जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील बलात्काराच्या प्रकरणात ३ जणांना जन्मठेप, तर ३ जणांना ५ वर्षांची शिक्षा

पठाणकोट – जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे ८ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने मुख्य आरोपी सरपंच सांझी राम, परवेश आणि पोलीस अधिकारी दिपक खजुरिया यांना जन्मठेप, तर हवालादार तिलक राज, पोलीस अधिकारी सुरेंदर वर्मा आणि आनंद दत्ता यांना ५ वर्षांची शिक्षा ठोठवली आहे. यातील आरोपी विशाल याला दोषमुक्त केले.

१. या प्रकरणी १५ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. १० जानेवारी २०१८ या दिवशी मुलीचे अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

२. पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात गेल्या वर्षी जूनपासून या प्रकरणावर प्रतिदिन सुनावणी झाली. गुन्हे शाखेने या प्रकरणात गावाचे प्रमुख सांझी राम, त्यांचा मुलगा विशाल, अल्पवयीन भाचा, स्थानिक नागरिक परवेश कुमार, विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक केली होती. तसेच हवालदार तिलक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता यांनाही अटक करण्यात आली होती. या ८ पैकी ७ आरोपींवर आरोप ठेवण्यात आला होता. एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याविरोधात खटला चालू करण्यात आला नाही. या आरोपीच्या वयाविषयी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय निकाल देणार आहे.

३. या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली आहे, असे या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. पकडण्यात आलेले आरोपी निर्दोष असल्याचे सांगत जम्मूमध्ये आंदोलने करण्यात आली, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी काश्मीरमध्ये निदर्शने करण्यात आली होती.

गुन्हे शाखेच्या अन्वेषणावर संशय

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सांझी राम यांचा मुलगा विशाल याला निर्दोेष ठरवण्यात आले आहे. तो घटना घडल्याच्या वेळी जम्मूमध्ये नव्हता, तर मेरठमध्ये होता. एका एटीएम्मध्ये तो पैसे काढत असतांनाचे त्या वेळेचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण समोर आल्याने त्याची सुटका करण्यात आली. जर तो प्रत्यक्षात जम्मूमध्ये नव्हता, तर त्याला पोलिसांनी कोणत्या आधारे अटक करून यात गोवले, असा प्रश्‍न आता निर्माण होत आहे. यामुळे ‘या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींनाही गोवण्यात आले आहे का ?’, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF