वटपौर्णिमा आणि वटवृक्ष

ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१६.६.२०१९) या दिवशी वटपौर्णिमा आहे. त्या निमित्ताने…

१. वटवृक्षाचे आयुष्य, त्याची छाया आणि विवाहित स्त्रीने वटवृक्षाची देवाप्रमाणे पूजा करणे

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘वटवृक्षाला सहस्रो वर्षांचे आयुष्य असते. त्याची छाया इतर वृक्षांपेक्षा फार मोठी असते. याची पूजा प्रथम करण्याचे दैवी ज्ञान मानवप्राण्याला केवळ सत्यवानाच्या चुकीमुळेच ज्ञात झाले. सावित्रीने हे व्रत वटपौर्णिमेच्या दिवशी केल्यामुळे सार्‍या स्त्रिया त्या दिवशी उपवास करतात. वडाच्या खोडावर कधीही शस्त्र उपसू नये. सत्यवानाला हे ठाऊक नव्हते. त्यामुळे त्याने तसे केले आणि त्याला अपघाती मृत्यू आला. स्त्रीच्या विवाहानंतर तिने वटवृक्षाची पूजा देवाच्या पूजेप्रमाणे केली पाहिजे. प्रत्येक पौर्णिमेला केली तरी चालेल. जवळपास वडाची झाडे असतील, तर त्याच्या फांद्या घरी आणून त्यांची पूजा करणे, हे खरे नव्हे. वडाला स्त्रीच्या आयुष्यात मोलाची किंमत असतांना अशा निषिद्ध पद्धतीने पूजा करणे महत्पाप आहे.

२. वटवृक्षाच्या जाती

वटवृक्षामध्येसुद्धा काही जाती आहेत, उदा. देवीचे वटवृक्ष, किन्नरांचे वटवृक्ष, पुण्यवानांचे वटवृक्ष आणि साधारण मानवांचे वटवृक्ष. वटवृक्ष देवांचे कुठले आणि किन्नरांचे कुठले, हे सर्वसाधारण मानवाला कळत नाही. मानवांचे आणि किन्नरांचे वटवृक्ष सर्वदा सगळीकडे असतात. पुण्यवानांचे वटवृक्ष दुर्मिळ असतात. देवांचे वटवृक्ष ज्या ठिकाणी आहेत, ती अल्प आहेत. सर्व जगामध्ये देवांचे एकूण १००० वृक्ष आहेत. त्यांतील अधिकाधिक, म्हणजे २२७ वृक्ष हिंदुस्थानात आहेत. या २२७ पैकी महाराष्ट्र आणि गुजरात या भागांत १०६ वृक्ष आहेत. वटवृक्षाची माहिती परमेश्‍वर कधीच सांगणार नाही. मी परमेश्‍वराच्या आदेशानुसार बोलतो. या वटवृक्षांना १५ नावे आहेत. म्हणजे १००० वृक्षांना १५ नावे तीच ती आहेत. वर्षातील १२ पौर्णिमांपैकी कुठल्याही २ सोडून पौर्णिमेला सकाळी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर या वडाचे व्रत करायचे.

३. वडाला दैवी सामर्थ्यामुळे महत् पुण्य लाभणे

केवळ देवांच्या वृक्षांना नावे आहेत. दैवी वडाला असलेल्या दैवी सामर्थ्यामुळे महत्पुण्य लाभलेले आहे. असे वटवृक्ष तुझ्या नशिबी आलेले आहेत. जे मानवाला मिळणार नाही, ते तुझ्या वाटेला दिले आहे; पण त्याचे तुला कष्ट वाटत असतील, तर त्या मार्गाला जाऊ नको; मीपण नेणार नाही. या १५ वटवृक्षांची पूजा या १० पौर्णिमांमध्ये केव्हा जमेल, तेव्हा कर. बंधन नाही. यात महत्त्वाच्या पौर्णिमा कोजागरी, त्रिपुरी आणि वटपौर्णिमा; पण बंधन नाही. तुला वाटेल त्या दिवशी जा. फाल्गुनी पौर्णिमा सोडून केव्हाही जा. एका वर्षात तीनच वटवृक्षांची पूजा, व्रत करायला परवानगी देईन. मग तू एकाची कर, दोनांची किंवा तिनांची कर. तिनापेक्षा जास्त नाही. असे पंधरा वटवृक्षांचे पंधरा पौर्णिमांना व्रत कर.

४. वटवृक्षांची नावे घरातील लोकांनी बाहेर सांगितल्यास त्यांचे आयुष्य पंधरा वर्षांनी अल्प होणे

यांतील तीन वटवृक्षांची नावे देवांची आहेत. ही देवांची नावे घरातल्या लोकांनी बाहेर सांगितली, तर तुमचे आयुष्य पंधरा वर्षांनी अल्प होईल. जटाली वटवृक्ष, जरानाश वटवृक्ष, जमदग्नि वटवृक्ष, जटायु वटवृक्ष आणि जराज वटवृक्ष, ही पाच नावे सांगता येतील.

५. गुरूंवर श्रद्धा पक्की असेल तर वटपौर्णिमेचे व्रत करणे

मुलीला कसे सांगायचे, ते तू ठरव. तिचे ६४ वर्षांचे आयुष्य १५ वर्षांनी वाढणार आणि ७९ होणार. मी लोकांना जे देतो, ते त्यांना नको असते. कोण आयुष्य वाढवून देतो ? मुलीला म्हणावे, ‘तुला अनंत किंमत असेल, तुझी गुरूंवर श्रद्धा पक्की होत असेल, तर  वटपौर्णिमेचे व्रत कर. नाहीतर सोडून दे. यत्कश्‍चित गोष्ट म्हणून करायची असेल, तर मुळीच करू नको.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून, १०.१०.१९८१)

वटपौर्णिमेचा महिमा आणि माहिती

१. वटवृक्षाचे पुरातन नाव ‘आयुवर्धक’ असे असणे

‘वटवृक्षाचे पुरातन नाव ‘आयुवर्धक वृक्ष’ असे होते. वटवृक्ष फार पुरातन काळात, कलियुगापूर्वी ऋषिमुनींना परिचित होता. काळानुसार ‘आयु’ गेले. कालांतराने त्याला ‘वर्धवृक्ष’ म्हणू लागले.

२. बुद्धकाळात ‘वड’ शब्द प्रचलित होणे

बुद्धकाळामध्ये पाली भाषेचा परिणाम त्या शब्दावर झाला. बुद्धालाही वर्धवृक्षाचे प्रेम होते. पाली भाषेत त्याला ‘वडद’ म्हणू लागले आणि पुढे वर्षानुवर्षे वडद म्हणतांना त्याचा ‘वड’ झाला. ‘आयुष्यवर्धक’ गेले. मानवप्राण्याला त्याची माहिती होऊच नये, म्हणून ‘वड’ शब्द आला.

३. वटवृक्ष ‘तपस्वी’ म्हणजे भगवंताचा वृक्ष !

तो वृक्ष एका ध्यानस्थ तपस्व्याप्रमाणे दिसतो; म्हणून कल्पना आली ‘तपस्वी’ वृक्ष. त्याच्या पारंब्या ऋषिमुनींच्या जटांसारख्या; म्हणून त्याला ऋषिमुनींच्या आयुष्यासारखे सहस्रो वर्षे आयुष्य आहे. निसर्ग कोपला, तर सारी झाडे उन्मळून पडतील; पण वटवृक्ष एकच आहे, जो त्याला सामोरा जाऊ शकतो; कारण तो प्रत्यक्ष भगवंताचा वृक्ष आहे.

४. वटवृक्षाला शांतता हवी असणे

वटवृक्षाला ऋषिमुनींप्रमाणे शांतता लागते. आयुष्य आणि शांतता यांचा जवळचा संबंध आहे. शांत जागी रहाणार्‍या माणसांची आयुष्ये अधिक असतात; कारण शरीरधर्माच्या चलनावर गजबजाटाचा परिणाम होत असतो. गजबजाटामुळे रक्ताभिसरण बिघडून जाते. अधिक आवाज आणि गजबजाट हृदयाच्या क्रियेमध्ये बिघाड निर्माण करतात. विमानांची घरघर किंवा पुष्कळ मोठा आवाज असलेल्या ठिकाणचा कामगारवर्ग हृदयविकाराने लवकर ग्रस्त होतो. आयुष्य आणि शांतता यांचा संबंध आहे. वटवृक्ष आपल्या आयुष्याचा वर्धक असल्याने तो स्वतःसाठीही शांतता पहात असतो.

५. वटवृक्ष आणि शिवशंकर यांच्यात साम्य असणे

पूर्वीपासून वटवृक्ष निर्जन प्रदेशात, जंगलात किंवा गावाबाहेर असतो. त्या वटवृक्षाला सोबती कोण, तर शिवशंकर. शंकराला शांतता लागते. तोही गावाबाहेर असतो. तोही आयुष्य देणारा आणि तपस्वी आहे. तपस्वी वृक्ष तो शंकराचा वृक्ष, म्हणजे दोघांचीही सांगड आहे. असा हा वटवृक्ष शांततेच्या ठिकाणी वास करतो.

६. वटवृक्ष त्याच्या खाली तपश्‍चर्या करणार्‍यांना अन्न, पाणी, संतती आणि आयुष्य देत असणे

वटवृक्ष हा आयुष्याशी संबंधित असतो. तो पुरुषास आयुष्य अन् संतती देतो. वृद्धावस्था येऊ देत नाही. हा वृक्ष अन्न-पाणी देतो. साधूसंत याच्या खाली तपश्‍चर्या करण्यास बसत; कारण त्यांचे आयुष्य सहस्रो वर्षांनी वाढत असे आणि तपश्‍चर्या करतांना हा वृक्ष अन्न-पाण्याचा पुरवठा करत असे अन् करतो. ती एक साधना आहे. जात्याच कल्पवृक्षाप्रमाणे त्याच्यामध्ये अन्न-पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. कल्पवृक्ष काहीही देतो, तर वटवृक्ष अन्न-पाणी, संतती आणि आयुष्य देतो.

७. वस्ती वाढल्यावर वटवृक्षाने गुणधर्म सोडणे

कल्पवृक्ष हाव निर्माण करतो, तर वटवृक्ष माणसाला गरजेपुरते देतो. तेवढेच साधूसंतांना पाहिजे असते. असा हा वटवृक्ष मनुष्याला आवश्यक असलेल्या गोष्टी जवळ असलेला; परंतु त्याच्यापासून लांब रहाणारा असतो; कारण मानवाला माहिती झाले की, वटवृक्ष अन्न-पाणी आदी देतो, तर मग माणूस आळशी होऊन झोपून जाईल त्याच्या खाली आणि दिवसभर थैमान घालील. अन्न-पाणी आणि पौरुषत्व मिळाले, तर माणसाला आणखीन काय पाहिजे ? म्हणूनही वटवृक्ष वस्तीपासून दूर रहातो. माणसाने जसजशी वस्ती वाढवली, तसतसे वटवृक्षाने स्वतःचे गुणधर्म सोडून दिले आणि वस्तीतले वटवृक्ष म्हणजे मानवाचे वटवृक्ष झाले. चैतन्ययुक्त परमेश्‍वराची भक्ती करून करून एखाद्याला जसा दगडाच्या मूर्तीतील परमेश्‍वर प्रसन्न होतो, तशी मानवाने वटवृक्षाची पुष्कळ भक्ती करायला पाहिजे, म्हणजे वटवृक्ष त्याचे आधीचे गुणधर्म आणू शकेल. आयुष्यभर कामे केल्यावर त्याच्यात आधीचे हे गुणधर्म आले, तर हे वटवृक्ष मानवाचे झाले.

८. शांतस्थळीच्या वटवृक्षाचे लाभ

गावाच्या बाहेर थोडे दूर असलेले वटवृक्ष पुण्यवंतांचे, त्यानंतर किन्नरांचे आणि मग देवांचे होतात. शांतस्थळी जे वटवृक्ष आहेत. त्या वटवृक्षाचा आणखी एक लाभ वयोमानानुसार पतीराजांचे तिच्या मानाने तारुण्य न्यून होत जाईल. त्यांना विरक्तीच येऊ पहाते; पण पाहिजे असल्यास कदाचित् बेट्याला आदेश देऊन त्यांना आयुष्य वाढत असतांना तारुण्यप्राप्तही होऊ शकेल. हे सगळे यश एका पोरीच्या नशिबात आले आहे.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून, ११.१०.१९८१)


Multi Language |Offline reading | PDF