छत्तीसगड येथे एकलव्याप्रमाणे साधना करणारे हेमंत कानस्कर (वय ५२ वर्षे) आणि साधनेतील अडथळ्यांवर चिकाटीने प्रयत्न करून मात करणार्‍या देहली येथील कु. कृतिका खत्री (वय २९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात चालू असलेल्या ‘राष्ट्रीय हिंदु राष्ट्र आणि साधना’ शिबिरात मिळाली आनंदवार्ता !

श्री. हेमंत कानस्कर

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा), ११ जून (वार्ता.) – छत्तीसगड येथे राहून एकलव्याप्रमाणे साधना करणारे श्री. हेमंत कानस्कर (वय ५२ वर्षे) आणि साधनेतील अडथळ्यांवर चिकाटीने प्रयत्न करून मात करणार्‍या देहली येथील साधिका कु. कृतिका खत्री (वय २९ वर्षे) हे दोघे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय हिंदु राष्ट्र आणि साधना’ शिबिराच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच ११ जून या दिवशी व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयीच्या एका सत्रात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंददायी घोषणा केली. ही आनंदवार्ता ऐकून श्री. हेमंत कानस्कर आणि कु. कृतिका खत्री यांच्यासह अनेक साधकांची भावजागृती झाली.

कु. कृतिका खत्री

सनातनचे विदर्भ प्रसारसेवक पू. अशोक पात्रीकर यांच्या हस्ते श्री. हेमंत कानस्कर यांचा, तर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते कु. कृतिका खत्री यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. ‘माझी काहीच पात्रता नसतांनाही गुरुदेवांनी पुष्कळ काही शिकवले. त्यांच्याच कृपेमुळे सेवा होत आहे’, असे मनोगत व्यक्त करत श्री. हेमंत कानस्कर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कु. कृतिका खत्री यांनीही त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे सर्व श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी अर्पण केले. ‘कृतज्ञता व्यक्त करायला आज शब्दच शिल्लक नाहीत. सद्गुरु काकांनी (सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी) पुष्कळ आधार दिला. आध्यात्मिक त्रास, तसेच स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यासाठी त्यांनी दिशा दिली आणि साधनेसाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच आज हा क्षण अनुभवता येत आहे’, असे भावोद्गार कु. कृतिका खत्री यांनी काढले. या सोहळ्यात छत्तीसगड येथील सनातनचे संत पू. चत्तरसिंह इंगळे, तसेच श्री. हेमंत कानस्कर यांच्यासह सेवा करणारे साधक, तसेच जयपूर येथून कु. कृतिका खत्री यांचे कुटुंबीय संगणकीय प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

विशेष

या सत्कार सोहळ्याच्या वेळी वार्‍यासह पाऊस पडला. त्या माध्यमातून या सोहळ्याला वायुदेवता आणि वरुणदेवता यांचे आशीर्वाद लाभल्याचे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.

(या सोहळ्याचे सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित करत आहोत.)


Multi Language |Offline reading | PDF