द्वेष न्यून करण्यासाठी धर्माचे अध्ययन करण्याचा न्यायालयाचा आदेश

अमेरिकेत शीख धर्मीय व्यक्तीवर आक्रमण केल्याचे प्रकरण

न्यूयॉर्क – इतर धर्मीय आणि भिन्न वंश असलेल्या लोकांविषयीची द्वेषाची भावना न्यून करण्यासाठी येथील न्यायालयाने एका आरोपीला शीख धर्माच्या शिकवणीचे अध्ययन करण्याचे आदेश दिले. आरोपीने शीख धर्माविषयी जाणून घ्यावे आणि त्याने मिळवलेल्या माहितीविषयी न्यायालयाला सांगावे, असेही न्यायालयाने शिक्षेत म्हटले आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अँड्र्यू रामसे नावाच्या एका अमेरिकन नागरिकाने हरविंदर सिंह डोड यांच्यावर आक्रमण केले होते. हरविंदर सिंह यांचे अमेरिकेत दुकान आहे. रामसे याने हरविंदर सिंह यांच्याकडे सिगारेटची मागणी केली होती. त्यावर त्यांनी रामसेला ओळखपत्र विचारले. रामसेने ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे सिंह यांनी सिगारेट देण्याचे नाकारले. त्यावर चिडलेल्या रामसे याने सिंह यांच्यावर आक्रमण केले. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या अन्य ग्राहकांनी सिंह यांना वाचवले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर रामसे याने सिंह यांच्यावर आक्रमण केल्याचे मान्य केले. इतर धर्मांच्या संदर्भात असलेल्या अज्ञानामुळे द्वेष निर्माण होतो. त्यासाठी अन्य धर्मांची शिकवण जाणून घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे निरीक्षणही न्यायाधिशांनी नोंदवले.


Multi Language |Offline reading | PDF