‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’च्या प्रथम दिवसाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गोवा येथील रामनाथ देवस्थानातील सभागृहामध्ये चार दिवसांचे ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या प्रथम दिवसाचे, म्हणजे ५.६.२०१९ या दिवशी श्री. निषाद देशमुख यांनी केलेल्या सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग आपण १३ जून २०१९ या दिवशीच्या अंकात पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

श्री. निषाद देशमुख

उद्बोधन सत्र – व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे धर्मसंस्थापनेच्या दृष्टीने महत्त्व आणि धर्मप्रेमींना झालेले लाभ

१. पू. नीलेश सिंगबाळ मार्गदर्शन करतांना लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

पू. नीलेश सिंगबाळ

अ. हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि उत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेशदादा यांनी विषय घेणे चालू केल्यावर पुष्कळ सुगंध येत होता. या सुगंधामुळे मनाला उत्साह येत होता. पू. नीलेशदादा यांच्यातील समष्टी तळमळीमुळे इतरांवर त्यांच्या चैतन्याचा परिणाम होऊन त्यांच्यात उत्साह निर्माण होतो.

आ. पू. नीलेशदादा यांनी श्रोत्यांना प्रश्‍न विचारणे चालू केल्यावर त्यांच्याकडून उत्स्फूर्त उत्तरे दिली जात होती. व्यासपिठावर बसलेल्या संतांच्या अस्तित्वातून कार्य होत असल्याने धर्मप्रेमींच्या उत्साहामध्ये वाढ झाल्याने त्यांच्या सहभागाचे प्रमाणही अधिक होते.

इ. पू. नीलेशदादा आध्यात्मिक उपायांचे महत्त्व सांगत असतांना वायूमंडलात मोठ्या प्रमाणावर पंचतत्त्वे जागृत होत असल्याचे दिसले. पू. नीलेशदादा यांची समष्टी प्रकृती असल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा परिणाम समष्टीतील पंचतत्त्वांवर होऊन त्यांची जागृती आणि कार्यरतता यांमध्ये वाढ होते.

ई. पू. नीलेशदादा बोलतांना त्यांच्यातील शिष्यभाव आणि साधकत्व यांमुळे ऐकणार्‍या सर्वांमध्ये शिकण्याची वृत्ती वाढत होती.

उ. पू. नीलेशदादा यांचे बोलणे धर्मप्रेमींचे थेट मन आणि बुद्धी यांवर परिणाम करत होते.

ऊ. पू. नीलेशदादा शिष्यभावात राहून सर्व विषय सांगतात. ‘शिष्यभाव’ हा मूळ भाव असल्याने त्या भावात रहाणार्‍या जिवात स्वीकारण्याची वृत्ती निर्माण होते. यामुळे विविध प्रकृती आणि भाव असलेल्या जिवांशी विवाद न होता शिष्यभावामुळे त्यांच्याशी जुळवून घेणे त्यांना सहज शक्य होते.’

२. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर मार्गदर्शन करतांना लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

अ. ‘सनातनच्या मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) अनुराधाताई (अनुताई) यांनी बोलणे सुरू केल्यावर वातावरणात सुगंध पसरणे चालू झाले. या सुगंधाचा परिणाम प्राणशक्तीवर झाल्यामुळे हलके वाटत होते, तर मनावर झाल्यामुळे अंतर्मुखता येत होती. ‘सद्गुरु (कु.) अनुताई यांच्यातील ‘प्रीती’ या गुणामुळे त्यांचे चैतन्य बोलण्यातून सर्वांकडे प्रक्षेपित होऊन व्यापक स्तरावर परिणाम करते.

आ. सद्गुरु (कु.) अनुताई बोलतांना त्यांचा सूक्ष्मदेह सूक्ष्म जगतामध्ये, तर त्यांचा स्थूलदेह स्थूल विश्‍वात कार्य करत आहे. ‘सद्गुरु अनुताई यांचे अस्तित्वातून कार्य करण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांचे सूक्ष्म विश्‍वात कार्य चालू झाले आहे. यामुळे त्या स्थुलातून देहभानविरहित एका विशिष्ट स्थितीकडे जात आहेत. त्यांच्याकडून एकाच वेळी सूक्ष्मातील कार्य वेगळे आणि स्थुलातील कार्य वेगळे चालू झाले आहे.

इ. सद्गुरु (कु.) अनुताई बोलतांना त्यांचे मन पूर्णपणे रिक्त असल्याने त्यात ईश्‍वरी शक्तीचा प्रवाह गतीने येऊन त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून लगेच प्रगट होत आहेे. ईश्‍वरी शक्ती ग्रहण आणि प्रक्षेपित करण्याचे प्रमाण जेवढे अधिक असते, त्यानुसार त्याची परिणामकारकता असते. यामुळे सद्गुरु अनुताई यांच्या सत्संगात लगेच पालट होण्याची अनुभूती येते.

ई. सद्गुरु (कु.) अनुताई यांचे मन पारदर्शक दिसले. यामुळे कोणत्याही जिज्ञासूने प्रश्‍न विचारल्यावर त्याच्या मनाची स्पंदने सहजतेने सद्गुरु ताई यांच्या मनावर उमटत असल्याने त्यांना ईश्‍वराला अपेक्षित असे उत्तर देणे सहजतेने शक्य होते.

उ. सद्गुरु (कु.) अनुताई थेट गुरुतत्त्वाशी एकरूप होत असल्याने त्यांना आकाशतत्त्वाच्या स्तरावरील ज्ञान, म्हणजे समष्टीच्या साधनेसाठी आवश्यक तत्त्व आणि धोरण असे ज्ञान ग्रहण करणे सहजतेने शक्य होते. यामुळे चालू असलेल्या प्रसंगांत समष्टीची मानसिकता ओळखून आवश्यक त्या साधनेचे तत्त्व ईश्‍वराकडून ग्रहण करून त्यासंदर्भात मार्गदर्शन करणे त्यांना सहज शक्य होते.

ऊ. सद्गुरु (कु.) अनुताई मार्गदर्शन करतांना आणि करत नसतांना त्यांची सूक्ष्मातून दिसणारी वैशिष्ट्ये

१. मार्गदर्शन करतांना : या वेळी त्यांच्याभोवती लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगांची वलये दिसतात अन् त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी श्‍वेत प्रकाश दिसतो. मार्गदर्शन करतांना त्या सगुणात येत असल्याने त्यांच्यात मारक-तारक आणि तारक-मारक शक्तींची वलये निर्माण होतात.

२. मार्गदर्शन करत नसतांना : या वेळी त्यांच्या सहस्रारचक्रावर पांढर्‍या रंगाचे गोल वलय दिसते. मार्गदर्शन करत नसतांना त्या निर्गुणात असल्याने त्यांच्या सहस्रारचक्रावर वलये दिसतात.

ए. सद्गुरु (कु.) अनुताई यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अडवायला पाताळातील बलाढ्य वाईट शक्ती करत असलेल्या तीव्र आक्रमणांमुळे सर्व धर्मप्रेमींवर आपतत्त्वाशी निगडित काळ्या शक्तीचे आवरण निर्माण होत होते.

ऐ. सद्गुरु (कु.) अनुताई मार्गदर्शन करतांना त्या गुरुतत्त्वाच्या अखंड अनुसंधानात असतात. त्यामुळे समाजाला मार्गदर्शन करतांनाही त्यांच्या मानेपासून चेहरा एवढाच भाग हलतो, तर बाकीचा देह स्थिर असतो. केवळ ध्वनीक्षेपक (माईक), पाणी इत्यादी घेण्यासाठी त्यांच्या देहाची हालचाल होते.’ (समाप्त)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०१९, रात्री ११)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF