युवकांनो, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी धर्मशिक्षण घ्या !

युवकांकडून स्वधर्माचा तिरस्कार आणि अन्य धर्मांचे अंधानुकरण !

सध्या नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे यांमधून हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, देवता, धर्मपुरुष यांचे विडंबन (विनोद), तसेच टीका केली जाते. गेल्या ७ दशकांत निधर्मीवादाचा उदोउदो होऊन ‘हिंदु’ म्हणजे बुरसटलेले, जुनाट असे वातावरण निर्माण करण्यात आले. दुसरीकडे हिंदूंचे धर्मशिक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे आता नव्या पिढीला हिंदु धर्म, संस्कृतीनुसार आचरण करणे मागासलेपणाचे वाटते. साम्यवादी आणि निधर्मीवादी वातावरण निर्माण केल्याने अन्य धर्म, त्यांच्या चालीरिती, परकीय भाषा श्रेष्ठ वाटतात. त्यामुळे हिंदूंची नवी पिढी पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणातून उद्भवलेल्या नीतीशून्यतेच्या आहारी गेली आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशीप’, विवाहबाह्य संबंध, समलैंगिकता, व्यसनाधिनता, क्रूरता, गुंडगिरी, अत्याचारी प्रवृत्ती, आत्महत्या करणे या सार्‍या विकृत गाष्टी सध्या समाजव्यवस्थेत पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आकर्षणातून निर्माण झाल्या आहेत. स्पर्धा, कथित पुरोगामित्व, चंगळवाद पोसणार्‍या या पाश्‍चात्त्य संस्कृतीचे हे दुष्परिणाम आहेत. धार्मिक उत्सवांत युवक बलपूर्वक वर्गणी गोळा करणे, अश्‍लील नाचगाणी, मद्यपान, धूम्रपान, युवतींची छेडछाड असे अपप्रकार करतात. हिंदु युवकांना देवतांचे पावित्र्य कसे जपावे, हे शिकवले जात नाही. इतर धर्मियांना धर्मशिक्षण देण्यासाठी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये व्यवस्था आहे. तशी हिंदु युवकांसाठी नाही. किती युवकांना ‘गीते’विषयी ठाऊक असते ? वरील सर्व दुःस्थिती लक्षात घेता हिंदु युवकांना धर्मशिक्षण देणारी अशी व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल.

युवकांनो, भारताच्या पुनरुत्थानाची आवश्यकता ध्यानात घ्या !

भारताचा पूर्वीचा गौरव परत मिळणे आवश्यक आहे; कारण भारताचा स्वाभिमान हा संपूर्ण मानवजातीचा स्वाभिमान आणि गौरव आहे. भारतातील सनातन अशा मूल्यांवर संपूर्ण मानवजातीचे भविष्य अवलंबून आहे, हे गांभिर्याने लक्षात घ्या ! इंग्रजांनी निर्माण केलेले कायदे, त्यांची भाषा, पोषाख, आचार, विचार, आहार स्वातंत्र्यानंतर पालटले गेले नाहीत.  ते अर्धवट राहिलेले काम आता भारतीय युवकांना पूर्ण करायला हवे. हेच भारताचे पुनर्निर्माणकार्य ! इंग्रजी प्रथा आणि पाश्‍चात्त्य विचारसरणी आज स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी हे सर्व अधिक विपर्यस्त आणि अन्यायी रूपात भारतात चालूच आहेत. त्यामुळे  बुद्धिवादी युवकांना निधर्मीवाद, साम्यवाद, मानवतावाद या तथाकथित वादांच्या पुढे प्रत्यक्षात सर्वव्यापी हिंदु धर्म प्रतिगामी वाटत आहे. इंग्रजांची धोरणे जी आपल्या शासकीय व्यवस्थेचा एक भागच बनलेली आहेत, तीदेखील पालटायला हवीत. देशाचे झालेले इंग्रजीकरण नष्ट करून पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा ! स्वातंत्र्याची पहिली लढाई इंग्रजांना हाकलून देण्यासाठी लढली गेली, आता ही दुसरी लढाई हे इंग्रजीकरण पळवून लावण्यासाठी लढावी लागेल. यानंतरच भारताचे नवनिर्माण होईल. हा इंग्रजीकरणाचा ढाचा मोडून काढल्यावरच भारतात खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य आणि स्वराज्य नांदू लागेल आणि हेच स्वप्न आपल्या सर्व आदरणीय क्रांतीकारकांनी पाहिले होते.

(‘भारत स्वाभिमान’प्रणित ‘मैत्री परिवार, गोवा’ द्वारा प्रकाशित पुस्तक ‘भारत का पुनरुत्थान’(प्रस्तावना))

युवकांनो, पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी पडू नका !

समाजजीवनाच्या दृष्टीने हिंदु धर्म प्र्रतिगामी आहे, असे पुष्कळ क्रांतीकारकांचे आणि समाजसुधारकांचे मत होते. पुरोगाम्यांनी हिंदुद्वेष आणि स्वार्थ यासाठी हा प्रसार चालू ठेवला आहे. प्रत्यक्षात हिंदु धर्म हा समाजविरोधी नसून संपूर्ण विश्‍वाचा विचार करणारा आहे. केवळ मानवाचा नव्हे, तर सकल प्राणीमात्रांचा विचार करणारा व्यापक आहे. धर्मनिष्ठ महापुरुषांनी साधनेच्या बळावरच जगामध्ये उदात्ततेचे आदर्श वेळोवेळी निर्माण केले आहेत आणि त्या आदर्शांकडे जाण्याचे आवाहन समाजमनाला केले आहे. अंनिससारख्या नास्तिक आणि धर्मविरोधी संस्था धर्माचरणातील कृती पर्यावरणविरोधी असल्याचे धादांत खोटे थोतांड निर्माण करून आणि ‘धर्माचरण न करता दान करा’ असा प्रसार करून समाजाला धर्माचरणापासून परावृत्त करत आहेत. धर्मशास्त्र समजून घेतले, तर हे पुरोगाम्यांचे हे हिंदुद्वेषापोटी रचलेले कुभांड सहज लक्षात येते. त्यासाठी धर्माचरणाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

युवकांनो, वैचारिक परिवर्तन करण्यासाठी कृतीशील व्हा !

कै. राजीव दीक्षित यांनी आंतरराष्ट्रीय आस्थापनांच्या अर्थकारणाचे षड्यंत्र उघड करून भारतीय आहार-विहाराचे महत्त्व लक्षात आणून दिले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून केलेले हिंदु संस्कृतीतील आहार, विहार, पोषाख, केशभूषा, अलंकार आदी सर्वांचेच आणि त्या अनुषंगाने सत्त्वप्रधान हिंदु संस्कृतीविषयीचे वैज्ञानिक संशोधन आणि त्याचे शास्त्रशुद्ध महत्त्व विविध माध्यमांतून समाजात पोहोचवत आहे. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद घोष आदी संतांनीही विदेशात जाऊन भारतीय संस्कृती आणि धर्म यांचे महत्त्व सांगितले. आज चंगळवादाच्या दुष्परिणामाने त्रस्त होऊन विदेशी मोठ्या प्रमाणात भारतीय संस्कृतीप्रमाणे धर्माचरण करत आहेत आणि भारतात मात्र तथाकथित पुरोगामी आणि बुद्धीवादी साम्यवादाची कास धरून हिंदूंचे धर्मशास्त्र, प्रथा परंपरा यांना विरोध करत आहेत अन् समाजाचा बुद्धीभेद करत आहेत. त्यामुळे सुखी आणि समृद्ध जीवन देणार्‍या हिंदु धर्माचे आणि धर्माचरणाचे महत्त्व युवकांमध्ये विविध माध्यमांतून अधिकाधिक कसे पोहोचेल, त्याच्या वैचारिक चर्चा कशा घडतील, हे पहाणे, हे आजच्या युवकांचे प्रथम राष्ट्र आणि धर्म कर्तव्य ठरेल ! हिंदु धर्माला होणार्‍या विरोधाचे वैचारिक खंडण करत रहाणे, ही आजच्या युवकाची समष्टी साधना आहे.

हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व जाणा !

स्वामी विवेकानंद हिंदु धर्माविषयी अभिमानाने बोलायचे. वेद आणि उपनिषदे यांतील अनेक संदर्भ देऊन त्यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पाश्‍चात्त्यांना सांगितले. जगाचा आध्यात्मिक गुरु म्हणून भारताकडे पाहिले जाते. अन्य कोणत्याही धर्माकडे नाही इतके उच्च प्रतीचे ज्ञान वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण यांच्या माध्यमातून ऋषिमूनींनी आपल्यासाठी लिहून ठेवले आहे. ब्राह्मतेजाविना हिंदूसंघटन अशक्य आहे. हिंदुत्वनिष्ठ युवकांना हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व समजले, तर धर्मद्रोही, पाखंडी आणि इतर धर्मांचे प्रसारक यांच्या हिंदुविरोधी विचारांचे बौद्धिक खंडण ते करू शकतील.

युवकांनो, सनातन हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून त्याचा अंगीकार करा !

आज जगभरात भारतीय वेद, परंपरा याचे आकर्षण वाढीस लागून त्यावर पाश्‍चात्त्य मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहेत. कित्येक वैज्ञानिक शोधांची मुळे वेदांत आढळतात. आज विश्‍वाला वेदांचे आकर्षण असून भारतीय युवक मात्र त्याच्या ज्ञानापासून कोसो दूर आहेत. मध्यमवर्गीय तरूण पैसा कमवण्यात व्यग्र आहेत. कित्येक पाश्‍चात्त्य मात्र सुखोपभोगाला कंटाळून येथील संस्कृतीचे महत्त्व जाणून, मनःशांतीसाठी सनातन हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण आणि साधना करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन युवकांनी महान भारतीय अशा ऋषिमूनींच्या संस्कृतीचा अभ्यास करून त्याचा सार्थ अभिमान बाळगणे आणि त्या संस्कृतीचा अंगीकार करणे चालू केले पाहिजे म्हणजेच धर्माचे महत्त्व समजून घेऊन धर्माभिमान बागळून धर्माचरण केले पाहिजे. यातूनच युवकांना हिंदु राष्ट्र आणि संस्कृती यांचे महत्त्व पटेल. त्यातूनच धर्म कळेल आणि युवकांचा आत्मसन्मान जागृत होईल.

– श्री. आनंद जाखोटिया, राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती


Multi Language |Offline reading | PDF