणकाच्या पडद्यावर पहातांना ‘मी श्रीकृष्णाच्या नेत्रांमध्ये पहात आहे’, असा भाव ठेवत असे. तेव्हा सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळत असे.

८. शिकायला मिळालेली सूत्रे

८ अ. साधकांकडून

१. आश्रमातील स्वयंपाकघरात १५ ते १८ वर्षे वयाच्या साधिका पोळ्या बनवण्याच्या यंत्रावर पोळ्या करण्याची सेवा करतात. त्यांच्या वयाच्या तुलनेत त्या पुष्कळ मोठी सेवा करतात.

२. आश्रमात आल्यानंतर आरंभी मी केवळ मला दिलेलीच सेवा करत असे. नंतर माझ्या लक्षात आले, ‘आश्रमाशी संबंधित सेवा करणार्‍या साधिका त्यांची सेवा पूर्ण झाल्यावर अन्य साधिकांनाही सेवेत साहाय्य करतात. त्या प्रत्येक सेवा परिपूर्ण करतात. अडचणीच्या मुळाशी जाऊन अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात.

८ आ. संत आणि सद्गुरु यांच्याकडून

८ आ १. सहजावस्थेत असणार्‍या पू. रेखा काणकोणकर ! : पू. रेखाताई जरी रुग्णाईत असल्या, तरी त्या सेवेला येतात. साधक त्यांना अडचणी सांगत असतांना त्या कुणाशीही पूर्वग्रह ठेवून बोलत नाहीत. कोणाकडून एखादी चूक झाल्यास ‘त्या साधकाला चुकीची खंत वाटते का ?’, हे पहातात आणि चूक सुधारण्यासाठी त्याला प्रोत्साहन देतात.

८ आ २. साधकांच्या अडचणी सुटाव्यात; म्हणून प्रयत्न करणारे पू. संदीप आळशी ! : मी मला येणार्‍या अडचणींविषयी कधी पू. संदीपदादांना सांगितल्यास ‘त्या अडचणी दूर होतील’, यांकडे तेे लक्ष देत. ते मला सांगत, ‘‘तुला सगळे ठाऊकच आहे. आता केवळ त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.’’

८ आ ३. झोकून देऊन सेवा करण्याची प्रेरणा देणार्‍या सद्गुरु बिंदाताई ! : सद्गुरु बिंदाताई घेत असलेल्या सत्संगात बसल्यावर ‘सतत अंतर्मुख राहून चुका न होण्याकडे लक्ष दिले पाहिजे’, याची जाणीव झाली. सद्गुरु बिंदाताईंनी मला सांगितले, ‘‘झोकून देऊन सेवा करायला हवी. सेवा करतांना मन अर्पण होण्याकडे लक्ष दिले पाहिजे.’’

८ इ. परात्पर गुरु डॉक्टरांची शिकवण

८ इ १. साधकांशी समभावाने वागायला हवे ! : परात्पर गुरुदेव सर्व साधकांकडे समभावाने पहातात. ते लहान-मोठा असा भेदभाव कधीच करत नाहीत.

८ इ २. सतत आनंदी रहायला हवे : ते साधकांना नेहमी सांगतात, ‘‘ईश्‍वरापर्यंत जायचे आहे, तर सतत आनंदी रहायला पाहिजे.’’ मी प्रसारात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवीन.

८ इ ३. शिकलेले कृतीत आणणे महत्त्वाचे ! : आपण जे शिकतो, ते कृतीत आणणे सर्वांत महत्त्वाचे आहे. शिकलेले कृतीत आणल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि त्यातूनच प्रगती होते.

८ इ ४. परात्पर गुरुदेवांचे सूक्ष्म ज्ञानाविषयी मार्गदर्शन : एकदा सत्संगात साधक भावपूर्ण रितीने बोलत असतांना त्यांच्याकडून सुगंध येत असल्याची जाणीव परात्पर गुरुदेवांनी करून दिली. ‘प्रसारातील साधकांमध्ये तेजतत्त्व अधिक प्रमाणात असते’, असे त्यांनी सांगितले. काही वेळा साधकांना देवतांचे दर्शन होते. त्या वेळी ‘६ व्या आणि ७ व्या पाताळातील वाईट शक्तींच्या मुळेही असे दर्शन होऊ शकते’, असे परात्पर गुरुदेवांनी सांगितले.

९. पूर्णवेळ साधना करण्यासाठी आई-वडिलांनी दिलेले प्रोत्साहन !

मी सेवा करण्यासाठी रामनाथी आश्रमात राहू लागल्यावर माझ्या काका-काकूंनी आईला सांगितले, ‘‘सुमन हुशार असल्याने तिने पुढचे शिक्षण घ्यायला हवे.’’ तेव्हा बाबांनी त्यांना सांगितले, ‘‘ती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात शिकत आहे.’’ मी पूर्णवेळ साधक झाल्यानंतर माझ्या आई-बाबांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी मला सांगितले, ‘‘तू परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु बिंदाताई यांच्या मार्गदर्शनानुसार साधना कर. तू घरचा विचार करू नकोस.’’ आता ते माझ्याशी भ्रमणभाषवरूनही केवळ साधनेविषयीच बोलतात. ते म्हणतात, ‘‘तू प.पू. गुरुदेवांची आहेस. त्यांच्या कृपेने तुला जेथे रहाण्यास सांगतले जाईल किंवा जेथे पाठवतील, तेथेच तुझी उन्नती होणार आहे.’’

(समाप्त)

– कु. सुमन सिंह, (२० वर्षें), वाराणसी (१७.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF