गांधीनगर येथील मुख्य रस्त्याच्या गटारीतील प्लास्टिक कचरा तात्काळ काढून त्यावर उपाययोजना करा ! – शिवसेनेचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

कोल्हापूर, १३ जून (वार्ता.) – गांधीनगर ही पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कापडपेठ असून गांधीनगर मुख्य रस्ता पाच ग्रामपंचायतींमध्ये येतो. यातील गडमुडशिंगीमधून मोठा ओढा आला असून तो गांधीनगर येथील मुख्य रस्त्यावरून पंचगंगा नदीकडे जातो. मुख्य रस्त्यावरील गटारे प्लास्टिक कचर्‍याने पूर्णपणे भरलेली आहेत. पावसाचे पाणी ओढ्यात आल्यावर गटारातील कचर्‍यामुळे ते पुढे न जाता रस्त्यावर येते. त्यामुळे मुख्य मार्ग बंद होतो आणि नागरिक, विद्यार्थी यांना त्रास होतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांतही पाणी जात असल्याने दुकानदारांची पुष्कळ हानी होते. ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील वादामुळे हा कचरा स्वच्छ होत नाही. तरी गांधीनगर येथील मुख्य रस्त्याच्या गटारातील प्लास्टिक कचरा तात्काळ काढा आणि यावर उपाययोजना करा, असे निवेदन करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी श्री. अमन मित्तल यांना दिले.

या वेळी सर्वश्री अवधूत साळोखे, पोपट दांगट, विनोद खोत, सागर पाटील, विक्रम चौगुले, अजित चव्हाण, सुनील निरंकारी, योगेश लोहार, भारत खोत यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. हे निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गांधीनगर येथे जाऊन पाहणी करून कचरा काढण्याचे आदेश दिले, तसेच निवेदनामुळे गांधीनगर ग्रामपंचायतीनेही स्वच्छता चालू केली. (शिवसेनेने दिलेल्या निवेदनातील सूत्रे सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का लक्षात येत नाहीत ? निवेदन दिल्यानंतर जर प्रशासन कृती करणार असेल, तर प्रशासनाच्या खर्चिक डोलार्‍याचा उपयोग काय ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF