वंध्यत्व निवारण केंद्रात नोकरी करतांना ‘गर्भवैज्ञानिक’ श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांच्या लक्षात आलेले अपप्रकार !

श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी गेल्या ८ वर्षांपासून ‘गर्भवैज्ञानिक’ म्हणून एका रुग्णालयात नोकरी करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी एका खासगी वंध्यत्व निवारण केंद्रात नोकरी केली होती. तेथे ‘प्रयोगशाळा हाताळणे आणि वंध्यत्व निवारणाच्या उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना समुदेशन करणे’, असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. नोकरी करत असतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले काही अपप्रकार पुढे दिले आहेत.

१. स्त्रियांची वंध्यत्वाची समस्या आणि त्यावरील वंध्यत्व निवारण उपचार

श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी

१ अ. स्त्रीबीजे पुरेशा गुणवत्तेची नसल्यास रुग्ण-दांपत्याला वंध्यत्व निवारण केंद्राकडून साहाय्य घ्यावे लागणे आणि त्यासाठी २० ते ४० सहस्र रुपये व्यय करावा लागणे : काही रुग्ण स्त्रियांच्या बाबतीत असे आढळते की, त्यांची स्त्रीबीजे पुरेशा गुणवत्तेची नसतात. ती दुर्बळ असतात अथवा ती परिपक्व होत नाहीत. अशा प्रसंगी त्या रुग्ण स्त्रीला तिच्या कुटुंबातील अथवा अन्य एखाद्या दात्याकडून (‘डोनर’ व्यक्तीकडून) स्त्रीबीज मिळवण्याचा सल्ला देण्यात येतो. या प्रक्रियेत दात्याकडून मिळालेले स्त्रीबीज पतीच्या वीर्याशी फलित केले जाते आणि फलित झालेला गर्भ वंध्य स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. असे असले, तरी बर्‍याचदा रुग्ण जोडप्याला स्त्रीबीज उपलब्ध करणे शक्य होत नाही आणि त्यामुळे स्त्रीबिजासाठी त्यांना वंध्यत्व निवारण केंद्राचे साहाय्य घ्यावे लागतेे. अशा प्रसंगी केंद्र एका वेळी एका रुग्ण-जोडप्याकडून २० ते ४० सहस्र रुपये शुल्क आकारते. केंद्राकडून या रकमेतील स्वतःचा वाटा घेतला जाऊन काही रक्कम स्त्रीबीज दात्याला (‘डोनर’ व्यक्तीला) दिली जाते.

२. वंध्यत्व निवारण उपचार करतांना स्त्रीबिजांच्या संदर्भात होत असलेले अपप्रकार

२ अ. ‘संबंधित दात्याची ओळख रुग्णापासून गुप्त ठेवली जावी’, या ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेे’च्या सूचनेचा अपलाभ घेऊन वंध्यत्व निवारण केंद्रांत वेश्या, घटस्फोटिता आदी महिलांचा ‘स्त्रीबीज दाता’ म्हणून उपयोग केला जाणे आणि रुग्णांची फसवणूक करणे : ‘संबंधित दात्याची ओळख प्राप्तकर्त्या रुग्णापासून गुप्त ठेवली जावी’, अशी सूचना ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेे’नेे (‘द इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने) केली आहे. या सूचनेचा अपलाभ घेऊन ‘आपल्या सोयीनुसार दाता निवडणे’, ही वंध्यत्व निवारण केेंद्रासाठी एक अत्यंत सोपी गोष्ट बनली आहे.

मी पूर्वी नोकरी करत असलेल्या केेंद्रात वेश्या, घटस्फोटिता, विवाहबाह्य संबंध असणार्‍या, तसेच निराधार महिला आणि स्वच्छता कर्मचारी यांसारख्या महिलांचा ‘स्त्रीबीज दाता’ म्हणून उपयोग केला जात असे. दात्याची ओळख गुप्त ठेवली जात असल्याने संबंधित रुग्ण-जोडपे आपल्याला ‘उत्तम दात्याकडूनच स्त्रीबीज मिळालेे आहे’, असे भ्रमात रहात असेे. याचे कारण संबंधित जोडप्याला समुपदेशन करतांना ‘तुमच्यासाठी उत्तम पार्श्‍वभूमी असलेला सुसंस्कारित दाताच निवडला जाणार आहे’, असे केंद्राकडून सांगितले जात असे.

२ आ. दात्याकडून मिळवलेली अतिरिक्त स्त्रीबीजे दोन जोडप्यांना विकून फसवणूक करणे : एवढेच करून ते थांबत नाहीत, तर प्रक्रिया चालू केल्यानंतर दात्याकडून प्राप्त झालेल्या स्त्रीबिजांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास अतिरिक्त स्त्रीबीजे अन्य रुग्णाला विकली जातात. केंद्राने एकाच दात्याकडून दोन जोडप्यांसाठी स्त्रीबीजे मिळवलेली असतात आणि त्यासाठी दोन्ही जोडप्यांकडून रक्कम घेतलेली असते; पण प्रत्यक्षात दात्याला एकाच रुग्णाची रक्कम दिली जाते. अशा प्रकारे एकाच दात्याकडून मिळवलेली अतिरिक्त स्त्रीबीजे दोन जोडप्यांना विकून फसवले जाते.

मी नोकरी केलेल्या वंध्यत्व निवारण केंद्रासारखी अनेक केेंद्रे देशभर कार्यरत आहेत, जेथे असे अपप्रकार केले जातात. विशेष परिश्रम न करताच पैसा मिळवण्याचा हा अगदी एक सोपा मार्ग झाला आहे.

३. पुुरुषाचे वीर्य उपलब्ध करणे आणि त्यावर सुरक्षा-प्रक्रिया करणे, यांमध्ये होणारे अपप्रकार

३ अ. वंध्यत्वाची समस्या असलेल्या जोडप्यातील पुुरुषात दोष असल्यास दात्याचे वीर्य उपलब्ध करतांनाही वरील क्लृप्ती उपयोगात आणली जाणे आणि ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदे’नेे घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचे उल्लंघन केले जाणे : रुग्ण-जोडप्यातील पुुरुषात दोष असल्यास, म्हणजे पुरुषांच्या वीर्यात शुक्राणूंची संख्या अत्यल्प असल्यास अथवा शुक्राणूच नसल्यास (एझोस्पर्मिया) त्यांना दात्याचे वीर्य वापरण्याचा समुपदेश देण्यात येतो. दात्याचे वीर्य उपलब्ध करतांनाही अशीच क्लृप्ती केली जाते. त्याचप्रमाणे ‘दात्याचे वीर्य ‘स्पर्म बँके’तूनच घेण्यात यावे’, या ‘भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदे’नेे घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचेही उल्लंघन केले जाते. रक्तचाचणीद्वारे ‘संबंधित दाता ‘एच्.आय्.व्ही.’ने बाधित नाही’, याची निश्‍चिती होण्यासाठी सहा मासांचा कालावधी उलटावा लागतो. या मधल्या कालावधीला ‘विंडो पीरिएड’ असे म्हटले जाते.

(‘विंडो पीरिएड’ : ‘विंडो पीरिएड’ हा असा कालावधी आहे, ज्या कालावधीत व्यक्ती ‘एच्.आय्.व्ही.’ने बाधित झालेली असली आणि तिच्याद्वारे जलद गतीने संसर्ग पसरत असला, तरीही तिच्या रक्तचाचणीचा अहवाल मात्र सामान्य येऊ शकतो.)

३ आ. दात्याचे वीर्य रुग्णाला देण्यापूर्वी त्यावर विशिष्ट सुरक्षा-प्रक्रिया करणे आवश्यक असणे आणि छोट्या वंध्यत्व निवारण केंद्रात याचे पालन केले जात नसल्याने रुग्ण जोडप्याला ‘एच्.आय्.व्ही.’ किंवा ‘एच्.बी.एस्.ए.जी.’ यांसारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची भीती असणे : वंध्यत्व निवारण केंद्राच्या लहान शाखेत ‘आय्.व्ही.एफ्. (‘टेस्ट ट्यूब’द्वारे गर्भधारणा)’ प्रक्रिया चालू करतांनाच काही ठराविक वीर्यदात्यांना आवश्यकतेनुसार बोलावून त्यांच्याकडून अल्प मोबदल्यात वीर्य मिळवले जाते. दात्याचे वीर्य स्त्रीच्या गर्भाशयात ठेवण्यापूर्वी त्यावर विशिष्ट सुरक्षा-प्रक्रिया करणे आवश्यक असते. छोट्या वंध्यत्व निवारण केंद्रात याचे पालन केले जात नाही आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे अनैतिक अन् धोकादायक कृत्य केले जाते. परिणामस्वरूप रुग्ण जोडप्याला ‘एच्.आय्.व्ही.’, तसेच ‘एच्.बी.एस्.ए.जी. (एक प्रकारची कावीळ)’ यांसारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची भीती असते. काही वीर्यदात्या पेढ्यासुद्धा दात्याचे वीर्य रोगसंसर्ग होण्यापासून संरक्षित करण्याच्या नियमांचे पालन करत नाहीत.

‘शुक्राणूंशी संबंधित प्रक्रिया स्वच्छ आणि निर्जंतुक अशा स्वतंत्र प्रयोगशाळेत व्यवस्थित काळजी घेऊनच केली जावी’, असा नियम असूनही ती साधारण प्रयोगशाळेत केली जाते.

४. रुग्णाकडून घेतलेली रक्कम त्यांना परत द्यावी लागू नये, यासाठी स्त्रीच्या गर्भाशयात निकृष्ट भ्रूण ठेवून रुग्णांची फसवणूक केली जाणे

‘आय्.व्ही.एफ्.’ म्हणजे ‘टेस्ट ट्यूब’द्वारे गर्भधारणा’ या प्रक्रियेत ‘स्त्रीबीजे मिळवणे’ आणि ‘स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण, म्हणजेच फलित केलेली स्त्रीबीजे ठेवणे’, असे दोन मुख्य भाग असतात. या प्रक्रियेत काही वेळा स्त्रीबीजे फलित होत नाहीत अथवा फलित झालेला भ्रूण निकृष्ट, म्हणजे कमी गुणवत्तेचा असतो. साहजिकच अशा वेळी स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण ठेवणे अयोग्य असते; कारण असा भ्रूण गर्भाशयात स्थापित होऊ शकत नाही किंवा त्याचे परिणाम नकारात्मक होऊ शकतात. अशा प्रकरणात स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण ठेवला गेला नसल्याने रुग्ण जोडप्याने दिलेल्या रकमेतील काही रक्कम त्यांना परत द्यावी लागते; मात्र ‘त्यांना रक्कम परत द्यावी लागू नये, तसेच केंद्राचे नाव खराब होऊ नये’, यासाठी स्त्रीच्या गर्भाशयात निकृष्ट अथवा कमी गुणवत्तेचा भ्रूण ठेवला जातो.

या प्रक्रियेनंतर पंधरा दिवसांनी गर्भधारणा निश्‍चित करण्यासाठी वैद्यकीय चाचणी केल्यावर ही प्रक्रिया फोल ठरल्याचे दिसून येते. त्या वेळी आधुनिक वैद्य रुग्ण जोडप्याला ‘आम्ही उत्तम भ्रूण निवडला होता; मात्र स्त्रीच्या गर्भाशयाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अथवा गर्भाशयाची ग्रहणक्षमता नसल्याने तो भ्रूण गर्भाशयात स्वीकारला गेला नाही’, अशी कारणे देतात. त्यानंतर रुग्ण जोडप्याला पुढच्या मासिक काळात पुन्हा ‘आय्.व्ही.एफ्.’द्वारे गर्भधारणा प्रक्रिया करण्याचा समादेश दिला जातो.

मी यापूर्वी नोकरी करत असलेल्या केंद्रात निकृष्ट अथवा कमी गुणवत्तेचे भ्रूण गर्भाशयात ठेवले जाऊन असे गैरप्रकार सर्रास केले जात. दुर्दैवाने असे अपप्रकार करणार्‍या गटाचा मीही एक भाग होतो.’

५. दात्याकडून मिळालेले वीर्याचे नमुने इतर कार्यशाळांना विकून रुग्णांची केली जाणारी फसवणूक !

५ अ. नवीन ‘वंध्यत्व निवारण केंद्रा’त नोकरी करू लागल्यावर ‘तेथे काहीतरी संशयास्पद घडत आहे’, असे लक्षात येणे : ‘मी काही कारणास्तव पूर्वीच्या ‘वंध्यत्व निवारण केंद्रा’तील नोकरी सोडली आणि नवीन केंद्रात रुजू झालो. आरंभी काही दिवस तेथील नियम आणि कार्यपद्धत समजून घेण्यात गेले. नंतर काही दिवसांतच ‘या वंध्यत्व निवारण केंद्रात काहीतरी संशयास्पद चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेथील प्रयोगशाळेतील एक तंत्रज्ञ (टेक्निशियन), जो गेल्या ३ – ४ वर्षांपासून तेथे काम करत होता, ‘तो काही अनैतिक गोष्टी करत आहे’, असा मला संशय आला.

५ आ. एक रुग्ण स्त्री ‘पर्यायी गर्भधारणे’साठी आली असतांना प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाच्या कृतीचे निरीक्षण केल्यावर लक्षात आलेली सूत्रे : एकदा एक रुग्ण स्त्री ‘पर्यायी गर्भधारणा (इन्ट्रा यूटेरियन इन्सेमिनेशन)’ या प्रक्रियेसाठी आली असतांना मी प्रयोगशाळेतील या तंत्रज्ञाच्या कृतीचे शांतपणे निरीक्षण करत होतो. दात्याकडून मिळालेले वीर्य ज्या डबीत (‘कॅनिस्टर’मध्ये) ठेवले जाते, ती डबी त्याने उघडली; मात्र त्यातील वीर्य न घेताच त्याने डबी बंद केली. थोड्या वेळाने त्याने केंद्रातील परिचारिकेला दूरभाष केला आणि सांगितले, ‘‘वीर्याचा नमुना तयार आहे आणि तो ‘कॅथेटर’मधे घातला आहे. (कॅथेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. ‘इन्ट्रा यूटेरियन इन्सेमिनेशन’च्या प्रक्रियेत या ‘कॅथेटर’च्या साहाय्याने स्त्रीच्या गर्भाशयात वीर्य सोडले जाते.) रुग्णाला उपचारांसाठी घेऊन ये.’’ परिचारिका वीर्य असलेले ‘कॅथेटर’ घेण्यासाठी प्रयोगशाळेत आली. तेव्हा मी तिला ‘‘तू पाच मिनिटांनी ये. काहीतरी अडचण आहे. मला ती पाहू दे’’, असे सांगून परत पाठवले.

५ इ. ‘कॅथेटर’मधील वीर्याची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी केल्यावर त्यात एकही शुक्राणू न दिसणे आणि याविषयी तंत्रज्ञाला विचारल्यावर तो काही रुपये कमावण्याच्या लोभापायी तो ‘कॅथेटर’मध्ये वीर्य न घालता केवळ ‘सलाईन’ भरत असल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस येणे : त्या तंत्रज्ञाला मी त्याने तयार केलेल्या ‘कॅथेटर’मधील वीर्याचा एक थेंब एका काचेच्या पट्टीवर घेऊन तो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवण्यास सांगितले. यावर तो म्हणाला, ‘‘मी वीर्याचा नमुना तपासला असून तो व्यवस्थित आहे.’’ मी त्याला सांगितले, ‘‘मी तुझा वरिष्ठ आहे. मी जे सांगितले आहे, ते तू कर.’’ त्याने ‘कॅथेटर’मधील वीर्याचा एक थेंब काचेच्या पट्टीवर ठेवला. मी त्याची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी केली. तेव्हा मला त्यात एकही शुक्राणू दिसला नाही. मी याविषयी विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘मी ‘कॅथेटर’मधे साधे ‘सलाईन’ भरून दिले आहे.’’ याचे कारण विचारल्यावर मला कळले, ‘दात्याकडून मिळालेले वीर्य तो इतर केंद्रांना विकत होता. आम्ही एक ‘स्पर्म व्हायल’ (वीर्य असलेली काचेची बाटली) ७५० रुपयांना विकत घेतो. तो ही ‘स्पर्म व्हायल’ अन्य केंद्रांना १२०० ते १५०० रुपयांना विकत होता.

मी कडक शब्दांत त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली, ‘‘सहस्रो रुपये खर्च करून येथे अनेक रुग्ण मोठ्या आशेने येतात आणि तू त्यांची फसवणूक करत आहेस. थोड्याशा पैशाच्या लोभापोटी तू रुग्णांच्या भावनांशी खेळत आहेस.’’ मी त्वरित त्याची तक्रार वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली. त्याला त्या विभागातून त्वरित काढून टाकले आणि त्याची बदली दुसर्‍या विभागात करण्यात आली.

६. मानवता अथवा सामाजिक बांधिलकी यांची जाण न ठेवणारी आणि रुग्णांकडे केवळ ‘उत्पन्नाचे एक साधन’ या दृष्टीने पहाणारी बहुतांश वंध्यत्व उपचार केंद्रे

६ अ. वीर्यातील शुक्राणूंच्या अभावामुळे मुलाला अपत्यप्राप्ती होणे असंभव असतांना कुटुंबातील सदस्यांना अज्ञात वीर्यदात्याकडून वीर्य घेणे अमान्य असणे : ‘एकदा मुंबईतील एक पालक जोडपे त्यांच्या मुलाच्या समस्येच्या निवारणासाठी केंद्रात आले होते. पालकांसमवेत त्यांचा धाकटा मुलगा होता. त्यांच्या मोठ्या मुलाला वीर्यातील शुक्राणूंच्या अभावामुळे अपत्यप्राप्ती होत नव्हती. या संदर्भात ते मुंबईतील ‘वंध्यत्व उपचार केंद्रां’त जाऊन तेथील आधुनिक वैद्यांना भेटले होते; मात्र त्या आधुनिक वैद्यांंपैकी कोणीच मुलाच्या समस्येवरील उपचारासाठी कुटुंबातील सदस्याचे वीर्य वापरण्यास सिद्ध नव्हते. या पालकांना अज्ञात वीर्यदात्याकडून वीर्य घेणे अमान्य होते. वीर्यदात्याचे रूप आणि त्याची जात, पंथ, धर्म आदी पार्श्‍वभूमी या गोष्टी विचारात घेता सावधानतेेपोटी ‘कुटुंबातील सदस्याचेच वीर्य वापरावे’, असा या पालकांचा आग्रह होता.

६ आ. केंद्राच्या वरिष्ठांना रुग्णाच्या समस्येची माहिती सांगितल्यावर त्यांनी ‘रुग्ण-जोडपे संबंधित संमती पत्रावर सही करण्यास सिद्ध असल्यास ‘त्यांच्यावर उपचार करता येतील’, असे सांगणे : रुग्णाच्या संदर्भातील ही माहिती मी केंद्राच्या वरिष्ठांना सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘जर वीर्यदात्याशी संबंधित संमती पत्रावर रुग्ण-जोडपे सही करण्यास तयार असेल, तर ‘इन्ट्रा यूटेरियन इन्सेमिनेशन (आय्.यू.आय्.)’ पद्धतीने रुग्ण-जोडप्यावर उपचार करता येतील.’’ ‘आय्.यू.आय्.’ ही गर्भधारणेची एक उपचार पद्धत आहे, ज्यात गर्भधारणा सुलभ रितीने होण्यासाठी स्त्रीच्या गर्भाशयात वीर्य ठेवण्यात येते. या पद्धतीचा मुख्य हेतू हाच आहे की, स्त्रीबीजवाहक नलिकेत (‘फॅलोपियन ट्युब’मध्ये) प्रवेश करणार्‍या शुक्राणूंची संख्या वाढवणे, जेणेकरून गर्भधारणेची शक्यता वाढेल. केंद्राच्या वरिष्ठांनी सुचवलेला पर्याय मी त्या पालकांना सांगितला आणि त्यांनीही यासाठी संमती दर्शवली. ‘या उपचाराच्या वेळी तुमचा मोठा मुलगा आणि सून यांना उपस्थित रहावे लागेल, तसेच संमती पत्रावर त्यांची सही लागेल’, असे मी त्यांना सांगितले.

६ इ. उपचारांपूर्वी दात्याचे वीर्य दोषविरहित असल्याचे पहाणे आवश्यक असल्याने पालकांना दात्याविषयी विचारणा केल्यावर ‘सासरे स्वतः त्यांच्या सुनेसाठी वीर्य देणार आहेत’, हे धक्कादायक उत्तर समोर येणे : ‘आय्.यू.आय्.’ उपचारांपूर्वी दात्याचे वीर्य दोषविरहित असल्याचे पहाणे आवश्यक असल्याने मी त्यांना वीर्य देणार्‍या दात्याविषयी माहिती विचारली. ‘दाता तुमचा जवळचा कोणी मित्र आहे का ?’, असे मी सहज विचारले. यावर पालकांकडून ‘नाही’, असे उत्तर आल्याने मी त्यांच्या धाकट्या मुलाकडे निर्देश केला. तसेही नसल्याचे सांगत त्या मुलांचे वडील म्हणाले, ‘‘भविष्यात काय घडेल कोणास ठाऊक ? या दोन्ही मुलांमध्ये काही मतभेद निर्माण झाला, तर ते अडचणीचे ठरू शकते.’’ यावर मी अधिक उत्सुकतेने ‘मग वीर्य कोण देणार आहे ?’, असे विचारल्यावर मला मिळालेले उत्तर अतिशय धक्कादायक होते. ते स्वतःच स्वतःच्या सुनेसाठी वीर्य देणार होते. त्यांच्या धक्कादायक उत्तराने मी काही क्षण स्तब्ध झालो.

६ ई. केंद्राच्या वरिष्ठांना ‘सासरेच सुनेसाठी वीर्य देणार आहेत’, हे सांगितल्यावर त्यांनी ‘हा निर्णय संबंधित कुटुंबाचा असून रुग्ण-जोडप्याची लेखी संमती असल्यास केंद्राला अडचण नाही’, असे सांगून पुढील प्रक्रिया करण्याची सूचना देणे : सासरेच सुनेसाठी वीर्य देणार असल्याविषयी मी केंद्राच्या वरिष्ठांना सांगितले. यावर त्या म्हणाल्या, ‘‘हा निर्णय संबंधित कुटुंबाचा आहे आणि यामध्ये कुटुंबाला कोणतीही अडचण वाटत नसेल, तसेच रुग्ण-जोडपे यासाठी लेखी संमती देत असेल, तर आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. मुलांच्या वडिलांकडून चाचणीसाठी वीर्याचा नमुना घ्या. त्यांचे वीर्य प्रक्रियेसाठी उपयुक्त असल्याचे चाचणीत दिसून आल्यास ‘आय्.यू.आय्.’च्या पुढच्या टप्प्याला जाता येईल.’’ चाचणीत त्यांच्या वीर्याचा नमुना निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने ते ‘आय्.यू.आय्.’ प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाले.

६ उ. रुग्ण स्त्रीवरील ‘आय्.यू.आय्.’ ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी तीन मास लागणे आणि चौथ्या वेळी प्रक्रिया यशस्वी होऊन रुग्ण स्त्रीला गर्भधारणा होणे : पुढील मासात ते रुग्ण-जोडपे उपचार केंद्रात आले. त्यांच्या रक्ताच्या आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आणि त्याचबरोबर वीर्यदात्या संदर्भात संमतीपत्रावर त्यांची सही घेण्यात आली. या प्रक्रियेच्या वेळी मुलाच्या पित्याने ही प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करण्याची मला भेटून विनंती केली. ‘आय्.यू.आय्.’ प्रक्रियेसाठी तीन मास लागले, म्हणजे तीन वेळा उपचार प्रक्रिया केल्यानंतर चौथ्या वेळी ती यशस्वी झाली आणि त्यांच्या सुनेला गर्भधारणा झाली.

या प्रकरणात ‘कोणता निष्कर्ष काढावा ?’, हे मला कळले नाही. जन्माला येणार्‍या मुलाचे त्याचे पिता आणि आजोबा यांच्याशी कोणते नाते असेल ?

७. बहुतांश अपत्यहीन

जोडप्यांमधील पुरुषांत दोष असूनही त्यांना दोषी ठरवले न जाता केवळ स्त्रियांनाच दोषी ठरवले जाणे

७ अ. पहिल्या पत्नीला गर्भधारणा होत नसल्याने पतीने दुसरा विवाह करणे आणि या विवाहाला ४ – ५ वर्षे उलटूनही दुसर्‍या पत्नीला गर्भधारणा न झाल्याची समस्या घेऊन एक जोडपे वंध्यत्व उपचार केंद्रात येणे : अपत्यप्राप्ती होत नसलेले एक जोडपे वंध्यत्व उपचार केंद्रात आले होते. उपचार चालू करण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी जाणून घेतांना माझ्या लक्षात आले की, विवाह होऊन ७ – ८ वर्षे होऊनही पहिल्या पत्नीला गर्भधारणा होत नव्हती. त्यामुळे पुरुषाने पत्नीच्या धाकट्या बहिणीशी विवाह केला होता. आता दुसर्‍या विवाहाला ४ – ५ वर्षे उलटूनही या पत्नीलाही गर्भधारणा होत नसल्याने हे जोडपे उपचारांसाठी आले होते.

७ आ. वैद्यकीय तपासणी केल्यावर पत्नीत कोणताही दोष नसून पतीत दोष असल्याचे निष्पन्न होणे आणि ‘आपल्या पहिल्या मुलीला अपत्य होत नाही; म्हणून धाकट्या मुलीचा जावयाशी विवाह करून देणार्‍या पालकांनी वस्तूस्थिती न अभ्यासताच स्वतःच्या दोन्ही मुलींना दोषी ठरवलेले असणे : यानंतर पत्नीची रक्तचाचणी, स्कॅनिंग इत्यादी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या चाचण्यांचा अहवाल सामान्य आल्याने तिच्यात कोणताही दोष नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे पतीच्या वीर्याची चाचणी करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्या वेळी वीर्याची तपासणी केल्यावर पतीचे वीर्य शुक्राणूविरहित असल्याचे आढळले. त्यामुळे तो कधीच पिता होऊ शकत नव्हता. या प्रसंगात पहिल्या मुलीला अपत्य होत नाही; म्हणून मुलीच्या पालकांनी समाजाच्या भीतीपोटी स्वतःच्या धाकट्या मुलीला आपल्या जावयाशी विवाह करण्यास भाग पाडले होते. असा निर्णय घेण्याआधी पालकांनी कुठल्याही आधुनिक वैद्यांना दाखवले नाही, कोणताही वैद्यकीय सल्ला घेतला नाही किंवा वस्तूस्थितीही जाणून घेतली नाही.

७ इ. पत्नीने पतीच्या दोषांविषयी सर्व गोष्टी गुप्त ठेवणे; पण पतीने मात्र अपत्य न होण्यामागे पत्नीला दोषी मानून तिचा द्वेष करणे : बहुतांश अपत्यहीन जोडप्यांमध्ये पुरुषातच तीव्र दोष असल्याचे माझ्या पहाण्यात अनेकदा आले आहे. असे असूनही पत्नी पतीच्या दोषांविषयी कोणतीच गोष्ट स्वतःचे कुटुंब, आई-वडील अथवा मैत्रिणी यांना सांगत नाही. ती ‘या सर्व गोष्टी गुप्त ठेवणेच योग्य’, असे समजते. याउलट अपत्य न होण्यामागे पुरुष मात्र आपल्या पत्नीला दोषी मानतो, तिचा द्वेष करतो आणि तिच्या आई-वडिलांना त्यासाठी कारणीभूत ठरवतो. ‘अपत्यप्राप्ती होत नसल्यास समाज केवळ स्त्रीलाच दोषी ठरवतो आणि पुरुषाला दोषी मानत नाही’, हेच या प्रसंगातून स्पष्ट होते.’

८. औषधांच्या संदर्भातील अपप्रकार

८ अ. औषधे बनवणार्‍या आस्थापनांनी स्वतःची उत्पादने खपवण्यासाठी प्रायोजकत्व आणि भेटवस्तू देण्यासह औषधे, तसेच वैद्यकीय उपकरणे यांवर मोठी सवलत देणे : ‘औषधे’ हे वैद्यकीय उपचारांतील एक महत्त्वाचे अंग असल्याने त्यांचा पुरवठा करणार्‍या औषधांच्या दुकानांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांपासून ते मोठ्या वैद्यकीय संस्थांपर्यंत सर्वत्र त्यांच्या आवारात किंवा इमारतीत औषधांची दुकाने असतात. उपचारांसाठी औषधे अनिवार्य असल्याने औषधांचे उत्पादन करणार्‍या आस्थापनांना पैसे मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. ही आस्थापने स्वतःची उत्पादने खपवण्यासाठी प्रायोजकत्व आणि भेटवस्तू देण्यास उत्सुक असतात. कित्येक आस्थापने गुलाबाची फुले, लेखण्या, पायमोजे यांसारख्या लहान लहान वस्तूंपासून परदेश दौर्‍यांसारखे महागडे प्रस्ताव घेऊन येत असतात. ही आस्थापने वैद्यकीय संस्थांना औषधांवर ३० ते ४० टक्के, तसेच काही वस्तूंवर ५० ते ६० टक्के एवढी सवलत देतात.

८ आ. रुग्णांना अन्य ठिकाणाहून औषधे न आणता विशिष्ट केंद्रातूनच औषधे खरेदी करण्यासाठी मानसिक दबाव आणला जाणे आणि त्यामुळे त्यांना त्या केंद्रातूनच औषधे विकत घ्यावी लागणे : मी पूर्वी नोकरी करत असलेल्या केंद्रात येणार्‍या रुग्णांना औषधे, इंजेक्शन्स, तसेच अन्य वस्तू केंद्रातूनच खरेदी करण्याचा आग्रह केला जात असे. तेथील आधुनिक वैद्य रुग्णाला सांगत, ‘‘तुम्ही औषधे किंवा अन्य वस्तू बाहेरून विकत घेतल्या आणि त्याच्या वापराने गुण आला नाही अथवा त्याचे काही अनिष्ट परिणाम झाले, तर त्याचे दायित्व आमच्यावर नाही.’’ त्यामुळे अन्य ठिकाणी औषधे अल्प दरात मिळत असूनही अशा मानसिक दबावामुळे रुग्णांना विशिष्ट केंद्रातून औषधे विकत घेण्याविना कोणताच पर्याय उरत नसे.

८ इ. केंद्रांनी त्यांच्या औषधांच्या दुकानात नेमलेल्या ‘फार्मासिस्ट’ला प्रतिमास केवळ ७००० रुपये एवढे अल्प वेतन देऊन त्याच्या परवान्याच्या आधारे प्रचंड मोठी रक्कम मिळवणे : मी नोकरी करत असलेल्या केंद्राच्या औषध विभागाची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपये होती. त्यातील ३० टक्के हिस्सा, म्हणजे तीस लाख रुपयांची मिळकत केवळ या एका औषध विभागातून केंद्राला होत असे. असेच चित्र जवळजवळ सर्वच खासगी केंद्रे आणि वैद्यकीय संस्था यांमध्ये आढळून येते. ही केंद्रे त्यांच्या औषधांच्या दुकानात नेमलेल्या ‘फार्मासिस्ट’ला प्रतिमास केवळ ७००० रुपये एवढे अल्प वेतन देऊन त्याच्या परवान्याच्या आधारे प्रचंड मोठी रक्कम मिळवतात.

९. शक्य त्या सर्व मार्गांनी अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेणारे आणि रुग्णांना लुबाडणारे आधुनिक वैद्य !

९ अ. आधुनिक वैद्यांनी औषधे बनवणार्‍या आस्थापनांकडून शक्य त्या सर्व मार्गांनी लाभ पदरात पाडून घेणे : आधुनिक वैद्य औषधे बनवणार्‍या आस्थापनांकडून पुढील प्रकारचे लाभ पदरात पाडून घेतात. देश-विदेशांतील सहली, विमानप्रवासाचे भाडे, तारांकित हॉटेलमध्ये निवासव्यवस्था, वेगवेगळ्या परिषदांसाठी प्रायोजकत्व, केंद्रातील कर्मचार्‍यांसाठी आयोजित केलेल्या परिषदांमध्ये भोजनव्यवस्था, परगावी असतांना चारचाकी वाहनाची व्यवस्था इत्यादी. अशा शक्य त्या सर्व मार्गांद्वारे आधुनिक वैद्य आस्थापनांकडून सुविधा मिळवतात.

९ आ. रुग्णांची निःशुल्क तपासणी करावी, यासाठी औषधे बनवणार्‍या आस्थापनांनी चिकित्सालयांना अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे; पण आधुनिक वैद्यांनी रुग्णांकडून तपासणीचे शुल्क घेऊन त्यांना लुबाडणे : औषधे आणि वैद्यकीय उपकरणे बनवणार्‍या आस्थापनांचे प्रतिनिधी रुग्णालये, तसेच चिकित्सालये यांना भेटी देतात अन् त्यांच्या प्रसिद्धीसाठी साहाय्य करतात. औषधाच्या एका आस्थापनात काम करणार्‍या माझ्या मित्राने मला सांगितले की, त्यांचे आस्थापन प्रतिमास एका ठराविक दिवशी रुग्णालये किंवा चिकित्सालये यांना अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध करून देते, जेणेकरून रुग्णांना त्याचा लाभ करून घेता यावा. या उपकरणांसाठी आस्थापन कोणतेही शुल्क आकारत नाही; कारण त्या दिवशी आधुनिक वैद्यांनी अधिकाधिक रुग्णांची निःशुल्क तपासणी करावी, तसेच संबंधित रुग्णालय किंवा चिकित्सालय यांची प्रसिद्धी व्हावी आणि त्याचसमवेत रुग्णांनाही विनामूल्य तपासणी करून मिळावी’, असा आस्थापनाचा उद्देश असतो; मात्र रुग्णालयातील आधुनिक वैद्य रुग्णाकडून प्रत्येक तपासणीचे १,२०० रुपये घेतात. अशा प्रकारे शक्य त्या सर्व मार्गांनी आधुनिक वैद्य रुग्णांना लुबाडण्याचा प्रयत्न करत असतात.

‘सर्वच आधुनिक वैद्य अशा प्रकारे अनैतिक आणि अमानवी वर्तन करतात’, असे नाही. मी असेही आधुनिक वैद्य पाहिले आहेत, ज्यांना रुग्णांच्या आरोग्याची खरोखरंच पुष्कळ काळजी असते आणि ते स्वतःच्या तत्त्वांशी जराही तडजोड करत नाहीत. त्यांचा रुग्णांवर नैतिकतेने उपचार करण्यावर अधिक विश्‍वास असतो.’

१०. समाज आणि सासरचे लोक यांच्या दबावाखाली राहून आधुनिक वैद्यांना अनैतिक मार्गांचा अवलंब करण्यास सांगणारी रुग्ण-जोडपी !

१० अ. ‘स्वतःत दोष आढळल्याचा अहवाल पत्नीला दाखवू नये, तसेच अज्ञात दात्याचे शुक्राणू कृत्रिम गर्भधारणेसाठी उपयोगात आणले जात आहेत’, हे पत्नीला सांगू नये’, असा आग्रह धरणारे काही पुरुष-रुग्ण ! : ‘गेली ८ वर्षे वंध्यत्व निवारण क्षेत्रात कार्य करतांना माझ्या असे लक्षात आले की, बर्‍याचदा पतीच्या वीर्यातील शुक्राणूंच्या संदर्भातच अधिक समस्या असतात. अशी समस्या असलेले पती आमच्याकडे येतात आणि स्वतःत दोष आढळल्याचा अहवाल पत्नीला न दाखवण्याचा आग्रह धरतात. काही वेळा पतीचे शुक्राणू दुर्बळ असल्यास सशक्त शुक्राणू असलेल्या अज्ञात दात्याचे शुक्राणू कृत्रिम गर्भधारणेसाठी उपयोगात आणले जातात. ही प्रक्रिया करण्यापूर्वी त्याविषयीची स्पष्ट आणि कायदेशीर माहिती या दांपत्याला देणे बंधनकारक असते; मात्र काही पुरुषांचा ‘अज्ञात दात्याचे शुक्राणू कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरले जाणार आहेत’, असे पत्नीला सांगू नये वा ‘यासाठी तिची अनुमती घेऊ नये’, असा आग्रह असतो.

१० आ. कृत्रिम गर्भधारणेच्या प्रक्रियेत महिलांकडून होणारा दबाव : याचप्रकारे आमच्याकडे आलेल्या पुष्कळ महिलांचा ‘कृत्रिम गर्भधारणेच्या प्रक्रियेत अज्ञात दात्याचे निरोगी शुक्राणू वापरावेत’, असा आग्रह असतो; पण ‘आम्ही हे त्यांच्या पतीच्या नकळत वा त्यांची अनुमती न घेता करावे’, याविषयी त्या आमच्यावर दबाव आणतात. काही महिला कृत्रिम गर्भधारणेच्या प्रक्रियेसाठी ‘पतीचेच शुक्राणू वापरले आहेत, असेच आम्ही त्यांच्या पतींना सांगावे’, असा आग्रह धरतात.

वंध्यत्वाची समस्या असलेली बहुतांश जोडपी समाज आणि सासरचे लोक यांच्या दबावाखाली असतात. त्यांची कोणत्याही प्रकारे गर्भधारणा करून घेण्याची सिद्धता असते. ‘वरील प्रकारच्या जोडप्यांमध्ये एकमेकांविषयीचे प्रेम आणि एकमेकांना समजून घेणे, हे वरवरचेच आहे’, हे लक्षात येते.

११. सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे काही आदर्श आधुनिक वैद्य !

११ अ. रुग्णांना सर्वतोपरीने साहाय्य करणारे आधुनिक वैद्य ! : या क्षेत्रात काम करणारे सर्वच आधुनिक वैद्य अनैतिक मार्गांचा अवलंब करतात, असे नाही. या क्षेत्रात बरेच चांगले आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे आधुनिक वैद्यही आहेत. ते स्वतःची पूर्ण क्षमता वापरून रुग्णाला बरे करण्याचा १०० टक्के प्रयत्न करतात. मला असे काही आधुनिक वैद्य ठाऊक आहेत, जे खर्चिक उपचार करतांना रुग्णांना पैसे न्यून पडत असल्यास स्वतः रुग्णांना पैसे देतात. वंध्यत्व निवारणासाठी आलेल्या जोडप्यांना एकत्र समुपदेशन करतात, तसेच जोडप्यांवर करण्यात येणारी उपचार-प्रक्रिया अथवा त्यांचे अहवाल यांविषयी संपूर्ण पारदर्शकता बाळगतात. जरी रुग्णांकडून अनैतिक मार्गांचा अवलंब करण्याविषयी आधुनिक वैद्यांवर दबाव आणला, तरी ते त्याला बळी पडत नाहीत.

११ आ. वरिष्ठांना लेखाविषयी सांगितल्यावर त्यांनी साहाय्य करणे, त्यामुळे ‘प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने व्यवसाय करणार्‍या आधुनिक वैद्यांना लेखामुळे कोणतीही समस्या येणार नसून नीतीमत्तेला धरून व्यवसाय न करणारे मात्र लेख वाचून अडचणीत येऊ शकतील’, असे लक्षात येणे : ‘कृत्रिम गर्भधारणे’च्या क्षेत्रात चालू असलेल्या अयोग्य कृतींविषयी मी एक लेख लिहिला आहे, हे मी माझ्यासमवेत कार्य करणार्‍या दोन वरिष्ठ आधुनिक वैद्यांना सांगितले. यावर ‘त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही’, याचे मला आश्‍चर्य वाटले. ते दोघे स्वतःचे कार्य सचोटीने करत असल्याने त्यांना याविषयी चिंता वाटली नसावी. उलट या दोघांनी मला या क्षेत्रात चालणार्‍या अयोग्य गोष्टींची आणखी काही उदाहरणे सांगितली. या दोन वरिष्ठांचा प्रतिसाद पाहून मला ‘जे आधुनिक वैद्य प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने व्यवसाय करत आहेत, त्यांना या लेखाने कोणत्याही समस्या येणार नाहीत; मात्र नीतीमत्तेला धरून व्यवसाय न करणार्‍या आधुनिक वैद्यांना हा लेख वाचून ते अडचणीत येऊ शकतील वा ते काही प्रश्‍न निर्माण करतील’, असे वाटले.

१२. वंध्यत्व निवारणाच्या क्षेत्रात चालणार्‍या अयोग्य कृतींविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हाच लेख लिहिण्यामागील उद्देश ! : ‘वंध्यत्व निवारणाच्या क्षेत्रात चालणार्‍या अयोग्य कृतींविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे’, हे माझे ध्येय आहे. याचे कारण हे एक असे क्षेत्र आहे, ज्यात रुग्णाच्या भावना गुंतलेल्या असून ते अतिशय संवेदनशील बनलेले असतात. ‘कोणीही आधुनिक वैद्यांच्या खोट्या प्रलोभनांना बळी पडून त्यांत अडकू नये’, असे मला वाटते. वंध्यत्व निवारण केंद्रात जाण्यापूर्वी उपरोक्त लेखातून लोकांना सर्व संभाव्य (योग्य) पर्यायांचा विचार करता यावा, या हेतूने मी हा लेख लिहिला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला या विषयावर लेख लिहिण्याची संधी मिळाली. यासाठी मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘हे श्रीकृष्णा आणि परात्पर गुरुदेवा, ‘साधनेच्या या सुंदर प्रवासात माझ्यावर आपला कृपावर्षाव कायम रहावा’, अशी आपल्या चरणी मी प्रार्थना करतो.’

– श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी, निपाणी, कर्नाटक. (जानेवारी २०१९)

(समाप्त)

चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातील असे कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला कळवा.

रुग्णांची लुबाडणूक करणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. असे करणे, ही तुमची साधनाच असेल ! तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता :

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF