पानसरे हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार दूर; पण अद्याप मारेकर्‍यांचाही शोध लागलेला नाही ! – न्यायालयाने केला असंतोष व्यक्त

येत्या १४ दिवसांत मोठी कारवाई होणार असल्याची सरकारी अधिवक्त्यांची माहिती

मुंबई – पानसरे हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार तर दूरच; पण अद्याप मारेकर्‍यांचाही शोध लागलेला नाही, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांच्या कारवाईविषयी असंतोष व्यक्त केला. या वेळी शासकीय अधिवक्त्यांनी दाभोलकर -पानसरे हत्या प्रकरणात समान दुवा सापडला असून येत्या १४ दिवसांत मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन न्यायालयाला दिले. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येविषयी दोन्ही कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर १४ जून या दिवशी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.

या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘नव्याने अटक केलेल्या आरोपींच्या अन्वेषणातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी खाडीत फेकलेले हत्यार शोधून काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडून अनुमती प्राप्त झाली असून लवकरच कामाला प्रारंभ करण्यात येईल’, असे सांगितले. या दोन्ही हत्यांच्या अन्वेषणामध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आतंकवादविरोधी पथक यांना सर्वतोपरी साहाय्य करता यावे, यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना गृह आणि अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची बैठक घेण्यास सांगितले होते. त्यानुसार बैठक घेण्यात आल्याची माहिती सरकारी अधिवक्त्यांनी न्यायालयाला दिली. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने ४ आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

शासन आणि राजकीय नेते यांनी अन्वेषणात ढवळाढवळ करू नये ! – न्यायालयाचे निर्देश

न्यायालयाने मात्र धर्मनिरपेक्षता आणि समानता यांच्या घोषणा देणारे सरकार अन् राजकीय पक्षांचे नेते यांनी अन्वेषणाच्या कामात ढवळाढवळ करू नये, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now