पेन हुक्का आणि वास्तव !

 नोंद

व्यसनांच्या आहारी गेलेली तरुणाई मुंबईकरांसाठी नवीन नाही. यातच आता भर पडली आहे पेन हुक्क्याची ! मुंबई येथील ५ तरुणांपैकी एकाच्या ‘बॅग’मध्ये पेनाच्या आकाराचा हुक्का असतो. पेनाच्या आकाराच्या हुक्क्यामुळे कोणाच्या लक्षात न येता नशा करता येते, यासाठी ही नवीन युक्ती तरुणांनी शोधून काढलेली आहे. ‘पेन हुक्का’ हा ई-सिगारेटचाच प्रकार म्हणून सर्रास खपवला जात आहे. १४ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण आणि तरुणी यांचा यामध्ये समावेश आहे, ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे. मुंबईमध्ये ७३ टक्के तरुणाई ही ई-सिगारेटद्वारे किंवा विविध ‘गॅझेट’द्वारे व्यसनाधीन होत आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी ८० टक्के मुलांनी गंमत म्हणून ई-सिगारेट हातात घेतली आणि नंतर ते व्यसनाच्या आहारी गेले. ५६ टक्के तरुणांना ई-सिगारेट, पेन हुक्का हे सुरक्षित वाटतात. ही सर्व माहिती ‘सलाम मुंबई फाऊंडेशन’च्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. एखादी संस्था ही सर्व माहिती काढते, तर ‘सर्व यंत्रणा हाताशी असतांना सरकार माहिती काढून त्यावर उपाययोजना का काढत नाही’, हा प्रश्‍न कोणाच्याही मनात आल्याविना रहात नाही.

‘पेन हुक्का’ सुरक्षित वाटण्याचे प्रमुख कारण म्हणजे तो कोणाच्याही समोर, अगदी आई-वडिलांच्या समोरही ओढता येतो; कारण यातून धूर येत नाही. तसेच ‘हातात पेन धरलेले आहे’, असे पहाणार्‍यांना वाटते. हे पेन आकर्षक अशा वेगवगेळ्या आकारांत आणि रंगांत सिद्ध केलेले आहेत. ज्या वयात पेन, पेन्सिल, पुस्तक हातात असायला हवे, त्या वयात तरुणाईंच्या हातात गॅझेट्स आहेत. या गॅझेट्सच्या आडून तरुणाई जीवघेण्या व्यसनांच्या आहारी जात आहे, हे चिंताजनक आहे.

देशाच्या खर्‍या विकासासाठी धर्मशिक्षण आवश्यक !

केंद्र सरकारने हुक्का बंदीचा आदेश काढलेला असला, तरी राज्य सरकार हुक्क्यावर कोणतीच कारवाई करतांना दिसत नाही. त्यामुळे ‘ऑनलाइन मार्केट’मध्ये, पान टपरीवर, तसेच उघडपणे चालणार्‍या हुक्क्याच्या दुकानांमध्ये ‘पेन हुक्का’ सहज मिळतो. सरकार आदेश काढते; परंतु त्याच्या कार्यवाहीचे काय ? हा प्रश्‍न अनेकांच्या मनात अनुत्तरीत रहातो. सरकार विकासाच्या मागे लागले आहे आणि राज्यातील तरुणाई हुक्का ओढण्याच्या पद्धतीत ‘विकास’ करण्याच्या मागे आहे. सरकारने आतातरी ‘केवळ भौतिक विकासाच्या मागे लागून देशाचा खरा विकास होणार नाही’, हे समजून घ्यायला हवे. तरुण पिढीवर योग्य वयात योग्य संस्कार होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. धर्मशिक्षणच मनुष्याला योग्य-अयोग्य विचार करायला आणि कृती करायला शिकवते. धर्मशिक्षण दिल्यास सरकारला विकासासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकताच भासणार नाही, हेच अंतिम सत्य आहे !

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF