बंगाल आणि राष्ट्रपती राजवट !

संपादकीय

बंगाल अराजकाच्या वाटेवर आहे. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्यावर उपाय म्हणून अप्रत्यक्ष का होईना राष्ट्रपती राजवटीचे संकेत दिले आहेत. त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थयथयाट चालू केला असून ‘हे भाजपचे षड्यंत्र आहे’, अशी टीका केली आहे. ‘या टीकेमध्ये तथ्य नाही’, हे सर्वसामान्य बंगाली हिंदूंसह पूर्ण देश जाणून आहे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या हत्या होणे, दहशत निर्माण करण्यासाठी हिंदूंचे मृतदेह झाडाला लटकवले जाणे, क्षुल्लक कारणांवरून हिंसाचार होणे, हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे होणे, फटाके फुटल्याप्रमाणे बॉम्बस्फोट होणे, ‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकून संताप अनावर झालेल्या मुख्यमंत्र्यांनी रामभक्तांना धमकी देणे आदी घटना राज्याचा गाडा सुरळीत चालू नसल्याचे द्योतक आहेत. ‘बंगालचा लचका तोडला जाऊ नये’, असे वाटत असेल, तर तात्कालिक उपाय म्हणून का होईना, बंगालमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करून तेथील हिंदुविरोधी आणि भारतविरोधी शक्तींवर नियंत्रण मिळवायला हवे.

धुमसते बंगाल !

स्वातंत्र्यपूर्व काळात नौखाली प्रांत मुस्लिम लीगच्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’मध्ये भरडला गेला होता. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार आणि अत्याचार झाले, हिंदूंची सामूहिक हत्याकांडे झाली. ‘स्वातंत्र्योत्तर काळात बंगाली हिंदूंच्या वाट्याला ‘चांगले दिवस’ येतील’, असे वाटले होते; पण तसे झाले नाही. बंगालमध्ये आतापर्यंत काँग्रेस, साम्यवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी राज्य केले. हे सर्व राजकीय पक्ष एकमेकांना शह-काटशह देऊन सत्तेत आले, तरी या सर्व राजकीय पक्षांचा हिंदुद्वेष हा समान धागा होता. ‘मुस्लिम लीग’ने हिंदूंच्या विरोधात जी ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’ केली, ती या राजकीय पक्षांनी त्यांच्या सत्ताकाळात ‘इनडायरेक्ट’ पद्धतीने राबवली, इतकाच काय तो भेद !

काँग्रेसच्याच काळात बंगालमधील नक्षलबारी प्रांतातून नक्षलवादाचा जन्म झाला. काँग्रेसनंतर बंगालची सूत्रे साम्यवादी पक्षाकडे गेली. साम्यवाद्यांचा सत्ताकाळ हा हिंदूंसाठी कर्दनकाळच होता. साम्यवाद्यांच्या हिंसाचारामध्ये सर्वसामान्य हिंदु जनता भरडली गेली. अर्थात् साम्यवादी विचारसरणी ही हिंदुत्वाच्या विरोधी असल्याने ‘साम्यवाद्यांचा गड असलेल्या राज्यात हिंदू सुरक्षित रहातील’, अशी अपेक्षाच अनाठायी होती. त्यानंतर वर्ष २०११ मध्ये साम्यवाद्यांची ३४ वर्षांची दीर्घ राजवट उलथवून लावत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सत्तेत आल्या; पण हिंदूंच्या संदर्भात त्यांनी ‘साम्यवादीही लाजतील’, अशा पद्धतीने कारभार केला. उत्तरप्रदेशात सत्तेवर आल्यावर योगी आदित्यनाथ यांनी बंद केलेल्या ३४ पशूवधगृहांना ममता(बानो) यांनी बंगालमध्ये पायघड्या अंथरल्या. २ वर्षांपूर्वी मोहरम आणि दुर्गाविसर्जन एकाच दिवशी आल्यानंतर मोहरम व्यवस्थित पार पडावा; म्हणून ममता(बानो) यांनी दुर्गाविसर्जन १ दिवस उशिरा करण्याचा फतवा काढला होता. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. तृणमूल काँग्रेसच्या या हिंदुद्वेषी राजकारणाने त्रस्त झालेले हिंदू बंगालमध्ये राजकीय पर्याय शोधतच होते. तो त्यांना भाजपच्या रूपात मिळाला. केवळ नावातच ममता असणार्‍या; पण स्वभावाने हेकट आणि दुराग्रही ममता यांना त्यांना राजकीय पर्याय उभा रहाणे, हे पचणारे नव्हते; म्हणूनच तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकरवी आणि पोलीस-प्रशासनाला हाताशी धरून त्यांनी भाजपची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. तेथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंदुत्वनिष्ठांच्या उघड हत्या झाल्या. याला भाजपने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यावर बंगालमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

शाश्‍वत उपाययोजना

भाजपही राजकीय लाभ उठवत बंगालमध्ये अधिक घट्ट पाय रोवू पहात आहे; मात्र सत्तास्थानी पोेचेपर्यंत हिंदुत्वाचा आधार घेणारा भाजप सत्ताप्राप्तीनंतर हिंदुत्वाच्या सूत्रांना बगल देतो, हे दुर्दैवी वास्तव आहे. केंद्रस्तरावर राममंदिराविषयी ठोस भूमिका न घेणारा भाजप बंगालमध्ये मात्र अभिमानाने ‘जय श्रीराम’ म्हणतो, महाराष्ट्रात मंदिरांचे सरकारीकरण करून तेथील प्रथांवर नियंत्रण आणणारा भाजप केरळमध्ये मात्र ‘स्वामी शरणम् अयप्पा’ म्हणत ‘शबरीमला देवस्थानच्या प्रथा परंपरा पाळल्या जाव्यात’, याचा आग्रह धरतो. त्यामुळे हिंदूंचा आधार घेत बंगालमधील राजकीय पोकळीत भाजप त्याचे स्थान निर्माण करू पहात असला, तरी ‘भाजपच्या सत्ताकाळात हिंदूंना ‘चांगले दिवस’ येतील’, असा दावा करणे, धाडसाचे ठरेल. हिंदूंनी २ निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत देऊन भाजपकडे देशाची सूत्रे सोपवली; मात्र हिंदूंच्या स्थितीमध्ये काही पालट झाला नाही. भाजपकडे एकहाती सत्ता येण्याच्या आधीही बंगालमध्ये हिंसाचार चालू होता आणि नंतरही चालू आहे.

आता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीने जोर धरला असला, तरी ती काही शाश्‍वत उपाययोजना नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीसह काडीमोड घेऊन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली; पण तेथील स्थितीमध्ये काही लक्षणीय पालट झाला नाही. पूर्वी आतंकवाद्यांचे जसे उदात्तीकरण केले जायचे, तसे अजूनही चालू आहे. नुकत्याच झालेल्या ईदनंतर तेथील धर्मांधांनी आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करणारे फलक हातात घेऊन आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, तसेच सैनिकांवर दगडफेक केली. जर राष्ट्रपती राजवट लागू होऊनही कायदा-सुव्यवस्थेचा बोजवाराच उडणार असेल, तर काय ? बंगाल ही क्रांतीकारकांची, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांची, रामकृष्ण परमहंस आणि योगी अरविंद यांच्यासारख्या आध्यात्मिक ऋषींची भूमी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात लयाला गेलेले बंगभूमीचे तेज पुन्हा मिळवायचे असेल, तर राष्ट्रपती राजवट नाही, तर बंगभूमीचे सुपुत्र असलेले स्वामी विवेकानंद यांची विचारवट रुजवणे, हाच बंगालमध्ये राष्ट्रीयत्वाचा आणि सनातन धर्माचा विचार रुजवण्याचा शाश्‍वत मार्ग आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now