६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील चि. वरुण शेट्टी (वय ५ वर्षे) !

चि. वरुण शेट्टी

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

मिरज येथील चि. वरुण शेट्टी याची आई आणि आजी यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

(‘वर्ष २०१५ मध्ये चि. वरुण शेट्टी याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ – संकलक)

१. गुणवैशिष्ट्ये

१ अ. चांगली स्मरणशक्ती

१. ‘वरुणचे श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि गणपतिस्तोत्र मुखोद्गत आहे. आम्ही म्हणत असलेले ‘बिल्वाष्टक’ तो लक्षपूर्वक ऐकतो. त्याचे हे स्तोत्र नुसते ऐकूनच मुखोद्गत झाले आहे. त्याच्यासह श्‍लोक म्हणतांना माझी भावजागृती होते.

२. त्याला ठिकाणे आणि मार्ग चांगले लक्षात रहातात. एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यावर पुन्हा त्या ठिकाणी जायची वेळ आल्यास तो योग्य मार्ग दाखवतो.

१ आ. लाघवी 

१. एखाद्या वेळी त्याच्याशी रागावून बोलल्यास तो प्रेमाने आपल्याला समजावतो. त्याची वाणी मधुर आहे. ‘त्याचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.

२. वरुणची वाणी मधुर असल्याने आमच्या घरातील काम करणार्‍या मावशीही त्याच्याशी आवर्जून बोलतात. एखादे वेळी तो बोलला नाही, तर त्यांना करमत नाही.

१ इ. आदरभाव 

१. तो घराबाहेर जातांना आम्हा दोघांना (आई-वडिलांना) साष्टांग नमस्कार करतो.

२. तोे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेत गेल्यावर त्याने शिक्षिकेला ‘तुम्ही माझ्या गुरु आहात’, असे म्हणून वाकून नमस्कार केला.

१ ई. ऐकण्याची वृत्ती

१. एकदा वरुणचे दात किडल्यामुळे दुखत होते. तेव्हा त्याला उपचारासाठी दंतवैद्यांकडे नेल्यावर त्यांनी त्याला गोड पदार्थ खाण्याचे बंद करायला सांगून अनेक पथ्ये सांगितली. तो सांगितलेल्या सर्व सूत्रांचे काटेकोरपणे पालन करत होता.’

– सौ. राजलक्ष्मी शेट्टी (आई)

२. ‘आपले आरोग्य चांगले रहाण्यासाठी नियमितपणे चंडीकवच म्हणणे आवश्यक आहे’, असे सांगितल्यापासून तो नियमितपणे हे कवच म्हणतो.

१ उ. सहनशील : ‘तो सहनशील आहे. एकदा त्याच्या दाताला झालेल्या संसर्गामुळे त्याचे हात आणि पाय यांची सर्व नखे गळून गेली. ही नखे परत येतांना त्याला पुष्कळ त्रास झाला; पण त्याने प्रार्थना करून त्रास सहन केला.’

– सौ. राजलक्ष्मी शेट्टी (आई)

१ ऊ. प्रांजळ : ‘तो त्याच्याकडून झालेली चूक लगेच सांगतो.’

– सौ. शोभा शेट्टी (आजी)

१ ए. देवाची ओढ

१. तो प्रत्येक गोष्टीत देव पहातो. तो त्याच्याकडे असलेल्या खेळण्यांना शिवलिंगाचा आकार देऊन त्यांची पूजा करतो. तो देवाची पूजा करतांना त्याला येणारे मंत्र आणि स्तोत्रे म्हणतो.

२. त्याला देवांच्या कथा पुष्कळ आवडतात. श्रीमती एम्.एस्. सुब्बलक्ष्मी यांनी गायलेले ‘शुद्ध ब्रह्म परात्पर राम’ हे ‘नाम रामायण’ ऐकतांना त्याने मला त्याचा अर्थ विचारला. अर्थ विचारतांना त्याचा भाव जागृत झाला होता. त्या वेळी माझीही भावजागृती झाली.

३. त्याला श्री विठ्ठल आणि श्री व्यंकटेश हे देव पुष्कळ आवडतात. तो त्यांच्यासारखे उभे रहाण्याचा आणि मुद्रा करण्याचा प्रयत्न करतो. ते पाहून माझी भावजागृती होते.

४. तो एकटाच खेळतो. तो खेळतांना ‘त्याचे देवाशी अनुसंधान आहे’, असे मला जाणवते.

५. त्याचे धनुष्यबाण हे आवडते खेळणे आहे. तो धनुष्याला बाण अडकवून त्याला ‘अस्त्र’ असे नाव देतो, जसे नारायणास्त्र, पाशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र इत्यादी. त्या वेळी तो पुढील श्‍लोक म्हणून बाण सोडतो.

आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तुते ॥  सूर्याष्टकम्, श्‍लोक १

अर्थ : हे आदीदेव सूर्यनारायणा, मी तुला नमस्कार करतो. हे भास्करा, माझ्यावर प्रसन्न हो ! हे तेजस्वी दिवाकरा, प्रभाकरा तुला माझा नमस्कार असो.

६. त्याच्या शाळेजवळ तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. तो प्रतिदिन शाळेतून घरी जातांना या देवळात जाण्याचा आग्रह करतो. त्याला देवळात जायला पुष्कळ आवडते. या देवळातील पुजार्‍यांनाही तो पुष्कळ आवडतो. त्याला मिरज आश्रमाजवळ असलेल्या अंबाबाईच्या देवळात जायला पुष्कळ आवडते. आम्ही आश्रमात गेल्यावर या देवळात गेल्याविना तो घरी येत नाही.

७. तो कुठेही गेला तरी ‘तेथे देऊळ आहे का ?’, ते पहातो. देऊळ दिसल्यास तो कुणाचे देऊळ आहे, हेही काही वेळा सांगतो. आम्ही एखाद्या दुकानात किंवा कुणाच्या घरी गेलो असता ‘तेथे देवाचे चित्र आहे का ?’, हे तो उत्सुकतेने पहातो. त्याला देवाचे चित्र दिसल्यावर तो ते आम्हाला दाखवतो.

८. काही वेळा तो स्वतःला श्रीराम मानून ‘रावणाचा वध करायला जातो’, असे सांगून युद्धाला जातो.

९. एकदा वरुणला घेऊन मी कपड्याच्या दुकानात गेले होते. तेथे त्याला बालाजीचे चित्र दिसले. या वेळी तो माझ्या कडेवर होता. त्याने खाली उतरून त्या चित्राला साष्टांग नमस्कार केला. ‘या वेळी तो दुकानात आहे’, याचेही त्याला भान नव्हते.

१ ऐ. भाव

१ ऐ १. देवळात जाऊन आल्यानंतर त्याच दिवशी देवळात पुन्हा जाणे

१ ऐ १ अ. देवळात जाऊन आल्यानंतर झोपणे, अर्ध्या घंट्याने उठून ‘देवळात जायचे आहे’, असे सांगून रडणे आणि ‘दुपारी ४ वाजता देऊळ उघडते’, याची आठवण करून देऊन देवळात जाणे : तो प्रतिदिन बालाजीच्या देवळात चालत जातो. १६.१२.२०१६ या दिवशीही तो देवळात गेला होता. तो घरी आल्यानंतर लगेच झोपला आणि अर्ध्या घंट्याने उठला. त्याला बालाजीची आठवण येऊन रडू येत होते. मी त्याला सूक्ष्मातून देवळात घेऊन जायचा प्रयत्न केला; परंतु त्याला रडू आवरत नव्हते. त्यानेच मला ‘दुपारी ४ वाजता देऊळ उघडते’, याची आठवण करून दिली. त्याच्या आग्रहामुळे मी त्याला परत देवळात घेऊन गेले.

१ ऐ १ आ. बालाजीच्या देवळात गेल्यावर वरुणला आवडणारा साखरभात प्रसाद म्हणून मिळणे : तेथे देवासमोर बसून त्याने भजने म्हटली. आम्हाला प्रसाद म्हणून साखरभात दिला. वरुणला साखरभात पुष्कळ आवडतो. खरेतर देवळात एकच प्रसाद दोन्ही वेळा करतात; मात्र त्या दिवशी सकाळी आणि दुपारी वेगळा प्रसाद होता.

हे सर्व वरुणच्या भावामुळे झाले. ते पाहून माझी भावजागृती झाली. ‘उत्कट भाव आणि तळमळ कशी असायला हवी ?’, हे मला शिकायला मिळाले.

१ ऐ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पहात असतांना त्यांना श्रीकृष्णाच्या रूपात पाहून आनंद होणे आणि भजन म्हणणे : १८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण पहात असतांना त्यांना श्रीकृष्णाच्या रूपात हातात चक्र धारण करून सिंहासनावर बसलेले पाहिल्यावर वरुणला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी तो ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर आलेले संत गोंदवलेकर महाराज यांचे

दीना हाका मारी द्वारी तुझ्या हरि । कधी जाईल हाक तुझ्या कानावरी ।
नको अंत पाहू जीव घाबरला । किती विनवू तुला देवा दयाघना ।
किती आळवू तुला ।

तो हे भजन म्हणून हसत होता. त्याला हे भजन म्हणतांना पाहून माझीही भावजागृती झाली.

२. स्वभावदोष

अ. तो काही प्रसंगात केवळ माझेच ऐकतो. त्याला इतरांनी सांगितलेले पटत नाही.

आ. त्याला अनावर राग येतो. अशा वेळी तो हातातील वस्तू फेकून मारतो. तो मोठ्या भावाशी भांडतो.

इ. तो स्वतःच्या वस्तू कोणाला देत नाही. मी अन्य कोणाशी बोललेले त्याला आवडत नाही.

३. वरुणचे स्वभावदोष नाहीसे होण्यासाठी करत असलेले प्रयत्न

तो हट्ट करायला लागल्यावर मी त्याला खोलीच्या कोपर्‍यात उभे रहायला सांगते. मी त्याला श्रीकृष्णाच्या चित्रासमोर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर उभे राहून चूक सांगून क्षमायाचना करायला सांगतेे. त्याचा ही कृती करतांना पुष्कळ संघर्ष होतो.’

– सौ. राजलक्ष्मी शेट्टी, मिरज (डिसेंबर २०१८)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या  goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF