परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘वैशाख शुक्ल पक्ष सप्तमी (११.५.२०१९) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी आश्रमात भावसोहळा साजरा झाला आणि जगभरातील साधकांनी तो संगणकीय प्रणालीद्वारे अनुभवला. त्या वेळी देहली येथील सेवाकेंद्रात हा भावसोहळा अनुभवतांना मला आलेल्या अनुभूती आणि सेवाकेंद्रातील साधकांची लक्षात आलेली भावविभोर स्थिती पुढे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. भावसोहळ्याच्या आदल्या रात्री सर्व साधकांना ‘भावसोहळ्याला सर्व देवता आदींना निमंत्रण देण्यास सांगण्यात येणे आणि प्रत्यक्ष भावसोहळा चालू असतांना श्री. विनायक शानभाग यांनी ‘सर्व देवता, ऋषिमुनी आदी हा भावसोहळा पहात आहेत’, असे सांगणे

‘भावसोहळ्याच्या आदल्या रात्री, म्हणजे १०.५.२०१९ या रात्री सर्व साधकांना सांगितले होते, ‘उद्याच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात कोणतेही अडथळे येऊ नयेत’, यासाठी प्रार्थना करूया आणि ‘सर्व देवतांसह दिव्यात्मांनाही उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी निमंत्रण देऊया.’ प्रत्यक्षात जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी श्री. विनायक शानभाग सांगत होते, ‘आजचा हा सोहळा सर्व देवता, ऋषिमुनी आदी पहात आहेत.’ हे ऐकतांना ‘भगवंत त्याचे सर्व नियोजन कसे अनेक कड्यांना जोडून सर्वांकडून करवून घेत असतो’, ते अनुभवता आले.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

२. मयन महर्षींनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले ‘श्रीवत्स’ पदक धारण करतांना ‘कार्यक्रमाचे प्रक्षेपण होत असलेल्या पडद्यावर क्षणभर मोठा प्रकाश चमकून एक ज्योत प्रकाशरूपात ‘वीज चमकते’, तशी चमकली’, असे दिसणे

जन्मोत्सव भावसोहळ्याच्या वेळी श्री. विनायक शानभाग म्हणाले की, नाडीपट्टीद्वारे मयन महर्षींनी सांगितले आहे, ‘ज्या क्षणी परात्पर गुरु डॉ. आठवले ‘श्रीवत्स’ पदक धारण करतील, त्या क्षणी वैकुंठातून एक सुंदर ज्योत येऊन ती श्री सत्यनारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या शरिरामध्ये प्रवेश करील.’ हे सूत्र श्री. विनायक शानभाग यांनी सांगताक्षणी ‘कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येत असलेल्या पडद्यावर क्षणभर मोठा प्रकाश चमकला आणि प्रत्यक्ष ती ज्योत प्रकाशरूपात ‘वीज चमकते’, तशी चमकली’, असे मला जाणवले. त्या वेळी पडद्यावर परात्पर गुरु डॉक्टरच दिसत होते.

३. सोहळा चालू असतांना देहली सेवाकेंद्रात लावलेल्या दोन समयांतील दोन्ही वाती एकदम मोठ्या आणि प्रकाशमान झाल्याचे दिसणे आणि ‘त्याद्वारे एक प्रकारे श्री सत्यनारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या विराट स्वरूपाचे प्रकाशमय दर्शन झाले’, असे वाटणे

देहली येथील सेवाकेंद्रात श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर दोन समई ठेवल्या होत्या. (प्रत्येक समईत दोन वाती प्रज्वलित केल्या होत्या.) कार्यक्रमामध्ये श्री. विनायक शानभाग यांनी ‘श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर विराट रूपात दर्शन देत होता’, असे सांगताक्षणी देहली सेवाकेंद्रातील दोन समयांतील दोन्ही वाती एकदम मोठ्या आणि प्रकाशमान झाल्या अन् लगेच नेहमीसारख्या झाल्या.’ तेव्हा ‘त्याद्वारे एक प्रकारे श्री सत्यनारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या विराट स्वरूपाचे प्रकाशमय दर्शन झाले’, असे मला वाटले.

४. देहली सेवाकेंद्रात ठेवलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र, दोन समया आणि तुपाचा दिवा यांची केलेली मांडणी पाहून त्यांचा भावसोहळ्यातील घटनाक्रमाशी असलेला संबंध उलगडणे अन् त्यातून ‘परात्पर गुरुदेव आणि श्री गुरुमाता साधकांकडून ईश्‍वरी नियोजन कसे अनाहुतपणे करवून घेतात’, हे अनुभवायला मिळणे

देहली येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर दोन-दोन वाती असलेल्या दोन समया प्रज्वलित केल्या होत्या. तेथे पंख्याच्या वार्‍याचा झोत एका समईकडे येत असल्याने ती समई पटलाच्या दुसर्‍या बाजूला खाली ठेवली होती. त्यामुळे त्या वेळी पटलावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राशेजारी एकच समई होती. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राच्या दुसर्‍या बाजूला झाकणासह तुपाचा दिवा आणून पटलावर ठेवला. अशा प्रकारे प्रारंभी दोन आणि नंतर तीन दिवे परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर ठेवले गेले.

अ. नंतर कार्यक्रमात ‘महालक्ष्मीस्वरूप सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या हाती दीप धरून श्री सत्यनारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही बाजूला दीपलक्ष्मीप्रमाणे उभ्या राहिल्याचे दिसले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘या दीपलक्ष्मी देहली येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राशेजारी प्रारंभी ठेवलेल्या दोन समयांप्रमाणे आहेत.’

आ. कार्यक्रमात ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे तीन नेत्र असून आणि तिसरा नेत्र श्रीकालीस्वरूप आहे’, असे महर्षींनी सांगितल्याचे सांगण्यात आले. तेव्हा ‘आज देहली येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राशेजारी अनाहुतपणे तीन दीप का लावले गेले’, याविषयी मला उलगडा झाला.

इ. त्या प्रसंगी ‘परात्पर गुरुदेव आणि श्री गुरुमाता साधकांकडून ईश्‍वरी नियोजन कसे अनाहुतपणे करवून घेतात’, हे मला अनुभवायला मिळाले.

५. जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांनी अनुभवली भावविभोर स्थिती !

अ. बर्‍याच साधकांचा भाव जागृत झाला होता आणि कार्यक्रमाच्या शेवटी बर्‍याच साधकांच्या डोळ्यांतून भावाश्रूंच्या धारा वहात होत्या.

आ. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतरही ‘कार्यक्रम चालूच आहे’, असे वाटत होते. त्या वेळी ‘सर्व साधक आनंदात डुंबत होते आणि साधकांना वेळेचे अन् भोजनाचेही भान राहिलेले नव्हते.

इ. साधकांना ‘कार्यक्रम दुसरीकडे चालू आहे’, असे वाटत नव्हते, तर ‘आपण कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून भावसोहळा अनुभवत आहोत’, असे वाटत होते.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, देहली. (१२.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF