‘अधिवेशनात सहभागी निमंत्रित दुखावले जाणार नाहीत अथवा त्यांना वेगळी वागणूक मिळणार नाही’, याची काडीमात्रही काळजी न घेणारे एका अधिवेशनाचे आयोजक !

‘अलीकडेच एका जिल्ह्यातील एका संस्थेने एक अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात उपस्थित रहाणार्‍या व्यक्तींनी अधिवेशनाला येण्यापूर्वी नियमानुसार नोंदणी अर्ज भरणे बंधनकारक होते. त्यामुळे या अधिवेशनात सहभागी झालेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे कार्य यांविषयी आयोजकांना पूर्ण कल्पना होती.

या अधिवेशनात काही व्यक्तींचा त्यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान करण्यात आला. या वेळी काही व्यक्तींना त्यांचे नाव छापलेले गौरवचिन्ह देण्यात आले; मात्र काही व्यक्ती पूर्वी नोंदणी करून आल्या असूनही आणि त्यांचा सन्मान करणे निश्‍चित असूनही त्यांचे नाव न छापलेले गौरवचिन्ह देण्यात आले. याला ‘सन्मान’ म्हणणे योग्य होईल का ? ज्या गौरव चिन्हावर त्या सन्मानित व्यक्तीचे नाव छापले नसेल, त्या सन्मान चिन्हाचे मूल्य ते काय ? ते आहे तसे उचलून नेऊन कुणीही त्याचा अयोग्य वापर करू शकतो.

आयोजकांना या दोन प्रकारच्या (नाव छापलेल्या आणि नाव न छापलेल्या) सन्मान चिन्हांविषयी विचारल्यावर ‘गौरव चिन्हावर नावे छापलेल्या व्यक्ती काही कारणामुळे येऊ शकल्या नाहीत, तर ते अन्य कुणासाठी वापरता येत नाही. ते तसेच पडून रहाते’, असे उत्तर त्यांनी दिले. प्रत्यक्षात ज्यांचा सन्मान करायचा त्यांची नावे निश्‍चित असतील, तर त्यांचे नाव सन्मान चिन्हावर छापावे आणि त्यांच्यापैकी कुणी व्यक्ती अनुपस्थित राहिली, तर ‘तिचे सन्मान चिन्ह तिच्या पत्त्यावर पाठवून द्यावे’, हाही एक पर्याय आयोजक काढू शकतात.

एकूणच, सर्व पर्यायांचा विचार करून निर्णय घेणे आणि अधिवेशनात सहभागी निमंत्रित दुखावले जाणार नाहीत अथवा त्यांना वेगळी वागणूक मिळणार नाही, याची काळजी घेणे’, हेच उत्तम आयोजकाचे लक्षण होय.’

– एक साधिका (१०.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF