अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची अटक ही अधिवक्तावर्गाची गळचेपी !

  • पत्रकार परिषदेत ‘समस्त अधिवक्ता, महाराष्ट्र’च्या वतीने अधिवक्त्यांकडून निषेध

  • केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात अधिवक्त्यांची एकजूट !

डावीकडून अधिवक्त्या (कु.) अक्षदा गंगाधरे, अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अधिवक्ता खुश खंडेलवाल, अधिवक्ता एस् बालकृष्णन्, पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, बोलतांना अधिवक्ता भारद्वाज चौधरी, अधिवक्ता विवेक भावे, अधिवक्ता प्रभाकर भोगले, अधिवक्ता संतोष महामुनी आणि अन्य अधिवक्ते

मुंबई – डॉ. दाभोलकर आणि अन्य पुरोगामी यांच्या हत्यांच्या अन्वेषणामध्ये अन्वेषण यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्या आहेत. या प्रकरणी न्यायालयाने वेळोवेळी अन्वेषण यंत्रणांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे स्वत:चे अपयश झाकण्यासाठी अन्वेषण यंत्रणा सातत्याने कुणाला ना कुणाला लक्ष्य करत आहेत. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केलेल्या अन्यायकारक अटकेविषयी महाराष्ट्र, तसेच अन्य राज्यांतील अधिवक्त्यांमध्ये असंतोष आहे. ही समस्त अधिवक्तावर्गाची गळचेपी आहे, असे प्रतिपादन ‘समस्त अधिवक्ता, महाराष्ट्र’ या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अधिवक्ता एस्. बालकृष्णन् यांनी केले. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अन्यायकारक अटकेच्या विरोधात ११ जून या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

अधिवक्ता बालकृष्णन् पुढे म्हणाले, ‘‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची अटक ही साधी अटक नसून अन्वेषण यंत्रणांनी हा एक प्रकारे केलेला लोकशाहीचा खून आहे. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सीबीआयचे अन्वेषण अधिकारी नायर यांच्या विरोधात ७० पानी तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती. तेव्हापासून पुनाळेकर हे नायर यांच्या ‘हिटलिस्ट’वर होते. अधिवक्ता आणि पक्षकार यांच्यातील संभाषणाचा गैरवापर कोणी करू शकत नाही. हे आमच्या अधिकारांचे हनन केल्यासारखे असून त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा चालू ठेवणार आहोत.

या पत्रकार परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता भारद्वाज चौधरी, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता विवेक भावे, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संतोष महामुनी, अधिवक्ता प्रभाकर भोगले, अधिवक्ता खुश खंडेलवाल, अधिवक्ता हिंदुराव साळुंखे, अधिवक्ता अरुण डोंगरे, अधिवक्ता प्रकाश संकपाळ, अधिवक्ता प्रशांत वगरे, अधिवक्ता वसंत बनसोडे, अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अधिवक्त्या (सौ.) अमृता जुनघरे, अधिवक्त्या (सौ.) प्रीती पाटील आणि अधिवक्त्या (कु.) अक्षदा गंगाधरे या उपस्थित होत्या.

आरोपीने गुन्ह्याची स्वीकृती मागे घेतलेली असतांनाही त्यावरून अटक कशी होऊ शकते ? – अधिवक्ता भारद्वाज चौधरी

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना करण्यात आलेल्या अटकेमध्ये गौडबंगाल दिसून येते. मूळात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीनंतर बर्‍याच कालावधीनंतर आरोपी शरद कळसकर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये कर्नाटक पोलिसांना दिलेल्या गुन्ह्याच्या स्वीकृतीवरून अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करण्यात आली आहे. ही गुन्ह्याची स्वीकृती शरद कळसकर यांनी यापूर्वीच मागे घेतली आहे. असे  असतांना त्यावरून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक कशी होऊ शकते ? हे अधिवक्त्यांच्या न्यायिक अधिकाराचा गळा घोटणारे आहे. ‘भगवा आतंकवाद’ हा शब्दप्रयोग रूढ करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील पोलिसांनी आरोपीकडून घेतलेल्या गुन्ह्याच्या स्वीकृतीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक केली आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे. सीबीआय अशा प्रकारे अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करते म्हणजेे हा देशातील सर्व अधिवक्त्यांसाठी सतर्कतेची चेतावणी (अलर्ट) आहे. त्यांची छळवणूक करण्यासाठीच ही अटक असून ते पूर्णपणे निर्दोष सुटतील, असा आमचा दावा आहे; परंतु त्यांची जी मानहानी झाली ती सरकार भरून देणार आहे का, असा प्रश्‍न अधिवक्ता भारद्वाज चौधरी यांनी या वेळी उपस्थित केला.

जी शस्त्रे सापडलीच नाहीत, ती नष्ट करण्याचा सल्ला देण्याच्या आरोपावरून अटक होणे, हे हास्यास्पद ! – अधिवक्ता विवेक भावे

आरोपीने दिलेल्या गुन्ह्याच्या कथित स्वीकृतीनंतर ८ मासांनी सीबीआयने अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे, हे तपासाविषयी संशय निर्माण करणारे आहे. अटकेला १५ दिवस होऊनही सीबीआयला अधिवक्ता पुनाळेकर यांच्याविषयी न्यायालयात कोणतेही सबळ पुरावे सादर करता आलेले नाहीत. ज्याठिकाणी शस्त्रे नष्ट केल्याचे पोलीस म्हणत आहेत, त्या खाडीमध्ये शस्त्रे शोधण्याचा प्रयत्नही अन्वेषण यंत्रणांनी केलेला नाही. म्हणजे ‘जी शस्त्रे गुन्ह्यात वापरली गेली आहेत, हे सिद्धच झालेले नाही, ती नष्ट करण्यासाठी अधिवक्ता पुनाळेकर यांनी साहाय्य केले’, असा आरोप करणेच हास्यास्पद आहे, असे अधिवक्ता विवेक भावे म्हणाले.

हे अधिवक्त्यांच्या न्यायिक अधिकाराचे हे हनन ! – अधिवक्ता संतोष महामुनी, मुंबई उच्च न्यायालय

आरोपी आणि अधिवक्ता यांच्यातील चर्चा ही संवेदनशील समजली जाते. ती गुप्त स्वरूपाची असते. ती नोंदवून ठेवली जात नाही किंवा चारचौघांत बसून त्यावर चर्चा होत नाही. असे असतांना आरोपी आणि अधिवक्ता यांच्यामधील चर्चेच्या एका सूत्रावरून अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करण्यात आली आहे. उद्या असे होऊ शकते की, एखादा आरोपी हा अधिवक्त्याला ‘खोटे गुन्ह्याची स्वीकृती (कन्फेशन) देऊ’, अशी धमकीही देऊ शकतो. न्यायप्रणालीने अधिवक्त्यांना ‘ऑफिसर ऑफ द कोर्ट’नुसार दिलेल्या या न्यायिक अधिकाराचे हे हनन आहे.

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या अटकेचा देशभरातून निषेध होत आहे ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संभाजीनगर खंडपीठ तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक-सदस्य

या अटकेचा मी निषेध व्यक्त करतो. त्यांनी डी.जी. वंजारा (माजी पोलीस अधिकारी) यांना झालेली अटक, मालेगाव बॉम्बस्फोट, धनंजय देसाई (हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख) यांची अटक आदी महत्त्वाचे खटले अधिवक्ता पुनाळेकर यांनी लढले आहेत. देवस्थानांतील घोटाळे, गरिबांना खासगी रुग्णालयांत १० खाटा उपचारासह विनामूल्य मिळाव्यात आदींविषयी जनहित याचिका केल्या होत्या. त्यामुळे त्यांना षड्यंत्रपूर्वक अटक करण्यात आली आहे. देशभरातील अधिवक्ते याचा निषेध करत आहेत. पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ गोवा, कर्नाटक, पुणे या ठिकाणी अधिवक्त्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्यात आली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलने बैठक घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच संपूर्ण देशभरात अधिवक्त्यांना एकत्रित येऊन बैठका घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

पुनाळेकर यांच्या अटकेमुळे नवीन पिढीवर आघात होतील ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

‘हिंदु आतंकवाद’ ही संकल्पना खोडून काढण्याचा प्रयत्न प्रथम अधिवक्ता पुनाळेकर यांनी केला. भ्रष्टाचार आणि शासनाने केलेल्या अयोग्य गोष्टींविषयी लढा उभारणारे ते एकमेव अधिवक्ता होते. अशांवरच आरोप ठेवून त्यांना पकडले, तर येणार्‍या नवीन पिढीवर मोठे आघात होतील.

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या जामिनावर १७ जूनला सुनावणी

पुणे – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेले अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या जामिनाची सुनावणी १७ जून या दिवशी होणार आहे, असा निर्णय न्यायालयाने ११ जून या दिवशी दिला.


Multi Language |Offline reading | PDF