हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आयोजित अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवसाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी गोवा येथील रामनाथ देवस्थानातील सभागृहामध्ये अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या सहाव्या दिवसाचे, म्हणजे ३.६.२०१९ या दिवसाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे देत आहे.

श्री. निषाद देशमुख

१. साधना सत्र

निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा संत सन्मान सोहळा

१ अ. निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांचा संतसन्मान सोहळा

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका यांनी ‘निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकरकाका संत झाले’, असे घोषित केल्यावर ‘ईश्‍वराची निर्गुण शक्ती पू. चपळगावकरकाका यांच्या अनाहतचक्रावर प्रक्षेपित होऊन त्यांना दिव्यत्व प्रदान करत होती.

२. पू. चपळगावकरकाका यांच्या अनाहतचक्रावर प्रक्षेपित झालेल्या ईश्‍वरी शक्तीमुळे व्यष्टी स्तरावर त्यांचा अप्रगट भाव प्रगट झाला, तर समष्टी स्तरावर त्यांच्याकडून समष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर चैतन्य प्रक्षेपित झाले.

३. संत पातळी घोषित केल्याने पू. चपळगावकरकाका यांच्यातील आप आणि तेज या तत्त्वांमध्ये वाढ झाली.

४. पू. चपळगावकरकाका यांचा सन्मान झाल्यावर त्यांच्यातील चैतन्याचे प्रगटीकरण झाल्यामुळे शीतलता जाणवत होती.

५. पू. चपळगावकरकाका त्यांचे मनोगत व्यक्त करत असतांना त्यांच्या वाणीतील चैतन्य जनलोकातून ५ व्या पाताळापर्यंत प्रक्षेपित होत होते.

६. पू. चपळगावकरकाका यांचे बोलणे ऐकतांना अनाहत आणि आज्ञा या कुंडलिनीचक्रांवर स्पंदने जाणवून ध्यान लागत होते.

७. पू. चपळगावकरकाका यांच्या संदर्भात अन्य साधक सांगत असतांना ते निर्विचार स्थितीत होते.

१ आ. पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा संत सन्मान सोहळा

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका यांनी ‘अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संत झाले’, असे घोषित केल्यावर ईश्‍वराची निर्गुण शक्ती पू. कुलकर्णीकाका यांच्या अनाहत आणि आज्ञा या चक्रांवर प्रक्षेपित होऊ लागली. यामुळे पू. कुलकर्णीकाका यांची भावावस्था प्रगट होऊनही त्यांना तिच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.

२. पू. कुलकर्णीकाका यांना ‘संत’ म्हणून घोषित केल्यावर त्यांच्यातील भक्तीमुळे त्यांच्या स्थूल रूपाला तेज प्राप्त झाले होते, तर त्यांच्यातील कर्मयोगामुळे दिव्य सुगंध येण्याची अनुभूती आली.

३. पू. कुलकर्णीकाका यांचे संतपद घोषित झाल्यावर त्यांच्यात दिव्य तेज प्रगट होऊन त्यातील चैतन्य प्रकाश किरणांच्या स्वरूपात वायूमंडलात पसरत होते.

४. पू. कुलकर्णीकाका यांचा सन्मान केल्यावर उच्च लोकांतील जीव त्यांच्यावर दैवी कणांचा वर्षाव करून आनंद व्यक्त करत होते.

५. पू. कुलकर्णीकाका त्यांचे मनोगत व्यक्त करत असतांना त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या निळसर रंगाच्या भावलहरींमुळे सोहळ्यात उपस्थित सर्वांचा भाव जागृत होत होता.

६. पू. कुलकर्णीकाका त्यांचे मनोगत व्यक्त करतांना चैतन्य मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपित झाल्याने उपस्थित श्रोत्यांची शुद्धी होत होती.

७. पू. कुलकर्णीकाका यांच्या संदर्भात अन्य संत आणि साधक सूत्र सांगत असतांना ते शिष्यावस्थेत होते.

१ इ. निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या आध्यात्मिक मैत्रीसंदर्भात लक्षात आलेली वैशिष्ट्ये

१. पू. सुधाकर चपळगावकर आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्यात आध्यात्मिक मैत्री आहे. यामुळे निवृत्त न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या संदर्भात सांगतांना पू. सुरेश कुलकर्णी भावस्थितीत होते, तर पू. सुरेश कुलकर्णी यांच्या संदर्भात सांगतांना पू. सुधाकर चपळगावकरकाका ध्यानावस्थेतून जीवात्मा स्थितीत आले होते.

२. पू. सुधाकर चपळगावकर यांचा सन्मान झाल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याच्या झोतामुळे पू. सुरेश कुलकर्णी यांचा भाव जागृत झाला, तर पू. सुरेश कुलकर्णी यांचा सन्मान होतांना त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे पू. सुधाकर चपळगावकर ध्यानावस्थेतून जीवात्मा अवस्थेत आले. यांतून आध्यात्मिक मैत्रीमुळे एकमेकांच्या वैशिष्ट्यानुसार होणारे परिणाम अनुभवता आले.

३. पू. चपळगावकरकाका आणि पू. कुलकर्णीकाका दोन्हींमध्ये कर्म आणि भक्ती यांचा संगम आहे. साधनेच्या प्रारंभी पू. चपळगावकरकाका यांच्यात कर्मयोग आणि समष्टी साधनेची प्रवृत्ती, तर पू. कुलकर्णीकाका यांच्यात भक्तीयोग आणि व्यष्टी साधनेची प्रवृत्ती अधिक प्रमाणात होती. असे असतांनाही आध्यात्मिक मैत्री करत त्यांनी एकमेकांचे गुण आणि वैशिष्ट्ये आत्मसात केल्याने त्यांच्यात कर्म आणि भक्ती यांचा संगम झाला आहे, तसेच त्यांची व्यष्टी अन् समष्टी साधना यांचेही समतोलत्व झाले आहे. या माध्यमातून विभिन्न प्रकृती असूनही आध्यात्मिक स्तरावरील मैत्रीतून प्रगती करण्याचे उदाहरण त्यांच्या माध्यमातून ईश्‍वराने समष्टीसमोर ठेवले आहे.

४. सर्वसाधारण मित्रतेत मन जुळत असल्याने दोन मित्रांमधील एकसारख्या स्पंदनांचे प्रमाण २० टक्के असते. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवरील नात्यांमुळे माता अन् बाळ, तसेच पती आणि पत्नी यांच्यातील अधिकाधिक एकसारख्या स्पंदनांचे प्रमाण सर्वसाधारण ३० टक्के असते. याउलट पू. चपळगावकरकाका आणि पू. कुलकर्णीकाका यांच्यात असलेल्या आध्यात्मिक मैत्रीमुळे त्यांच्यातील स्पंदनांचे साम्य ५० टक्के आहे. यांतून त्यांच्यातील आध्यात्मिक नात्याची वैशिष्ट्ये लक्षात येतात. त्यांच्यात एकमेकांशी एकरूपता अधिक प्रमाणात असल्याने त्या दोघांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी आणि संतपद एकत्रित गाठण्याचा दिव्य संयोग घडवला आहे.

५. पू. चपळगावकरकाका आणि पू. कुलकर्णीकाका यांच्यातील आध्यात्मिक मैत्रीमुळे त्यांना एकमेकांच्या मनातील ओळखता येते. यामुळे त्यांच्या नात्याला शब्दांचे बंधन नसून ते शब्दांच्या पलीकडील आहे.

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.६.२०१९, रात्री ६.४३)


Multi Language |Offline reading | PDF