‘‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी अयशस्वी (फोल)’ ठरतात ! – अलीगड येथील बलात्काराच्या घटनेवरून शिवसेनेचा संताप

मुंबई – अलीगड येथील बलात्काराच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते, कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार चालूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी अयशस्वी ठरतात, अशी टीका सामना संपादकीयमधून करण्यात आली आहे.

१. सत्ताधारी म्हणून निवडून आले आहेत, त्या लोकप्रतिनिधींनी मर्यादा पाळणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा अशा लोकांना वारंवार समज देत असतात तरीही ही मंडळी भरकटलेली का असतात ?

२. बलात्काराच्या एका आरोपीस भाजप खासदार साक्षी महाराज खास कारागृहात जाऊन भेटले. त्यावर उत्तर प्रदेशात आता हंगामा चालू आहे.

३. अलीगडमधील घटनेने मानवतेस कलंक लागला आणि समाजाची मान पुन्हा शरमेने खाली गेली. त्या अभागी मुलीची तडफड आणि किंकाळी आमचे मन अस्वस्थ करत आहे.

४. विजयाचा आनंदोत्सव संपला असेल, तर अलीगडमध्ये घडलेल्या भयंकर प्रकाराकडे पहायला हवे. ‘मी भयभीत आहे, अस्वस्थ आणि निराश आहे. हे ते जग नाही, जे आम्ही आमच्या मुलांसाठी निर्माण करू पहात होतो’, अशी भावना अभिनेता अक्षय कुमार याने व्यक्त केली आहे. हीच संपूर्ण देशाची भावना आहे.

५. अमानुष आणि निर्घृण हे शब्द अल्प पडतील अशा पद्धतीने अडीच वर्षांच्या मुलीचे जीवन संपवले. पोलीस महासंचालकांच्या घराच्या बाहेरून अपहरण होते आणि पोलीस अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह घेऊन येतो. हे असे ‘उत्तर प्रदेशातील जंगलराज’ असल्याचे अखिलेश यादव म्हणतात; मात्र या जंगलराजचे खरे जन्मदाता आणि पोशिंदे आपणच आहात.

६. अतिरेकी आणि गुन्हेगार यांना सरळ गोळ्या घालता येतात; पण विकृत माथेफिरू आपल्याच अवतीभोवती लपलेले असतात. ते संधी साधून गुन्हे करतात.

७. हे देशात आणि जगात चालू असले, तरी कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य नाकारता येणार नाही.

८. काँग्रेस राजवटीत ‘निर्भया कांड’ घडले, तेव्हा ज्यांनी संसद चालू दिली नाही. महिला अत्याचाराविरोधात सरकारला कठोर कायदे करायला भाग पाडले ते सर्व लोक आज सत्तास्थानी आहेत. त्यामुळे आजच्या सत्ताधार्‍यांवर मोठे दायित्व आहे. लोकांच्या मनात अशा प्रकाराने अस्वस्थता निर्माण होते.

९. अलीगडमध्ये एका लहान मुलीची हत्या होते. ती देशाची मुलगी आहे ही भावना महत्त्वाची. देशातल्या प्रमुख लोकांनी या घटनेचा धिक्कार केला. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस यांच्यावर दबाव वाढला.

१०. पोलिसांमधील बेफिकिरी आणि शिथिलतासुद्धा असे गुन्हे करणार्‍यांना बळ देत असते.


Multi Language |Offline reading | PDF