राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश

सरकारी इनामी भूमी लाटल्याचे प्रकरण

भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेने बंदीची मागणी केल्यास चूक ते काय ?

संभाजीनगर – कागदपत्रांवरून शासनाच्या इनामी भूमीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती ता.वि. नलावडे आणि न्यायमूर्ती के.के. सोनवणे यांनी १० जूनला दिला. या प्रकरणी अन्वेषण करणार्‍या पोलीस अंमलदारांवरही खंडपिठाने ताशेरे ओढले आहेत. राजाभाऊ फड यांनी या प्रकरणी याचिका प्रविष्ट केली होती.

१. सरकारी भूमी बेलखंडी मठाला इनाम दिली होती. तीच भूमी धनंजय मुंडे यांनी पदाचा अपवापर करून त्यांच्या जगमित्र साखर कारखान्यासाठी विकत घेतली.

२. ‘खरेतर कोणत्याही इनामी भूमीचा खरेदी व्यवहार होत नाही; मात्र या प्रकरणी दबाव आणून खरेदी व्यवहार केला असून कृषी भूमी असतांनाही ती अकृषिक करून घेतली आहे’, असे याचिकेत म्हटले आहे.

३. याप्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली होती; मात्र पोलीस अंमलदारांनी याप्रकरणी कोणतीही पावले उचलली नाहीत. (अशा निष्क्रीय पोलीस कर्मचार्‍यांवरही न्यायालयाने कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे, म्हणजे पुढे अशी कृती अन्य कोणी करणार नाही ! – संपादक) त्यामुळे फड यांनी येथील खंडपिठात याचिका प्रविष्ट केली.

निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार !

‘वर्ष १९९१ मध्ये सरकारी दप्तरात या भूमीची नोंद इनामी भूमी म्हणून नव्हती. या वादाची आम्हाला माहिती नव्हती. विक्री करण्याचा मालकी हक्क श्री. देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून भूमी खरेदी करण्यात आली. केवळ राजकीय द्वेषातून हा आरोप करण्यात आला असून संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे’, असे धनंजय मुंडे यांचे अधिवक्ता सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी सांगितले.

सूडबुद्धीने न्यायालयाची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध खोटे आदेश प्राप्त केले ! – धनंजय मुंडे

अंबाजोगाई येथील ‘जगमित्र शुगर फॅक्टरी’साठी कोणतेही संस्थान अथवा शासन यांची भूमी कोणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतली नाही; मात्र शेतकरी आणि अधिकोष यांना ५ सहस्र ४०० कोटी रुपयांना बुडवणारे रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई राजाभाऊ फड यांच्याकडून सूडबुद्धीने न्यायालयाची दिशाभूल करून माझ्याविरुद्ध खोटे आदेश प्राप्त करून घेतला आहे.

काय आहे प्रकरण ?

धनंजय मुंडे यांनी वर्ष १९९१ मध्ये जगमित्र साखर कारखान्यासाठी २४ एकर भूमी खरेदी केली होती; मात्र या व्यवहाराच्या विरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड यांनी तक्रार केली. ही भूमी अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे. या प्रकरणातील गिरी, देशमुख आणि चव्हाण यांच्यात भूमीवरून वाद होता. भूमीच्या विक्रीचे अधिकार देशमुख आणि चव्हाण यांना मिळाले होते. त्यांच्याकडून मुंडे यांनी ही भूमी खरेदी केली. पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद घेतली जात नाही; म्हणून फड यांनी येथील खंडपिठात फौजदारी याचिका प्रविष्ट केली. ‘ही सरकारी भूमी आहे. त्यामुळे ती ट्रस्ट किंवा खासगी व्यक्ती यांना विकत घेता येत नाही’, असा आक्षेप फड यांनी घेतला होता. त्यामुळे मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी विनंती याचिकेत केली होती. ती खंडपिठाने मान्य केली.


Multi Language |Offline reading | PDF