आतंकवाद खणून काढा !

संपादकीय

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचे धागेदोरे भारतापर्यंत पोचले आहेत. मुळात ‘श्रीलंकेत बॉम्बस्फोट होऊ शकतात’, अशी माहिती भारतीय गुप्तचरांनीच श्रीलंकेला आधीच दिली होती; मात्र तेथील राजकीय सुंदोपसुंदीमुळे त्याकडे दुर्लक्ष झाले आणि जिहादी आतंकवाद्यांना बॉम्बस्फोट घडवता आले. त्यानंतर श्रीलंकेला जाग आली आणि तेथील सरकारने आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी त्याची पाळेमुळे खणून काढण्यास चालू केली. त्याच वेळी तेथील राष्ट्रप्रेमी जनतेने धर्मांधांवर आक्रमणे चालू केली. तसेच सरकारने जनतेचा रोष लक्षात घेता बुरख्यावर बंदी घातली. असा प्रयत्न भारतात गेल्या ३ दशकांत झाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. तरीही गेल्या ५ वर्षांत देशात काश्मीर वगळता आतंकवाद्यांना कुठेही बॉम्बस्फोट करता आला नाही, हेही तितकेच सत्य आहे; मात्र ‘हा जिहादी आतंकवाद नष्ट झाला आहे’, असे म्हणता येणार नाही. केवळ आतंकवाद्यांवर वचक बसला आहे. ते संपलेले नाहीत. छुप्या पद्धतीने त्यांच्या कारवाया चालू आहेत. ते संधी साधून कधीही घातपात करू शकतात, अशी स्थिती आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून तमिळनाडूत घातलेल्या धाडींवरून ही माहिती समोर आली आहे. येथे इस्लामिक स्टेटचा गट कार्यरत असून त्यांचे श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांतील सूत्रधाराशी संबंध होते. ज्याप्रमाणे श्रीलंकेने आतंकवाद मुळासहित खणून काढण्यास चालू केले आहे, तसे आता भारतात होणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना मिळणार्‍या जिहादी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती तिच्यावर होणार्‍या विचारांच्या संस्कारांनुसार कार्य, कृती किंवा आचरण करत असते. जिहादी आतंकवाद्यांना ‘धर्मासाठी आतंकवाद करायचा आहे’, ‘जिहाद करायचा आहे’, याचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे ते आतंकवादाकडे वळतात. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार असणारा झहरान हा श्रीलंकेतील श्रीमंत मसाले व्यापार्‍याचा मुलगा होता. गर्भश्रीमंत असतांनाही तो इमाम बनला आणि नंतर तो जिहादी आतंकवादी झाला. त्याचा भाऊही आतंकवादी होता. हे दोघेही या आत्मघाती आक्रमणात ठार झाले. सरकारने आता भारतात अशा जिहादी विचारसरणीचे शिक्षण कुठे मिळते, त्यावर लक्ष ठेवून ते नष्ट केले पाहिजे. चीनने १० लाख मुसलमानांना एका तळावर ठेवले असून त्यांचे ब्रेन वॉश करून जिहादी आणि इस्लामी विचारांपासून त्यांना राष्ट्रवादी विचारांकडे नेले जात आहे. चीनला आतंकवादाचे उगम कळले असल्याने त्याने थेट त्याच्या मुळावरच आघात चालू केला आहे. त्याने अशा विचारांचा प्रसार होणार्‍या काही मशिदीही पाडून टाकल्या आहेत. तेथे इस्लामी पेहरावावर बंदी घातली आहे. चीन आधीच सतर्क झाल्याने तेथे जिहाद्यांना हात-पाय पसरता आलेले नाही. भारतात सध्या करता येणे शक्य नसले, तरी विचार प्रसारित होणार नाहीत, असे प्रयत्न केले पाहिजेत ! जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्या संदर्भातील विचार नष्ट करणे, ही पहिली पायरी आहे !


Multi Language |Offline reading | PDF