५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील चि. राधा शशिकांत पवार (वय ४ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. राधा शशिकांत पवार ही एक आहे !

चि. राधा पवार

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ज्येष्ठ शुक्ल पक्ष एकादशी, १३.६.२०१९ या दिवशी चि. राधा शशिकांत पवार हिचा तिथीने ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई आणि आजी (आईची आई) यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

चि. राधा पवार हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. सौ. सारिका शशिकांत पवार (राधाची आई), सातारा

१ अ. गर्भारपण – ‘आधुनिक वैद्यांनी बाळ मतीमंद होऊ शकेल’, अशी शक्यता वर्तवून ‘गर्भाची वाढ पुढे होऊ द्यायची का ?’, हे ठरवण्यास सांगणे, तेव्हा बाळाची वाढ होऊ देण्याचा निर्णय घेऊन सतत प्रार्थना, नामजप आणि परात्पर गुरुदेवांचा धावा करणे : ‘मला ३ मास पूर्ण झाल्यावर आधुनिक वैद्यांनी मला काही चाचण्या आणि ‘सोनोग्राफी’ करायला सांगितली होती. सोनोग्राफीत पोटातील गर्भाचे डोके मोठे दिसत होते. सोनोग्राफीच्या अहवालावरून आधुनिक वैद्यांनी बाळ मतीमंद होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगून घरातल्यांना विचारून ‘पुढे गर्भ वाढू द्यायचा का ?’ याचा निर्णय घ्या’, असे सांगितले. त्या वेळी माझी सतत प्रार्थना, नामजप आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा होत होता. मला मनातून ‘गर्भाची वाढ पुढे होऊ द्यावी’, असे वाटत होते. त्याप्रमाणे बाळाची वाढ पूर्ण झाली आणि त्यानंतर माझी प्रसूती झाली.

१ आ. प्रसूती : प्रार्थना, नामजप अन् परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा यांमुळे माझी सुलभ प्रसूती होऊन बाळ सुस्थितीत जन्माला आले.

१ इ. जन्म ते १ वर्ष

१. काही वेळेला बाळ (राधा) हाताची मूठ घट्ट बंद करून हात उंच करायची. त्या वेळी ‘ती जयघोष करत आहे’, असे वाटायचे.

२. राधा इतर वर्तमानपत्र हातात धरत नसे; पण ‘सनातन प्रभात’ मात्र हातात घेत असे आणि हातातून सोडत नसे.

३. ‘आपले परात्पर गुरु डॉक्टर कुठे आहेत ?’ असे विचारले की, राधा त्यांंच्या छायाचित्राकडे बघून त्यांना नमस्कार करत असे.

१ ई. वय १ ते ४ वर्षे

१ ई १. व्यवस्थितपणा 

अ. सकाळी उठल्यावर राधा पांघरूणाची घडी घालण्याचा प्रयत्न करते आणि ते उचलता येत नसतांनाही उचलून जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करते.

आ. लादीवर जरासाही कचरा किंवा धूळ दिसली की, ती लगेच झाडून काढते आणि केर सुपलीत भरून टाकते.

१ ई २. घरकामांत साहाय्य करणे : ती मला घरकामांत तत्परतेने साहाय्य करते. ती मला घर आवरायला, भांडी घासायला, तसेच भाजी निवडायला साहाय्य करते.

१ ई ३. असात्त्विक गोष्टी न आवडणे : तिला दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहायला आवडत नाहीत. घरातील कोणी दूरचित्रवाणी संच चालू केला, तर ती तो बंद करायला लावते.

१ उ. राधाचा स्वभावदोष : हट्टीपणा

‘हे श्रीकृष्णा, या जिवाला सांभाळायची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’ (१९.५.२०१९)

२. सौ. कमल कदम (राधाची आजी), सातारा

२ अ. उपाय करण्याची आवड : ‘मी आजारी असतांना मुलीकडे १५ दिवस रहायला गेले होते. तेव्हा राधा नियमित माझ्याजवळ उपाय करायला बसायची. राधा माझ्यासमवेत अत्तर-कापूर यांचे उपाय करत असे. ती ‘सनातन प्रभात’ने आवरण काढण्याचा प्रयत्न करतेे. मी तिला एकदाच मोरपिसाने आवरण काढायला शिकवले. तेव्हापासून ती मोरपिसाने आवरण काढायला लागली आहे.

२ आ. तिचा आवाज मंजुळ आहे.

२ इ. राधाच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे.

ती मागच्या जन्मी साधिका असावी आणि ‘ती तिची राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर आली आहे’, असे मला वाटते.’

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF