परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि आश्रमातील चैतन्य, यांमुळे झोप न्यून झाल्याची साधकाला आलेली अनुभूती !

श्री. विक्रम डोंगरे

१. सेवेमुळे झोपेचा कालावधी न्यून होणे, झोप पूर्ण न झाल्याने मनाचा संघर्ष होणे आणि थकवा येणे : ‘मला प्रतिदिन साधारण ७ घंट्यांची झोप आवश्यक आहे. असे असले, तरी गेल्या काही मासांपासून मला तेवढी झोप मिळत नाही. सेवेमुळे माझे झोपेचे घंटे न्यून झाले आहेत. ‘झोपेचे किती घंटे प्रलंबित आहेत ?’, असा विचार होऊन माझ्याकडून ते मोजले जात असत. झोप पूर्ण न झाल्याने माझ्या मनाचा संघर्ष होत असे, तसेच मला थकवाही येत असे.

२. गेल्या २ – ३ मासांपासून प्रतिदिन ५.३० ते ६ घंटे झोप होऊनही ताजेतवाने वाटणे, ‘थकवा येणे’, यांसारखे त्रास न्यून होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि आश्रमातील चैतन्य’, यांमुळेच हे शक्य होत आहे’, असे जाणवणे : गेल्या २ – ३ मासांपासून माझ्या लक्षात आले, ‘रात्री उशिरापर्यंत सेवा केली, तरी मला ताजेतवानेच वाटते.’ आता सरासरी ५.३० ते ६ घंटे झोप होते, तरी ‘थकवा येणे’, यांसारखे त्रास न्यून झाले आहेत. आधी दुपारी झोप घेत असे. आता मी क्वचित प्रसंगीच दुपारी झोपतो आणि तेव्हा मला ३० मिनिटांची झोपही पुरते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि आश्रमातील चैतन्य, यांमुळेच हे शक्य होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

३. हे सूत्र एका संतांना सांगितल्यावर त्यांनी ‘झोप म्हणजे तमोगुण असून साधनेमुळे आपल्यातील तमोगुण न्यून होत जातो’, असे सांगणे : मी हे सूत्र एका संतांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘झोप म्हणजे तमोगुण. साधनेमुळे आपल्यातील तमोगुण न्यून होत जातो. ऋषिमुनी सहस्रो वर्षे तपश्‍चर्या करायचे. ते कुठे झोपायचे ?’’ यातून ‘साधनेचे महत्त्व कसे आहे आणि ती कोणत्या स्तरापर्यंत कार्य करू शकते ?’, हे मला शिकायला मिळाले.

४. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा समर्पित भावाने करवून घेण्यासाठी त्यांच्या चरणी केलेली प्रार्थना ! : गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना आणि सेवा करायची संधी मिळत आहे, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती शून्यसमानच आहे. ‘गुरुदेवा, आमच्याकडून आपल्याला अपेक्षित अशी सेवा समर्पित भावाने करवून घ्या. जीव ओतून सेवा करून आम्हाला आपले मन जिंकायचे आहे, त्यासाठी आमच्यावर कृपा करा.’

– श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF