प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील भंडारे आणि अन्नछत्रे यांना असलेले आध्यात्मिक अधिष्ठान !

कुंभमेळा म्हणजे हिंदूंचे सांघिक आणि आध्यात्मिक बळ वाढवणारी यात्रा आहे. कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथ आणि संप्रदाय यांतील साधूसंत, सत्पुरुष, सिद्धपुरुष आणि भाविक सहस्रोंनी एकवटतात. कोट्यवधींच्या उपस्थितीत पार पडणारे कुंभक्षेत्रावरील मेळे म्हणजे हिंदूंची विश्‍वातील सर्वांत मोठी धार्मिक यात्राच होय ! वर्ष २०१९ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात सनातन संस्थेचे साधक धर्मप्रसाराच्या निमित्ताने सेवारत होते.

कुंभमेळ्यातील प्रत्येक संप्रदायाच्या मंडपामध्ये किंवा आखाड्यामध्ये असणारी सामायिक गोष्ट म्हणजे अहर्निश चालणारे भाविकांसाठीचे अन्नछत्र ! कुंभक्षेत्री अशी अन्नक्षेत्रे अनेक ठिकाणी असल्यामुळे लक्षावधी भाविकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे होते. साधक भंडारे आणि अन्नछत्रे या ठिकाणी प्रसाद ग्रहण करायचे. काही अन्नछत्रे आणि भंडारे यांतील सेवाभावाचे दर्शन घडवणारे साधकाला आलेले अनुभव येथे देत आहोत.

१. ओम दिनदयाळ आश्रमातील सेवेकरी आणि विश्‍वस्त यांचा देवाप्रती भाव अन् त्यांचे आश्रमात येणार्‍या व्यक्तींशी नम्रतेने आणि प्रेमाने वागणे

१ अ. सेवेकरी आणि विश्‍वस्त यांनी पहाटे ३ वाजता उठून सिद्धता करणे आणि देवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर भंडारा चालू करणे : ‘आम्हाला ओम दिनदयाळ आश्रमात भोजनाला बोलावले होते. आम्ही दुपारी १२.३० वाजता तेथे गेलो. त्या वेळी तेथील विश्‍वस्तांनी हात जोडून अत्यंत नम्रपणे आणि आदराने सांगितले, ‘‘आम्ही पहाटे ३ वाजता उठतो. त्यानंतर सर्व सेवेकरी सिद्धतेला लागतात आणि देवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर आम्ही भंडारा चालू करतो. आमचा भंडारा बारा वाजता संपतो. तुम्ही कृपा करून १२ वाजण्यापूर्वी आलात, तर बरे होईल. आमचे सर्व सेवेकरी १२ वाजता प्रसाद घेऊन निघतात.’’ ते हे शांतपणे आणि मनात कसलीही प्रतिक्रिया येऊ न देता सांगत होते. त्यांच्याकडून आम्हाला ‘वस्तूस्थिती प्रांजळपणे कशी सांगायची’, हे शिकायला मिळाले. आम्ही त्यांची क्षमा मागून ‘यापुढे बारा वाजण्यापूर्वी येऊ’, असे सांगितले.

श्री. मिलिंद पोशे

 

१ आ. विश्‍वस्तांनी जातीने सर्व व्यवस्था पहाणे : ओम दिनदयाळ आश्रमाचे विश्‍वस्त साधिकांना ‘आओ देवीयो’, असे म्हणून आदरानेे जेवायला बोलावत होते. ते आसंदीवर बसून आज्ञा (ऑर्डर) देत नव्हते, तर उभे राहून जातीने सर्व व्यवस्था पहात होते. काही विश्‍वस्त भोजन वाढत होते. ते प्रत्येक व्यक्तीला ‘गरम रोटी, गरम चपाती’, असे म्हणत गरम पदार्थ वाढत होते. साधकांनी ‘थोडे वाढा’, असे सांगितल्यावर ते म्हणालेे, ‘‘तुम्हाला जेवढे पाहिजे, तेवढे सांगा. आम्ही तेवढेच वाढू.’’ सर्व सेवक नम्रतेने आणि प्रेमाने सेवा करत होते.

२. ‘स्वर्गीय पू. नेपाली बापू अन्नछत्र चालवत आहेत’, असा भाव असणारे गुजरातमधील प्रतिष्ठित व्यापारी श्री. बी. पटेलभाई !

२ अ. ‘आपल्यानंतर मुले आणि नातवंडे यांनी अन्नछत्र चालू ठेवावे’, अशी इच्छा असणे आणि त्यासाठी खर्च करण्याची सिद्धता असणे : श्री. बी. पटेलभाई हे गुजरातमधील प्रतिष्ठित व्यापारी आहेत. स्वर्गीय पू. नेपाली बापू श्री. बी. पटेलभाई यांच्याकडून अन्नछत्रासाठी लागणारे सर्व सामान मागवायचे.

पू. नेपाली बापू यांच्या देहत्यागानंतर श्री. बी. पटेलभाई यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले आहे. श्री. बी. पटेलभाई यांचे वय ६८ वर्षे आहे. ते मागील ३५ वर्षे अन्नछत्र चालवत आहेत. ‘मुलांनी हा भंडारा आपल्यानंतर चालू ठेवावा आणि त्यांच्यानंतर नातवंडांनी चालू ठेवावा’, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी प्रतिदिन १ सहस्र ५०० रुपये वेतनावर एक आचारी आणि प्रत्येकी ५०० रुपये वेतनावर ३ साहाय्यक ठेवले आहेत. यासाठी ‘१० लक्ष रुपये खर्च झाले, तरी चालेल; पण येणार्‍या भक्तांना उत्तम जेवण मिळावे आणि त्यांची सोय व्हावी’, असा त्यांचा ध्यास आहे.

२ आ. श्री. बी. पटेलभाई यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ आ १. प्रेमभाव : त्यांनी साधकांना बसण्यासाठी आसंदी आणि पटल यांची व्यवस्था केली. ते प्रेमाने सर्वांना वाढत होते. आम्ही त्यांना विचारले, ‘‘आम्ही थोडे अधिक संख्येने आलो, तर तुम्हाला त्रास नाही ना होणार ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही आला नाहीत, तर मला त्रास होईल !’’

२ आ २. नम्र : ते म्हणाले, ‘‘काही चुकले असल्यास किंवा सुधारणा करायच्या असल्यास मला सांगा. मी सुधारण्याचा प्रयत्न करीन.’’ यावरून त्यांची अंतरंगातून साधना चालू असल्याचे जाणवले. ते बोलत असतांना माझा भाव जागृत होत होता.

२ आ ३. दानशूर : ते म्हणाले, ‘‘दिल्याने काहीच अल्प पडत नाही; उलट वाढते. हा माझा अनेक वर्षांपासून अनुभव आहे.’’

२ आ ४. अल्प अहं

अ. त्यांच्याकडे भरुचमधील ४ मोठ्या आस्थापनांच्या एजन्सी आहेत. त्यांचा औषध निर्मितीचा कारखाना आहे. ते ‘फाईव्ह स्टार हॉटेल असोसिएशन’चे अध्यक्ष आहेत. असे असूनही ते साधेपणाने रहातात.

आ. त्यांनी सांगितले, ‘‘मला लिहिता-वाचता येत नाही.’’

२ आ ५. धर्माविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा : सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून त्यांनी त्यांच्या मुलांसाठी इंग्रजी भाषेतील ‘धर्मशिक्षण फलक’ हा ग्रंथ विकत घेतला.

२ आ ६. सत्यप्रिय : त्यांनी सांगितले, ‘‘हिंदू कोण आहे ? जो सत्य कर्म करतो, तोच हिंदू आहे, उदा. राजा हरिश्‍चंद्र, राजा शिबी, जलाराम बाप्पा. हे त्यांच्या तत्त्वापासून, म्हणजेच सत्यापासून कधी ढळले नाहीत.’’

२ आ ७. भाव : त्यांनी अन्नछत्राच्या ठिकाणी स्वतःचे छायाचित्र न लावता गुरु महाराजांचे (स्वर्गीय पू. नेपाली बापूंचे) छायाचित्र लावले आहे. ते प्रसिद्धीपासून दूर रहातात.

प.पू. गुरुदेवाच्या कृपेमुळे मला हे कुंभमेळ्यात अनुभवता आले. त्यांच्या कृपेमुळेच प्रतिकूल परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल होत असल्याचा अनुभव आम्ही घेतला. यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. मिलिंद पोशे, सनातन संकुल, देवद, पनवेल. (५.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF