सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनामुळे ‘कार्यकर्ता’ ते ‘साधक’ असा प्रवास करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणारे श्री. दत्तात्रय पिसे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या वस्तूनिष्ठ आणि चैतन्यदायी मार्गदर्शनामुळे ‘कार्यकर्ता’ ते ‘साधक’ असा प्रवास घडून ६१ टक्के आध्यात्मिक  पातळी प्राप्त करता आली, याविषयी श्री. दत्तात्रय पिसे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर येथील साधक श्री. दत्तात्रय पिसे वर्ष २००० पासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आहे. स्वतःच्या साधनाप्रवासात ‘सद्गुरु स्वातीताईंचे वस्तूनिष्ठ आणि चैतन्याच्या स्तरावरील मार्गदर्शन लाभल्याने कसा लाभ झाला ?’, याविषयी त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे देत आहोत.

‘सद्गुरु (कु.) स्वाती खाडये सोलापूरला नियमित येतात, तसेच कधी कधी भ्रमणभाषवर साधनेचा आढावा घेऊन ‘नेमके काय करावे ?’, याविषयी अनमोल मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला झालेले लाभ पुढे देत आहे.

श्री. दत्तात्रय पिसे

१. सद्गुरु स्वातीताईंनी व्यष्टी साधनेविषयी निर्माण केलेले गांभीर्य

१ अ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष झाल्याने सेवेत पुष्कळ चुका होणे, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी कठोर शब्दांत चुकांची जाणीव करून दिल्यावर व्यष्टी साधनेकडे ओढा वाढून प्रयत्न होणे: एकदा हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेत असतांना मी व्यष्टी साधनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ प्रसारासाठी वेळ दिला. परिणामी माझ्यावरील आवरण पुष्कळ वाढून माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या. सभा झाल्यावर सद्गुरु स्वातीताईंनी सांगितले, ‘‘गुरुदेवांना केवळ कार्य होणे अपेक्षित नसून ‘प्रत्येक साधकाची साधना व्हावी’, अशी त्यांची तळमळ आहे. तुम्हीच तुमच्या साधनेची हानी करून घेतली आहे.’’ मी त्यांची क्षमायाचना केल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘क्षमा मागून साधनेची झालेली हानी कशी भरून येईल ?’’ त्यानंतर माझा व्यष्टी साधना करण्याचा ओढा वाढला. आता माझ्या लक्षात आले, ‘चुकीच्या दिशेने वाढणार्‍या झाडाच्या फांद्या जशा छाटाव्या लागतात, त्याचप्रमाणे अयोग्य दिशेने भरकटणार्‍या मनाला कठोरपणे जाणीव करून द्यावी लागते. साधकांच्या साधनेची हानी टाळण्यासाठी सद्गुरु स्वातीताई सतर्क राहून प्रसंगी कठोर शब्दांत त्यांना जाणीव करून देतात. त्यामुळे साधकांना लाभ झाल्याचे दिसून येतेे.’

१ आ. स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी चुकीचे वागल्याचे सद्गुरु स्वातीताईंना सांगणे आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर साधनेच्या प्रयत्नांत वृद्धी होऊन ‘कार्यकर्ता’ न रहाता ‘साधक’ बनण्याचा विचार दृढ होणे : एकदा मी सद्गुरु स्वातीताईंना व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी मी कसे अयोग्य वागलो’, याविषयी सांगितले. यावर त्या म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरुदेव आपल्याला अंतर्बाह्य जाणतात. आपण त्यांना फसवू शकत नाही. मग हे खोटे वागणे आणि हा ढोंगीपणा कशासाठी ? हे सर्व व्यर्थ विचार बाजूला ठेवून ‘केवळ साधना व्हावी’, याचा ध्यास घेऊन जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून बाहेर पडण्याचे ध्येय असायला हवे.’’ तोपर्यंत ‘मी केवळ कार्यकर्ताच रहाणार आणि मला व्यष्टी साधना जमणार नाही’, असे मला वाटत होते. सद्गुरु स्वातीताईंच्या या मार्गदर्शनानंतर माझ्या साधनेच्या प्रयत्नांत वृद्धी झाली आणि माझा साधक बनण्याचा विचार दृढ झाला.

१ इ. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्याप्रमाणे मन निर्मळ आणि सात्त्विक होण्याविषयी विचारप्रक्रिया चालू होणे अन् त्यांच्या बोलण्यातून संकल्प होऊन मनातील राग, द्वेष आणि प्रतिक्रिया न्यून होत असल्याची जाणीव होऊ लागणे : एकदा मी मनाच्या स्थितीविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याला गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे असल्याने मन सात्त्विक हवे. देवाला चांगले फूल अर्पण करतो, त्याप्रमाणे आपले मनही निर्मळ हवे. आपल्या मनात इतरांविषयी अकारण प्रतिक्रिया, राग आणि द्वेषाचे विचार असतील, तर ते देवाला आवडेल का ?’’ त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर ‘मन निर्मळ आणि सात्त्विक होण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी माझी विचारप्रक्रिया चालू झाली. खरेतर सद्गुरु स्वातीताईंच्या वाणीतून त्यांचा संकल्पच झाला होता आणि त्यातून मिळालेल्या चैतन्याने माझ्या मनातील राग, द्वेष, तसेच प्रतिक्रिया न्यून होऊ लागल्या.

२. ‘सर्वांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असा सद्गुरु स्वातीताईंना असलेला ध्यास !

सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन ऐकतांना त्यांना ‘प्रत्येक साधक, धर्मप्रेमी, हितचिंतक, वर्गणीदार आणि अर्पणदाते या सर्वांची आध्यात्मिक उन्नती व्हायला हवी’, असा ध्यास असतो’, असे मला जाणवते.

३. अनुभूती

३ अ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या वाणीतील चैतन्यामुळे ‘साधनेसाठी बळ मिळत आहे’, असे जाणवणे : सद्गुरु स्वातीताईंनी २ वेळा मला ‘साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत’, असे सांगितले. त्या वेळी ‘माझा आध्यात्मिक त्रास न्यून होत आहे आणि त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे मला हलकेपणा जाणवून साधना वाढवण्यासाठी बळ मिळत आहे’, असे मला जाणवले.

३ आ. सद्गुरु स्वातीताईंनी पाठवलेला प्रसाद हातात घेतल्यावर ‘अंतर्मनात काहीतरी चांगले होत आहे’, असेे जाणवणे : एकदा हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी ‘सेवा चांगली झाली’; म्हणून सद्गुरु स्वातीताईंनी मला प्रसाद पाठवला होता. प्रसाद हातात घेतल्यावर तो ग्रहण करण्यापूर्वीच ‘माझ्या अंतर्मनात काहीतरी चांगले होत आहे आणि माझ्यावर देवाची कृपा होत आहे’, असे मला जाणवले. प्रसादाच्या माध्यमातून ‘सद्गुरु स्वातीताईंनी सूक्ष्मातून मला आध्यात्मिक लाभ करून दिला’, असे मला जाणवले.

कृतज्ञता

माझ्या साधनाप्रवासात मला सद्गुरु स्वातीताईंचे वस्तूनिष्ठ आणि चैतन्याच्या स्तरावरील मार्गदर्शन लाभल्याने मला परात्पर गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. साधकाला स्वतःच्या प्रयत्नांपेक्षा ‘संतांचा संकल्प आणि त्यांच्या मनात साधकाविषयी आलेला विचार’ अनेक पटींनी पुढे घेऊन जातो’, हे मला अनुभवता आले. आम्हाला अशा सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभले, यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. दत्तात्रय पिसे, सोलापूर (९.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF