राजकारणाचे शुद्धीकरण अपरिहार्य !

संपादकीय

जनता दल (संयुक्त)चे नेते आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे वर्ष २०२१ मध्ये बंगालमध्ये होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी तृणमूल काँग्रेसला साहाय्य करणार आहेत. प्रशांत किशोर हे जदयुचे नेते असले, तरी त्यांची खरी ओळख ही ‘राजकीय रणनीतीकार’ अशीच आहे. निवडणुकीत एखाद्या पक्षाला जिंकवण्याचा विडा त्यांनी उचलला, तर त्या पक्षाला ते जिंकून आणतातच, असे त्यांचे कर्तृत्व. ते प्रकाशात आले वर्ष २०१४ मध्ये. वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिंकून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर मात्र त्यांचे आणि भाजपचे बिनसले. नंतर वर्ष २०१५ मध्ये बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि वर्ष २०१७ मध्ये पंजाबमध्ये काँग्रेस यांना सत्तेत आणण्यासाठी त्यांनी रणनीती आखली आणि त्यांना यश मिळाले. इथपर्यंत सर्व ठीक होते; कारण ते कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडित नव्हते. वर्ष २०१८ मध्ये त्यांनी जदयुमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही ते राजकीय रणनीतीकार म्हणून कार्यरत होतेच. यावर्षी आंध्रप्रदेशमध्ये जगन रेड्डी यांच्या वायएस्आर् काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठीही त्यांचा हातभार मोठा होता. ‘जदयुचा नेता वायएस्आर्ला कसे साहाय्य करतो’, असा कोणी प्रश्‍न उपस्थित केला नाही; कारण वायएस्आर् काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आहे; मात्र आता प्रशांत किशोर ममता बॅनर्जी यांना निवडणूक जिंकण्यासाठी साहाय्य करणार, हे वृत्त समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. जनता दल (संयुक्त) हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष आहे. ममता बॅनर्जी आणि भाजप यांचा छत्तीसचा आकडा आहे. असे असतांना ‘जदयुच्या नेत्याने असे करणे, भाजपला हे रूचेल का’, हा प्रश्‍न आहे. मुळात एका राजकीय पक्षाशी निगडित नेता अन्य एका पक्षाला निवडून देण्यासाठी अशा प्रकारे साहाय्य करू शकतो का ? या प्रकरणातून राजकारणात नीतीमत्ता, मूल्ये यांना काही स्थान नसते, हे पहायला मिळाले. भारतात असे अनेक राजकीय रणनीतीकार, राजकीय विश्‍लेषक, राजकीय तज्ञ कार्यरत आहेत. यांतील बहुतांश हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे समर्थक तरी असतात किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलेले असतात. सध्या निवडणुकीत जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या संस्थांशी व्यावसायिक करार करून त्यांच्याकडून रणनीती आखून घेतली जाते. असे असले, तरी राजकारणी किंवा त्यांच्यासाठी रणनीती आखणार्‍या या संस्था व्यापक जनहितास प्राधान्य देतात का ?

जदयुचे फसवे स्पष्टीकरण !

प्रशांत किशोर यांची ‘इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कंपनी’ ही संस्था राजकीय पक्षांना निवडणूक जिंकण्यासाठी साहाय्य करते. प्रशांत किशोर यांचा हा व्यवसाय आहे. या संस्थेचा आणि जदयुचा काही संबंध नाही, असा खुलासा जदयुच्या नेत्यांनी केला आहे. एखादा राजकारणी हा उद्योजक, व्यावसायिक किंवा कलाकार असू शकतो. राजकारण सोडून इतर वेळी तो त्याचा व्यवसाय करू शकतो, हेही ठीक; मात्र तो व्यवसाय इतरांवर मोठ्या प्रमाणात अनिष्ट परिणाम करत असेल तर ? जदयु जरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असला, तरी या पक्षाची आणि भाजपची विचारसरणी यात मोठ्या प्रमाणात भेद आहे. जदयु अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करतो, तर भाजपची भिस्त ही हिंदूंच्या मतांवर अवलंबून असते. ‘सध्या भाजपला कुठलाच पक्ष आव्हान देऊ शकत नाही’, हे जदयु जाणून आहे. काळाची पावले ओळखून त्याने भाजपशी युती केली आहे; मात्र भाजपविषयी या पक्षातील नेत्यांचे अंतस्थ मत चांगले नाही. ‘तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी भाजपच्या विरोधात दोन हात करू शकतात’, असे या पक्षाला वाटत असल्यामुळे प्रशांत किशोर यांना पक्षातून विरोध होत नाही. थोडक्यात युती एका पक्षाशी; मात्र सोयरीक भिन्न आघाडीतील पक्षाशी, अशी जदयुची कुनीती दिसते. असे राजकारण जनतेच्या काय कामाचे ?

जनहित महत्त्वाचे !

या घटनेनंतर ‘व्यवसाय आणि राजकारण यांची मिसळ करू नका’, असेही सांगण्यात येत आहे; मात्र तसे का करू नये, हा जनतेचा प्रश्‍न आहे. एक राजकारणी म्हणून किंवा राजकीय रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांना बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पुन्हा निवडून आणावेसे वाटणे, या मानसिकतेचे विश्‍लेषण होणे आवश्यक आहे. सतत हुकूमशाही वृत्तीने वागणार्‍या, तेथील बहुसंख्य हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना प्रोत्साहन देणार्‍या आणि महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशी घुसखोर अन् जिहादी यांची पाठराखण करणार्‍या ममता बॅनर्जी यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करून प्रशांत किशोर कोणाचे भले करू पहात आहेत ? केवळ व्यावसायिक लाभासाठी राष्ट्रघातक्यांना साथ देणे, हाही राष्ट्रघात आहे. उद्या प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे ममता बॅनर्जी निवडून आल्यास भारताची सुरक्षा आणि अखंडता यांवर जो परिणाम होणार आहे, त्याला उत्तरदायी कोण असणार ? केवळ पैशांसाठी किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी राष्ट्रघातकी निर्णय घेणारे असे नेते आणि अशा नेत्यांचा भरणा असलेला पक्ष हे लोकशाही निरर्थक ठरवतात.

प्रशांत किशोर यांच्या ममता बॅनर्जी यांना साहाय्य करण्याच्या निर्णयामुळे भारतीय राजकारणाची खालावलेली स्थिती पुन्हा एकदा समोर आली. पूर्वी राजकारणी तत्त्वांना तिलांजली देत असत. आता त्याही पुढे जाऊन वैयक्तिक स्वार्थासाठी ते राष्ट्रहितही पणाला लावण्यास मागेपुढे पहात नाहीत. राजकारणाचा खालावलेला हा स्तर भारतासाठी धोकादायक आहे. उद्या राजकीय स्वार्थासाठी हे पक्ष पाकची बाजूही घेतील. जनतेने हे सहन करायचे का ? अशा राजकारण्यांच्या हाती देश नक्कीच सुरक्षित नाही. राजकारणाच्या या खालावलेल्या स्तराविषयी आणि त्यावरील उपाययोजनेविषयी कोणीही बोलत नाही, हे मोठे दुर्दैव होय. हे लक्षात घेऊन आता राजकारणाचे शुद्धीकरण आवश्यक असून त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !


Multi Language |Offline reading | PDF