५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जळगाव येथील कु. मोक्षदा पाटील (वय ६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. मोक्षदा पाटील ही एक आहे !

कु. मोक्षदा पाटील

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

‘ज्येष्ठ शुक्ल पक्ष सप्तमी (९.६.२०१९) या दिवशी जळगाव येथील कु. मोक्षदा पाटील हिचा तिथीनुसार सहावा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 

कु. मोक्षदा  हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्म ते १ वर्ष

१ अ. बाळाच्या जन्माच्या वेळी आईला श्रीकृष्णाचे दर्शन होणे आणि पुढे घरातील वातावरण आनंदी होणे : ‘रुग्णालयात प्रसुतीच्या वेळी मी तेथील घड्याळाकडे पाहिले. तेव्हा मला त्या घड्याळाच्या ठिकाणी श्रीकृष्ण दिसला. नंतर मला श्रीकृष्ण चहूबाजूंनी सगळीकडे गोल-गोल फिरत असल्याचे दिसतांनाच बाळाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मानंतर आमच्या घरातील वातावरण आनंदी झाले.

१ आ. मुलाच्या (मोक्षदाच्या वडिलांच्या) आठवणीने रडणार्‍या आजीचा तोंडवळा मोक्षदाने चिमुकल्या हाताने श्रीकृष्णाच्या चित्राकडे वळवून तिला एक प्रकारे आध्यात्मिक स्तरावर आधार देणे : मोक्षदा केवळ ६ मासांची असतांना एकदा मोक्षदाचे बाबा बाहेरगावी गेले होते. त्यामुळे तिच्या आजीला वाईट वाटून ती मुलाच्या (मोक्षदाच्या वडिलांच्या) आठवणीने मोक्षदाकडे पहात रडत होती. तेव्हा मोक्षदाने तिच्या आजीचा तोंडवळा हाताने श्रीकृष्णाच्या चित्राकडे वळवला. त्या वेळी जणू काही मोक्षदा ‘रडू नको, कृष्णबाप्पा आहे !’, असे सांगत असल्याचे तिच्या आजीला जाणवले.

२. वय ५ वर्षे

२ अ. बालपणापासून आश्रमजीवनाची ओढ असणे आणि पुढे काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात रहायला मिळाल्यानंतर तिने स्वतःहून संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे : मोक्षदा ५ वर्षांची असल्यापासून मी तिला जळगाव येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी जातांना घेऊन जात असे. नंतर ती प्रत्येक रविवारी जळगाव सेवाकेंद्रात नेण्यासाठी मला आग्रह करत असे. काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात आल्यावर ती मला म्हणाली, ‘‘जळगावला असतांना मी तुला ‘सेवाकेंद्रात चल’, असे म्हणायचे आणि आता तर एका संतांनी आपल्याला या मोठ्या आश्रमात रहायला सांगितले.’’ त्यानंतर तिने स्वतःहून संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

३. वय ६ वर्षे

३ अ. समाधानी : ती नेहमी समाधानी असते. ती खाऊ, कपडे, खेळणी इत्यादींसाठी कधीच हट्ट करत नाही.

३ आ. धर्माचरणाची आवड

१. ‘मोक्षदाला पाश्‍चात्त्यांप्रमाणे अर्धवट अंग झाकणारे कपडे घालायला मुळीच आवडत नाहीत. तिला नेहमी सात्त्विक कपडे घालायला आवडतात.

२. तिला कुंकू न लावणार्‍या मुली आवडत नाहीत.

३. तिला बांगड्या सात्त्विक कलाकुसर असलेल्याच आवडतात.

३ इ. साधनेची आवड : मोक्षदाला देवतांचा जयघोष करायला आवडतो. आश्रमातील ध्यानमंदिरात होणार्‍या संध्याकाळच्या आरतीच्या वेळी ती मनापासून सर्व आरत्या म्हणत असे. ती वहीमध्ये नियमित नामजपही लिहिते.

३ ई. चुकांविषयीचे गांभीर्य

१. आम्ही व्यष्टी साधनेच्या आढाव्यात स्वतःच्या चुका सांगत असल्याचे पाहून ती तिच्या चुकासुद्धा आमच्या आढाव्यात सांगू लागली.

२. ती प्रतिदिन मला चुका विचारते आणि चूक कळल्यावर स्वतःचे दोन्ही कान पकडून क्षमा मागते.

३. मी फलकावर माझी चूक लिहितांना ती मला सांगते, ‘‘आई, फलकावर माझीही चूक लिही ना !’’ मी तिला एके दिवशी विचारले, ‘‘फलकावर चुका लिहिल्याने काय होते ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आपल्याकडून झालेल्या चुकांचे पापक्षालन होते आणि मग आपण (साधनेत) पुढे पुढे जातो.’’

३ उ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव

१. एके दिवशी मी तिला विचारले, ‘‘तुला आई आवडते कि बाबा ?’’ ती म्हणाली, ‘‘आई, तू मला फार आवडतेस !’’ मग मी तिला विचारले, ‘‘तुला सर्वाधिक कोण आवडते ?’’ तर ती अगदी आनंदाने हसून म्हणाली, ‘‘मला सगळ्यांमध्ये अधिक परात्पर गुरु डॉक्टरच आवडतात !’’

२. ती प्रतिदिन परात्पर गुरु डॉक्टरांंची आठवण काढते आणि मला म्हणते, ‘‘आई, मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांपाशी जायचे आहे. मला त्यांच्या कुशीत झोपायचे आहे.’’

३. ती प्रतिदिन ‘हे गुरुमाऊली, मला लवकर तुमच्या चरणांपाशी घे’, अशी प्रार्थना करते.

४. ती परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण काढते. त्यांंचे भावभक्तीने भजन म्हणते आणि ‘त्यांच्या चरणपादुका डोक्यावर आहेत’, असा भाव ठेवते.’

५. तिला खाऊ दिल्यावर ती ‘प्रसाद’ म्हणूनच खाते.

३ ऊ. इतर

१. ती शाळेतील सगळ्या शिक्षकांना आवडते.

– सौ. रूपाली पाटील (मोक्षदाची आई), जळगाव (१३.५.२०१९ )

४. स्वभावदोष

‘चिडचिडेपणा करणे आणि कधीतरी राग येणे

५. कृतज्ञता

हे श्रीकृष्णा आणि गुरुमाऊली, तुम्ही आम्हाला इतकी छान कन्या दिलीत. यासाठी आम्ही तुमच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– श्री. प्रवीण आणि सौ. रूपाली पाटील, जळगाव (१३.५.२०१९)

कु. मोक्षदा पाटील हिला आलेली अनुभूती

श्री गुरूंविषयीचे भजन ऐकतांना भावजागृती होऊन हुंदके देत रडणे : ‘३.४.२०१९ या दिवशी दुपारी २ वाजता मोक्षदा तिच्या आईसह आश्रमातील खोलीमध्ये विश्रांतीसाठी गेली होती. तेव्हा तिच्या आईने भ्रमणभाषवर ‘गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद…’ हे भजन लावले आणि तिच्या आईने गुरुस्मरण करत डोळे मिटले. काही वेळाने भजन अर्धे झाले असतांना तिच्या आईला मोक्षदाच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू आला; म्हणून तिच्या आईने डोळे उघडून पाहिले, तर तिला मोक्षदाचे डोळे अश्रूंनी डबडबलेले दिसले. त्या वेळी तिच्या आईचे मोक्षदाशी पुढील संभाषण झाले.

मोक्षदाची आई : काय झाले ?

मोक्षदा (भ्रमणभाषकडे अंगुलीनिर्देश करून) : माझी भावजागृती होत आहे.

त्या वेळी तिच्या आईने तिचे डोळे पुसून तिला झोपवले. नंतर मोक्षदा झोपून उठल्यावर त्या दोघींमध्ये पुढील बोलणे झाले.

मोक्षदाची आई (मोक्षदाला उद्देशून) : भावजागृती म्हणजे काय गं ?

मोक्षदा : परात्पर गुरु डॉक्टरांची मनापासून आठवण येते आणि त्यांच्या कुशीत झोपावेसे वाटते.’

– श्री. प्रवीण पाटील (मोक्षदाचे बाबा), जळगाव

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF