५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील बालसाधक कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १२ वर्षे) याला आलेल्या विविध अनुभूती

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. राम आचार्य हा एक आहे !

कु. राम आचार्य

(‘कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १२ वर्षे), याची वर्ष २०१७ मध्ये ५५ टक्के पातळी होती.’ – संकलक)

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७६ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राभोवती सप्तरंगांचे वलय दिसणे

‘मी मागच्या वर्षी ‘प्रोजेक्टर’वर परात्पर गुरुदेवांचा ७६ वा जन्मोत्सव सोहळा पहात होतो. त्या वेळी मला त्यांच्या छायाचित्राभोवती सप्तरंगांचे वलय दिसले. ‘त्या वलयातील सप्तरंगांच्या माध्यमातून अनेक दैवी सिद्धींचे वातावरणात प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.

१ अ. वलयातील सप्तरंगांच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या दैवी शक्ती : परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राभोवतीच्या वलयातील सप्तरंगांतून वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या दैवी शक्तींविषयी मला पुढील सूत्रे जाणवली.

१. परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राच्या भोवतालच्या वलयातील जांभळा, पारवा आणि निळा या रंगांतून शक्ती प्रक्षेपित होत असून ती साधकांना होणार्‍या अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प करत आहे.

२. सप्तरंगातील हिरव्या रंगातून परात्पर गुरुदेव साधकांना प्राणशक्ती देत आहेत.

३. पिवळ्या रंगातून परात्पर गुरुदेव चैतन्य प्रक्षेपित करत आहेत.

४. नारिंगी रंगातून परात्पर गुरुदेव साधकांना साधनेसाठी बळ प्रदान करत आहेत.

५. तांबड्या रंगातून ते साधकांना शक्ती प्रदान करत आहेत.

१ आ. परात्पर गुरुदेवांच्या भोवतीचे सप्तरंगांचे वलय पहात असतांना मला मोठ्या प्रमाणात त्यांची प्रीती जाणवत होती.

१ इ. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, जसे सर्व रंग मिळून पांढरा रंग होतो, तसेच साधना करत असतांना गुरुच सर्व अडथळे दूर करून साधकांना प्राणशक्ती आणि चैतन्य देऊन मोक्ष मिळवून देतात; कारण पांढरा रंग हा चैतन्यदायी असून मोक्ष देणारा आहे (मोक्षाचे प्रतीक आहे.), तसेच गुरुही असतात.

२. ‘साधनेसाठी कोणते चांगले गुण हवेत ?’, हे फलकावर आपोआप लिहिले जात असल्याचे दिसून संत भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवणे, संत भक्तराज महाराज ते गुण चिन्हांकित करत असल्याचे दृश्य सूक्ष्मातून दिसणे आणि पूर्वी कधीतरी हा सोहळा पाहिला असल्यासारखे वाटणे

वर्ष २०१७ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन संपन्न झाल्यावर सौ. गौरी खिलारे यांचे सर्व साधकांसाठी साधनेसंदर्भात मार्गदर्शन चालू झाले. ‘साधकात कोणते चांगले गुण असायला हवेत ?’, हे त्या सांगत असतांना मला त्या ठिकाणी संत भक्तराज महाराज आल्याचे दिसले. तेथे एक फलक होता. सौ. गौरी खिलारे साधकांना साधनेसाठी आवश्यक असलेले गुण सांगत असतांना त्या फलकावर ते गुण आपोआप लिहिल्याचे दिसत (शब्द उमटत) होते. या गुणांपुढे रिकाम्या चौकटीत संत भक्तराज महाराज ‘बरोबर’ आणि ‘चूक (फुली)’ हेे चिन्हांकित करून लिहित होते. हे करत असतांना ते प्रत्येक वेळी माझ्याकडे पहात होते आणि ‘माझ्यात ते गुण आहेत का ?’, हे पाहून लिहित होते.

हा कार्यक्रम झाल्यावर मी सभोवताली पाहिले. तेव्हा मला ‘मी हे सर्व पूर्वी कधीतरी पाहिले आहे’, असे जाणवले. मी पाहिलेले तेच हे स्थान, तीच वेळ आणि तोच हा सोहळा होता.

३. रथसप्तमीच्या दिवशी व्यंकटेश मंदिरात गेल्यावर वीज नसणे आणि देवाला नमस्कार केल्यावर वीज येणे

सुयोगाने रथसप्तमीच्या दिवशी मला व्यंकटेश मंदिरात जाता आले. माझ्या समवेत माझी आत्या (सुरेखा आचार्य) होती. आम्ही दोघे मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करत होतो. तेव्हा वीज नसल्याने गाभार्‍यात काळोख होता. आम्ही देवाला नमस्कार करून प्रार्थना करत असतांना चमत्कार झाला. वीज आली आणि मला व्यंकटेशाचे चांगले दर्शन झाले.

४. मंदिरात संत ज्ञानेश्‍वर यांच्या मूर्तीचे दर्शन होणे आणि गुरुपौर्णिमेसाठी घेतलेल्या दोन ध्येयांमधील संत ज्ञानेश्‍वर यांची भेट होण्याचे ध्येय देवाच्या कृपेने पूर्ण झाल्यामुळे पुष्कळ आनंद होणे

त्या मंदिरात मला संत ज्ञानदेवांची मोठी मूर्ती दिसली. ती पाहून माझी आत्या मला म्हणाली, ‘‘हे तुझे आवडते संत आहेत ना रे !’’ त्या वेळी मी काही न बोलता गप्प बसलो होतो; कारण मला तेव्हा पुष्कळ आनंद झाला होता. त्याचे कारण म्हणजे मी आत्यासह गुरुपौर्णिमेच्या पूर्वी झालेल्या शिबिराला गेलो होतो. तेथे पुष्कळ साधक आपापले ध्येय सांगत होते. त्या वेळी मी मनातच दोन ध्येये ठरवली होती. एक म्हणजे ‘मला संत ज्ञानेश्‍वर यांची भेट झाली पाहिजे’ आणि दुसरे म्हणजे ‘मला मोक्षप्राप्ती झाली पाहिजे’ म्हणजेच ‘मला गुरुदेवांच्या चरणी विलीन व्हायचे आहे.’ माझ्या या दोन ध्येयांपैकी संत ज्ञानेश्‍वरांना भेटण्याचे माझे ध्येय सफल झाले होते. त्यामुळे मला पुष्कळ आनंद होऊन माझ्याकडून लगेच श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

५. गुरु परंपरा

संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर ।
संत ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ ।
संत चांगदेवाच्या गुरु मुक्ताई ।
संत वेणाबाईचे गुरु समर्थ रामदासस्वामी ।
संत तुकारामांचे गुरु दादा सावजी ॥

प.पू. अनंतानंद साईश यांचे गुरु श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद ।
प.पू. भक्तराज महाराजांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश ।
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प.पू. संत भक्तराज महाराज ।

अशी ही गुरुपरंपरा आहे. त्याप्रमाणे माझे गुरु परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले हे आहेत. मी श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञ आहे.

६. गुरुदेवांनी सुचवलेले काही विचार

६ अ. नामजपाच्या सेट-टॉप बॉक्समुळे ‘डिश’ आणि दूरदर्शन संच (‘टीव्ही’) यांच्याप्रमाणे दृढ झालेले गुरु-शिष्य नाते : ‘डिश’ आणि दूरदर्शन संच (‘टीव्ही’) यांचे नाते ‘गुरु-शिष्य’ नात्याप्रमाणे आहेत. दूरदर्शनसंचाला ‘सेट-टॉप बॉक्स’ लावला की, ‘डिश’ ही त्याचे गुरु झाली. दूरदर्शन संचाप्रमाणे शिष्याला (गुरूंनी दिलेल्या) नामजपाचा ‘सेट-टॉप बॉक्स’ लावला (किंवा लाभला) की, त्याच्या साहाय्याने त्यांच्यातील ‘गुरु-शिष्य’ हे नाते दृढ होतेे.

६ आ. गुरु जे वांच्छितात, ते या जगात शिष्याला लाभो. (गुरु ‘शिष्याची केवळ आध्यात्मिक प्रगती होऊन त्याला मोक्षप्राप्ती व्हावी’, हेच वांच्छितात. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार शिष्याची प्रगती होवो.)

६ इ. अहंमुळे जेवण तिखट लागणे : स्वयंपाक करतांना मनात अहंचा विचार असेल, म्हणजे ‘मी’ हा स्वयंपाक बनवला आहे’, असा विचार असेल, तेव्हा ते जेवण तिखट लागते. जेव्हा स्वयंपाक बनवणार्‍याचा अहं अल्प असतो, तेव्हा त्या जेवणाला गोडी येतेे. ‘आपण’ स्वयंपाक बनवला’, असा विचार असेल, तेव्हा तो गोड होतोे; कारण त्या वेळी तो सर्वांनी मिळून प्रेमाने आणि ईश्‍वराच्या साहाय्याने (नामजप करत) बनवलेला असतो.

६ ई. जेव्हा आपण सर्वांपासून, म्हणजे आपल्या ‘मी’ पासून दूर जातो, तेव्हाच देव भेटतो.

६ उ. ‘देवच सर्व करतो’, असा भाव नेहमी असावा.

७. गुरूंच्या कृपाशीर्वादाने सुचलेला भाव प्रयोग

७ अ. मन, बुद्धी, अहंकार आणि देहातील पेशी यांनी केलेली परात्पर गुरु डॉ. आठवले अन् संत भक्तराज महाराज यांची मानसपूजा

‘परात्पर गुरु डॉक्टर मनमंदिरी येणार असतात. त्या वेळी मनमंदिराची स्वच्छता करणे, त्याला तोरण बांधणे, सजावट करणे इत्यादी सर्व सेवा मन, बुद्धी, अहंकार इतकेच नव्हे, तर देहातील प्रत्येक पेशी करत आहे. सर्वांना ‘गुरुदेव केव्हा येणार ?’, याची उत्सुकता लागली आहे. सर्वजण सिद्धता करण्यात मग्न आहेत. अल्प वेळेतच सर्वांनी भावपूर्ण सिद्धता केली आहे आणि सर्वजण नामजप करत गुरुदेवांचे वाहन येण्याची वाट पाहू लागले.

तेवढ्यात एक वाहन आले. फुलांनी सजवलेले ते वाहन बघून ‘परात्पर गुरु आले आहेत’, याची सर्वांना निश्‍चिती झाली. गुरुदेवांच्या समवेत संत भक्तराज महाराजही आले होते. मन आणि बुद्धी दोघे मिळून त्यांची आरती करू लागले.

त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर आणि संत भक्तराज महाराज या दोघांच्या मस्तकावर कुंकवाचा टिळा लावून त्यांची तुपाच्या निरांंजनाने आरती केली अन् हृदयाने या दोन्ही संतश्रेष्ठांवर पुष्पवृष्टी केली.

परात्पर गुरुदेव आणि संत भक्तराज मनमंदिरात आले. ते दोघे येऊन पहातात, तर काय ? आतमध्ये २ आसने ठेवलेली आहेत. एक शेषशय्येचेे आसन आहे आणि दुसरे सिंहासन आहे. संत भक्तराज महाराज यांनी शिष्य डॉ. आठवले यांना सांगितले, ‘तुम्ही शेषशय्येवर बसा. आम्ही सिंहासनावर बसतो. तुम्ही श्रीमन्नारायणाप्रमाणे पोशाख घाला आणि मी श्रीकृष्णाचा पोशाख घालीन.’ परात्पर गुरूंनी गुर्वाज्ञा म्हणून ही आज्ञा स्वीकारली. दोघेही आपापले पोशाख घालून आपापल्या आसनांवर विराजमान झाले. सर्वांना पुष्कळ आनंद झाला. मन आणि बुद्धी यांनी त्यांची पाद्यपूजा केली. हृदयाने आरती केली. हृदय, मन आणि बुद्धी यांनी हळूवारपणे कृतज्ञताभावाने परात्पर गुरु डॉक्टर आणि संत भक्तराज महाराज यांच्या गळ्यात हार घातले. सर्वांनी फुले, हळद आणि गुलाल उधळला. सर्वांचा आनंद गगनात मावेना.

हे पाहून त्या दोघांनी आशीर्वाद देऊन म्हटले, ‘आम्ही दोघे सदैव इथेच (या देहातील मनमंदिरातच) रहाणार.’

– गुरुसेवक,

कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १२ वर्षे), मिरज (१.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF