नक्षलवादाचा ख्रिस्ती तोंडवळा !

संपादकीय

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी फादर स्टेन स्वामी यांना अटक केली आहे. जसजसे दिवस जात आहेत, तसे कोरेगाव भीमा दंगलीची व्याप्ती आणि त्याच्या कटात सहभागी असलेल्या लोकांचा भीषण तोंडवळा समोर येत आहे. या प्रकरणात एका ख्रिस्ती पाद्य्राला अटक होणे, यातून नक्षलवादाची पाळेमुळे किती खोल रूतली आहेत, हे दिसून येते. कोरेगाव भीमा दंगलीच्या मागे नक्षलवादी होते, हे आता उघड सत्य आहे. त्यातही एका पाद्य्राला अटक होणे, याचा अर्थ भारतात नक्षलवाद फोफावण्यात ख्रिस्त्यांच्या संघटना, संस्था आणि त्याही पुढे जाऊन त्यांचे धर्मगुरुही कार्यरत आहेत, असे म्हटल्यास चूक ठरू नये. या प्रकरणात अटक झालेले स्टेन हे काही पहिले ख्रिस्ती नव्हेत. या आधीही अटक झालेले वर्तन गोन्साल्विस आणि अरुण परेरा हे ख्रिस्ती आहेत. तसेच दोषारोपपत्रामध्ये विल्सन, जेकब यांची नावेही अंतर्भूत आहेत. ‘जगाला शांती शिकवणारा धर्म म्हणजे ख्रिस्ती धर्म आणि शांतीचे पुजारी म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरु’, असे चित्र भारतियांसमोर वारंवार उभे केले जाते. आज प्रेम आणि शांती यांची शिकवण देणार्‍यांवर दंगली भडकवण्याचे आरोप होत आहेत. ख्रिस्त्यांचा हा जहाल, देशविघातक, क्रूर तोंडवळा अनेकदा समोर आला आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करण्यातच पोलीस, प्रशासन, राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांनी धन्यता मानली. काही वर्षांपूर्वी ओडिशात हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात कार्यरत असलेले स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची माओवाद्यांनी हत्या केली होती. सखोल चौकशी केल्यावर स्वामी लक्ष्मणानंद ख्रिस्त्यांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखतात, या रागातून नक्षलवाद्यांना हाताशी धरून ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले. त्याच वेळी चर्च आणि नक्षलवाद यांच्या संबंधांवर प्रकाश टाकून त्यांची पाळेमुळे खणून काढली असती, तर एव्हाना नक्षलवाद बर्‍याच अंशी अल्प झाला असता; मात्र तसे झाले नाही. कोणतेही आरोप सिद्ध झाले नसतांना हिंदूंना ‘आतंकवादी’ हा बिल्ला चिकटवण्यास पुढाकार घेणारे पुरोगामी, बुद्धीजीवी आणि निधर्मी हे नक्षलवादी कारवायांमध्ये ख्रिस्त्यांच्या सहभागावरून ‘ख्रिस्ती नक्षलवाद’ असे म्हणण्यास का कचरतात ? नक्षलवादी कृत्यांमध्ये ख्रिस्त्यांचा वाढता सहभाग लक्षात घेता चर्च, त्यांच्या संस्था आदी ठिकाणी कोणत्या कारवाया चालतात, याकडे बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ‘प्रेम आणि शांती’ यांसाठी कार्य करणार्‍यांना शस्त्र हाती घ्यावेसे का वाटले ?’, ‘ही शिकवण त्यांना कुठल्या पुस्तकातून दिली जाते ?’, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. फादर स्टेन हे झारखंडमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक कार्य करतांना त्यांनी कोणाकोणाची माथी भडकवली आहेत, ते नेमके काय कार्य करत होते ?, हेही समोर यायला हवे. भारताला जिहादी आतंकवादाचा जसा धोका आहे, त्याएवढाच ख्रिस्ती नक्षलवादही धोकादायक आहे. फादर स्टेन यांच्या या अटकेतून हेच स्पष्ट होते !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now